पृथ्वी कामगारांच्या तळहातावर तरली आहे – विश्वास सुतार

27

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.28सप्टेंबर):- पृथ्वी कोणत्याही तथाकथित भ्रामक गोष्टींवर तरलेली नाही, तर ती राबणाऱ्या कष्टकरी श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. मेहनत करणारा समाजच याचा तारणहार आहे, असे प्रतिपादन करवीरचे शिक्षण विस्तार अधिकारी व सुप्रसिद्ध लेखक विश्वास सुतार यांनी केले. ते राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व निर्मिती प्रकाशन यांचेवतीने आयोजित, सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व निर्मिती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगार व त्यांच्या पाल्यांचा सत्कार, आदित्य सभागृह येथे आयोजित करणेत आला होता. यावेळी बोलताना सुतार म्हणाले, प्रशासकीय अधिकारी आणि कामगार वर्ग यांच्यात सुसंवाद व्हायला हवा. यामुळे कामगार वर्गाचे प्रश्न लवकर सुटतील. कामगार हा इथल्या व्यवस्थेत नेहमीच उपेक्षित राहणारा घटक आहे. अहोरात्र कष्ट करणाऱ्या कामगार वर्गाच्या व्यथा, वेदना प्रशासनाने जाणून घ्यायला हव्यात. यावेळी बोलताना कोल्हापूरचे सहा. कामगार आयुक्त संदेश आयरे म्हणाले, कामगारांच्या हिताच्या विविध योजना शासन राबवत आहे. त्याचा लाभ कामगारांना व्हावा, यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करत असतो. शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ संबंधित घटकांना मिळावा यासाठी, सर्वच क्षेत्रातील पात्र कामगार वर्गाने जागरूक असणे गरजेचे आहे. लाभार्थी कामगारांच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीकरीता आम्ही नेहमीच बांधील आहोत. कामगार वर्गाने बदलते कामगार कायदे व त्या अनुसंगाने कार्यरत असणे गरजेचे आहे.

कोल्हापूरचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण निरीक्षक राजेंद्र निकम म्हणाले कि, कामगार हा इथल्या व्यवस्थेमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यासाठी शासन नेहमीच तत्पर आहे. जिल्ह्यातील कामगार सतर्क व अभ्यासू असल्यामुळे, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कामगार निधी कोल्हापूरला मिळतो. यावेळी सुरेश पोवार, सात्ताप्पा सुतार, श्रीकांत पाटील, बाळासाहेब कांबळे यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच गुणवंत कामगारांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल योगेश केसरकर, पौर्णिमा चौगुले, संकेत सासणे यांचा सन्मानचिन्ह, पुस्तके व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मानवाधिकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी सुरेश केसरकर यांची निवड झाल्याबद्दल तसेच भगवान माने, संभाजी थोरात, महादेव चक्के, शिवाजी चौगुले, अनिता काळे, कलावती जनवाडे यांचा राज्य व जिल्हा कमिटीवर निवड झालेबद्दल सन्मानचिन्ह व पुस्तके भेट देऊन सत्कार करणेत आला.यावेळी निर्मिती प्रकाशनचे प्रमुख अनिल म्हमानेे, गुणवंत कामगार अनिता काळे, बाळासाहेब कांबळे, सात्ताप्पा सुतार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी कामगार अधिकारी यशवंत हुंबे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप घेवडे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले. आभार भगवान माने यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेंद्र रहाटे, सचिव अच्युतराव माने यांचे सहकार्य लाभले. यावेळी गुणवंत कामगार सेवा संघ कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी व कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवंत कामगार व त्यांची पाल्ये उपस्थित होती.