चिमूर पंचायत समिती मध्ये दप्तर दिरंगाई नित्याचीच!

25

🔹दहा दिवसांपासून रक्कम येऊनही पगार नाही.

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.28सप्टेंबर):-चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शिक्षकांचे माहे ऑगस्ट चे वेतनाची रक्कम पंचायत समितीला दहा दिवसापासून प्राप्त झाली असतांनाही वेतन अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शिक्षकांचे वेतन तात्काळ करावे अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती तालुका शाखा चिमूर यांनी पंचायत समिती चे संवर्ग विकास अधिकारी भाऊसाहेब राठोड यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उशिरा होणारे वेतन ही पंचायत समिती चिमूर येथे नित्याची बाब झालेली आहे. पगार देयके उशिरा बनविणे, लेखा विभागात देयके प्रलंबित राहणे, लिपिकांचे कार्यालयात गैरहजर राहणे या सर्व दप्तर दिरंगाईमुळे शिक्षकांचे वेतन उशिरा होतात त्यामुळे शिक्षकांचे बँकेचे, पतसंस्थेचे कर्जाचे हप्ते उशिरा जाऊन अतिरिक्त व्याजाचा शिक्षकांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे.

संवर्ग विकास अधिकारी यांनी संघटनेच्या शिष्ठमंडळाला समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले. भेटीदरम्यान महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे नरेंद्र मुंगले, ताराचंद दडमल, प्रदीप गौरकार, सलीम तुरके, गोवर्धन ढोक, राजू चांदेकर, खोब्रागडे, जनार्धन केदार, गोविंद गोहणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पगाराची समस्या लवकरात लवकर निकाली न काढल्यास संघटना आंदोलन उभारेल अशी माहिती संघटनेचे तालुका सरचिटणीस गोविंद गोहणे यांनी दिली.