मुसळधार पावसात ST बस पुलावरुन थेट पाण्यात कोसळली, घटनेचा

27

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.28सप्टेंबर):- मुसळधार पावसात एसटी बस थेट पाण्यात कोसळल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटीच्या हिरकणी बसला अपघात झाला आहे. बस थेट पाण्यात कोसळली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरापासून काही अंतरावर दहागावच्या पुलावर ही दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे.ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.नदीवरुन पाणी वाहत असताना एसटी बस चालकाने नको ते धाडस करत प्रवाशांचा जीव धोक्यात घातला.

या पुलावरुन पाणी वाहून जात असतानाही चालकाने त्या पाण्यातून गाडी नेली आणि पाण्याच्या प्रवाहात ही बस वाहून गेली. या अपघाताचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत.एका व्हिडीओत एसटी बस थेट पाण्यात वाहून जात असताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत बसमधील प्रवासी आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत. बसच्या टपावर अडकलेले प्रवासी मदतीसाठी हाक देत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार या एसटी बसमध्ये 6 ते 7 जण होते. घटनास्थळी मोठ्या वेगाने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

मात्र अद्याप एसटी चालक आणि एसटी वाहक यांची माहिती मिळू शकलेली नाहीये.गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. नद्या ओसंडून वाहत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत.