आरोग्य विभागाच्या परीक्षार्थ्यांना दिलासा देणारी आनंदाची बातमी

27

🔸परीक्षा रद्द करण्यात आल्या नव्हत्या तर पुढे ढकलण्यात आल्या- ना राजेश टोपे

✒️झरीजामणी प्रतिनिधी(सुनील शिरपुरे)

झरीजमनी(दि.28सप्टेंबर):-सध्या अनेक विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे परीक्षार्थी संभ्रमात पडत असल्याचं चित्र सर्वश्रूतच आहे. याच संभ्रमातून आरोग्य विभागाची परीक्षा ही सुध्दा चर्चेचा विषय ठरला आहे. आरोग्य विभागाच्या गट-क व ड संवर्गातील 6205 पदांसाठी 25 व 26 सप्टेंबरला ठरलेली परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. यामुळेही परीक्षार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षासंदर्भात आज महत्त्वपूर्ण माहिती दिली. या परीक्षा रद्द करण्यात आल्या नव्हत्या तर पुढे ढकलण्यात आल्या. आता या परीक्षांच्या नव्या तारखा निश्चित झाल्या असल्याची आनंदाची बातमी त्यांनी दिली. त्यानुसार आता गट-क संवर्गाची परीक्षा 24 ऑक्टोबर व गट-ड संवर्गाची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय काल सोमवार रोजी आरोग्य विभाव व नासाच्या अधिका-यांमध्ये झालेल्या बैठकीत झाला आहे.या संदर्भात सविस्तर माहिती देतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोणताही धोका न पत्करता या दोन्ही दिवशी रविवार असल्याने शंभर टक्के शाळा उपलब्ध होणारच. या अनुषंगाने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. 9 दिवस आधीच सर्व परीक्षार्थ्यांना प्रवेशपत्र मिळतील याचीही खात्री केल्या जाईल असं त्यानी म्हटले आहे.

तसेच कुणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवणा-यांवर कडक कार्यवाही करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या असल्याचं त्यांनी आपल्या वक्तव्यातून म्हटले आहेत. कुणालाही काही चुकीचा प्रकार होत असल्याचं आढळून आल्यास, त्यांनी तात्काळ थेट पोलिसांना संबंधिताबद्दल कळवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आवाहन केले आहे. परीक्षा अत्यंत पारदर्शक व्हायला हव्यात, त्यात कुठेही गडबड व्हायला नको? याची पुरेपुर काळजी घेतल्या जाईल. असंही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले आहे.