तलवाडा येथील समाधी नजीक खराब झालेला मुख्य रस्ता खडी – मुरूम टाकून केला दुरस्त

✒️शेख आतिख(विशेष प्रतिनिधी)

तलवाडा(दि.२७सप्टेंबर):- गेवराई – तलवाडा – माजलगाव या मुख्य रस्तयावर तलवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक असून या चौकापासून तलवाडा गावात तसेच भोगलगाव, बोरगावथडी, राहेरी, गंगावाडी, पांढरी, अंतरवाली, मिरगाव, दैठण या गावांना जाण्यासाठी जो मुख्य रस्ता आहे तो राम मंदिराच्या समाधी नजीक पाणी व चिखलामुळे खराब होऊन मोठया प्रमाणात खड्डे पडले होते. हा रस्ता खराब झाल्यामुळे वाहनधारक व पायी चालणा-या लोकांचे खूपच हाल होत होते. या रस्ता दुरूस्तीकडे कोणाचेही लक्ष नव्हते. हा रस्ता खडी – मुरूम टाकून दुरूस्त करण्याचे काम गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन सोमवार दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी केले आहे. चिखल व खड्डेमय झालेला हा रस्ता दुरूस्त केल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या रस्तयावर सहा ट्रॅक्टर मुरूम टाकण्याचे काम रविवारी अँड.सुरेश हात्ते यांनी केले होते. परंतु पाऊस पडल्यामुळे हा रस्ता पुन्हा जैसे थे झाला होता. सोमवारी पं.स. सदस्य – प्रा.शाम कुंड, माजी सभापती गिताराम डोंगरे, राजेंद विटकर, गोविंद जोशी, शेख मकसुद, भागवत नाटकर, वजीर कुरेशी, पिनू शिंदे, पत्रकार बापू गाडेकर आदींनी एकत्र येऊन या रस्तयावर खडी – मुरूम टाकून रस्ता दुरूस्त करण्याचे महत्वपूर्ण काम केले असून हा रस्ता चांगला केल्याबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. याकामाससाठी वापरलेले जेसीबी मशिन व ट्रॅक्टर वाहतूक खर्च हा प्रा. शाम कुंड यांनी स्वतः केला आहे.

सध्या जरी समाधी नजीक हा रस्ता वाहतुकीसाठी चांगला झाला असला तरी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गंगावाडी फाटा असा जवळपास एक ते दीड कि.मी.चा दुहेरी वाहतुकीसाठी नवीन रस्ता करणे अतिशय आवश्यक असून या रस्तयावर दोन्ही बाजूंनी नाली बांधकाम आणि ठिकठिकाणी चार पूल करणे देखील गरजेचे आहे. आता तरी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या रस्तयासाठी शासनाकडून भरीव असा निधी उपलब्ध करून दळणवळणाची होत असलेली गैरसोय दुर करावी अशी रास्त मागणी तलवाडा, भोगलगाव, बोरगावथडी, तिर्थपुरी, राहेरी, गंगावाडी या भागातील लोकांनी केली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED