सिनेसृष्टीचा एक भक्कम आधार!

28

(ग.दि.माडगूळकर जयंती विशेष)

गजानन दिगंबर माडगूळकर टोपणनाव गदिमा यांची आज जयंती. त्यांचा जन्म शेटेफळ जिल्हा सांगली येथे दि.१ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव दिगंबर बळवंत माडगुळकर तर आईचे नाव बनुताई होते. ते विख्यात मराठी कवी, लेखक तथा पटकथा-संवाद लेखक होते. त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात आले. त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा पुढे त्यांना फारच उपयोग झाला. त्यांच्या पावन जयंतीप्रित्यर्थ श्री. कृ. गो. निकोडे गुरुजी यांच्या लेखप्रपंचाद्वारे त्यांच्या कलाकौशल्यांना मानाचा मुजरा! – संपादक.

गदिमांनी हंस पिक्चर्स या चित्रसंस्थेच्या सन १९३८मध्ये मा.विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका वठविल्या. येथून त्यांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीच शुभारंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली. त्यामुळे त्यांनाही खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कविता लेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट या चित्रसंस्थेत के.नारायण काळे यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली. तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात? हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणा या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली.

त्याकाळी या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी व लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथाकार, संवादकार आणि कलाकार म्हणून दीडशेहून अधिक मराठी तर कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन या नावाने संग्रहित आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांत तीन चित्रकथा, युद्धाच्या सावल्या या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते, तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही पुस्तके- १) कविता: जोगिया, चार संगीतिका, काव्यकथा, गीत रामायण, गीत गोपाल, गीत सौभद्र. २) कथासंग्रह: कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप, चंदनी उदबत्ती. ३) कादंबरी: आकाशाची फळे. ४) आत्मचरित्र: मंतरलेले दिवस, अजून गदिमा, वाटेवरल्या सावल्या, अशी आहेत.

माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. सन १९६९ मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. तर सन१९७३मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचेही ते सदस्य होते. त्यांच्या नावाचे ‘गदिमा प्रतिष्ठान’ काढण्यात आले आहे. त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपट तंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यांतून लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत पुढचं पाऊल, बाळा जो जो रे, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, मी तुळस तुझ्या अंगणी, जगाच्या पाठीवर, संथ वाहते कृष्णामाई यांचा समावेश होतो. तर उल्लेखनीय हिंदी चित्रपट- तूफान और दिया, दो आँखे बारह हाथ, गूँज उठी शहनाई हे त्यांचे पटकथा असलेले सांगता येतील.

ग.दि.माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ते गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संतकवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय असून त्याने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही होते. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘भूमिकन्या सीता’ या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी, मानसी राजहंस पोहतो, सुखद या सौख्याहुनी वनवास, ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. गदिमांच्या कवितेवर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आदींच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते. याचा प्रत्यय चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या व सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते.त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लय-तालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी त्यांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक भरभरून प्रतिसाद दिला व त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला. त्यांना ‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली.

गीत रामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. त्याचे अन्य भारतीय भाषांत अनुवादही झाले आहेत. ग.दि.माडगूळकर यांचे पुणे येथे दि.१४ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.

!! पुरोगामीसंदेश परिवारातर्फे जयंती निमित्त गदिमांना विनम्र अभिवादन !!

✒️ संकलन व शब्दांकन:-श्री. कृ. गो. निकोडे गुरुजी-‘अलककार'(मराठी सारस्वतांचे जीवन चरित्र अभ्यासक)
मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी.त. आरमोरी, जि. गडचिरोली.व्हा. नं. ७४१४९८३३३९