जीवनगाणे”-जगण्यासाठी बळ देणारा काव्यसंग्रह

27

आपण जीवनात अनुभवलेले नातेसंबध, प्रेम,सुख,दु:ख,आशा,निराशा,उद्वेग,निसर्ग, सामाजिक परिस्थिती अशा अनेक घटकांचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. मनावर होणारा परिणाम काही व्यक्तींच्या मनाला स्वस्थ बसू देत नाही.त्या घटक रंगांचे मनात सारखे तरंग उमटत असतात आणि कधी कधी कवितेच्या रुपात कागदावर उमटतात. यास चामोर्शीतील नवोदीत कवयित्री सौ. भारती संजय तितरे सुध्दा अपवाद नाहीत.त्यांच्या मनातून “जीवनगाणे” कवितासंग्रह अशाच तऱ्हेने उदयास आल्याचे कविता वाचतांना जाणवते.
जो वाचतांना आपण आपले जीवनगाणे वाचत असल्याचा बरेचदा भास होतो.

सौ. भारतीचे पितृछत्र बालपणीच हरवलेले.त्यामुळे कुटुंब पेलण्याची जबाबदारी त्यांचेकडे कमी वयात आपसुकच आली.त्याचा परिणाम त्यांच्या कवितेत जाणवतांना दिसतो.आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी अध्यापनाच्या निमित्ताने जुडलेले त्यांचे नाते. सतत खेडेगावातील वास्तव्य पण वाचनाची आवड, निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होणे, त्यांच्या या अंगभूत गोष्टींचा परिणाम त्यांच्या काव्यात सहज उमटलेला दिसून येतो.सौ.भारती यांच्या संग्रहात एकूण विवीध प्रकारच्या पंच्याहात्तर कवितांचे पुष्प गुंफलेले आहे.नामांकित परिस पब्लिकेशन सासवड,पुणे हे प्रकाशक आहेत तर गिरीपर्ण यांनी “जीवनगाणे” मुखपृष्ठाला नावास साजेसे सुंदर चित्र देऊन न्याय दिलेला आहे.डाॅ. विठ्ठल चौथाले यांची ओघवत्या शब्दात संग्रहानुरूप उत्तम प्रस्तावना लाभलेली आहे.

सौ.भारतीचे “जीवनगाणे” काव्यसंग्रहाच्या निमीत्ताने साहित्य क्षेत्रातले पहिले पदार्पण म्हटल्यास वावगे ठरणार नाही.मात्र अनुभव कमी असुनही पुस्तकाचा दर्जा,कमीतकमी चुका टाळण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.त्यांच्या संग्रहात सुख,दु:ख,निसर्ग,प्रीती,थोर पुरूष,नाते,शिक्षण,शेती,प्राणी,पक्षी,देशप्रेम, या सर्वांची रेलचेल आहे. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नाही हे आणखी त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये तसेच “जीवनगाणे “चे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल.निसर्ग कवितेतून तर वाचकांचा आनंद सतत स्त्रावत ठेवून खिळवून ठेवणे.ही किमया त्यांनी सहज साधलेली आहे.मानवाचे “जीवनगाणे” हे दु:खाचे,निराशेचे गाणे न राहता आनंदगाणे व्हावे.याकडे त्यांचा कल आहे.हा त्यांच्या कवितेचा स्थायीभाव/ आत्मा आहे. म्हणूनच त्या ‘जीवनगाणे ‘ या कवितेत सांगून जातात…

“बुद्धीवान देह मानवाला लाभला/
माणूस होऊन तू जग /
आधारस्तंभ हो माणसाचा/
आनंद जीवनाचा बघ//.”

हे तत्वज्ञान त्या नुस्त्या कवितेतून सांगतच नाही तर त्या स्वतः आचरणात आणून जीवन प्रगतीपथावर नेण्यासाठी …..
विद्या परम दैवतम
मंत्र जपत जाऊ
अशा प्रकारचे अनेक कानमंत्र समाजास
देण्यास त्या कचरत नाहीत.त्यांच्या कविता वाचतांनी “प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे.” या म्हणीची प्रचिती येते.प्रयत्न केल्यास सर्व काही शक्य आहे. हे विपरीत परिस्थितीत अल्पावधीमध्ये “जीवनगाणे”कवितासंग्रह रसिकांच्या सेवेत अर्पण करून त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली.।
कोरोनाने समाजातील सर्व थरातील लोकांचे कमीअधीक प्रमाणे हाल झाले मात्र सर्वात जास्त हाल कुणाचे झाले असतील तर कामकरी वर्गाचे आणि शेतकऱ्यांचे. वाहतूक बंद असल्याने त्यांचा माल शेतातच पडून सडत असे. समाजाच्या दु:खाची खरी जान असलेल्या सौ.भारतीने त्यांचे हे दु:ख बरोबर हेरले.म्हणून त्यांचे हृदयातून शेतकऱ्यांविषयी स्फुंदत शब्द फुटतात…

फुलाफळांचे शेतात पडले सडे
बघून शेतकरी ढसाढसा रडे !
बळीराजाची मेहनत मातीमोल झाली
देशात कोरोनाची महामारी आली !!

हे मन हेलावणारी व्यथा सांगतानाच देशाला सहकार्य करण्यासाठी त्या सधन वर्गाला आवर्जून विनंती करतात.या पंक्तीतून कामगार,शेतकरी यांच्याविषयी कळकळ/तळमळ त्यांचेमध्ये ठायी ठायी भरलेली असल्याचे दिसून येते.असे गरिबांसाठी त्यांचे हृदय दु:खाने तळमळत असले तरी ‘शूरवीर’ या कवितेत रणचंडीसारखे भारतभूच्या शत्रूवर पण त्या सिंहांचा छावा होऊन शब्दातून तुटून पडल्याचे दिसतात.
सडे रक्ताचे शिंपडीन
छावा होऊनी वाघिणीचा
अतिरेक्यांचा उडवेन धुव्वा
नेम धरून बंदूकीचा.
त्यांच्या जय जय भवानी,जयजयकार भिमरायाचा,राजे छत्रपती,क्रांतीज्योती सावित्री,या थोरपुरूषांच्या गाथा गाणाऱ्या या कविता लहानमुलांना आवडणाऱ्या व समाज घडविण्यासाठी प्रेरक अशा आहेत.तर भारतमाता,जयभवानी,माझा देश महान,शिपाई,भारतमाता या कविता त्यांचे राष्ट्रप्रेम दर्शविते.देशातील शूरवीरांचे गोडवे गाऊन ते त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात.ह्या देशभक्तीपर कविता वाचतानी वाचकांच्या अंगावर स्फुरण चढल्याशिवाय राहात नाही.त्यांचे
निसर्गचित्र, सुर्यनारायण,हिरवं निसर्ग,पाऊसधारा,सृष्टीचे आनंदगीत, सुंदर माझे गाव,झाडे लावा झाडे जगवा,आनंद बाग इत्यादी निसर्ग कवितेत मधासारखे मधुर शब्दमाधुर्य,काठोकाठ भरलेले आहे, या कवितेतील ओळी वारंवार गुणगुणत राहावेसे वाटते. या कविता वाचतांनी कवी ‘बी’ यांच्या “चाफा” या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहातं नाही.

आश्रमशाळेत अध्यापन करता करता बालकांच्या मनाचा अभ्यासही सौ.भारतीचा झालेला दिसून येतो . म्हणून कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने मुलांच्या मनातले अनेक प्रश्न ते नेमकेपणाने हेरतात. त्या सहजतेने “प्रश्न” या कवितेत …
शाळेची सुटी कधी संपणार
घंटा शाळेची कधी वाजणार
शाळकरी मुलांच्या या प्रश्नांनी प्रत्येक पित्याचे मन हेलावल्याशिवाय रहात नाही.या कवितेत मुलांच्या मनाचा वेध त्यांनी अचूक घेतलेला दिसतो.
सौ. भारतीच्या कवितेचे आणखी वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी दु:खाचे अनेक चक्रीवादळे झेलले असले तरी त्या त्यांना कुरवाळत बसत नाहीत आणि त्याचे तराणे कुणाला सांगत बसत नाहीत तर जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक आहे.ही सकारात्मकता त्यांच्या
“आयुष्य” या कवितेतून व्यक्त झालेली आहे.पहा त्यांच्या पंक्ती…..
“आयुष्य दिले देवाने,सुंदर जीवन जगावे
जीवनाच्या या वाटेवरी,गुलाब परी नित्य हसावे
कठीण पाषाणाला भेदून,शितल पाण्याचा निघतो झरा
अरे!वादळ पाऊस झेलुनी,जीवन जग तर तू खरा.”
याप्रमाणे भारतीच्या संग्रहात दु:खी जिवाला बळ देणाऱ्या अनेक काव्य पंक्ती आलेल्या आहेत. ही या संग्रहाची जमेची बाजू व ताकद आहे.भारतीच्या कविता प्रसाद,माधुर्य,ओज,यमक साधणाऱ्या या गुणाबरोबरच निसर्गवर्णने,थोर व्यक्तिचित्रे,या गुणांनी भरलेल्या आहेत.त्यांची कविता जीवनाचे मर्म सहज सांगून जाते. झाडीपट्टीचे चांगले संस्कार त्यांच्या कवितेत उमटलेले आहेत.
झाडीपट्टीतील एका खेड्यातील कवयित्रीने काव्यसंग्रह रसिकांच्या सेवेला अर्पण करणे ही मोठी गौरवाची बाब आहे. त्यांचे हातून अजून यापेक्षा सकस साहित्याची सेवा घडो, या शुभकामना

✒️लेखक:-डॉ.चंद्रकांत लेनगुरे(जिल्हाध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ,गडचिरोली)