खैरलांजी हत्याकांड!महाराष्ट्राच्या मातीला काळीमा फासणारा काळा दिवस

🔹खैरलांजीतील नग्न सत्य अन्याय- अत्याचार, बलात्कार, हत्याकांडे ‘ढेकर देत’ पचविणाऱ्या समाजास आठवणीखातर !

✒️भंडारा प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

भंडारा(दि.30सप्टेंबर):-ही निपचित पडलेली बॉडी प्रियंका भोतमांगे यांची आहे. वय वर्ष १७, पुर्ण नग्न अवस्थेत असलेल्या या बॉडीवर एक इंच ही जागा अशी नाही की ज्यावर जखम नाही. संपुर्ण नग्नावस्थेत ही बॉडी सापडून ही भंडाराच्या सत्रन्यायालयाला वा हाय कोर्टाला यात स्त्री देहाची विटंबना दिसली नाही. दलितांच्या बाजूनं ही केस लढणाऱ्या जगविख्यात मराठा वकील उज्वल निकम या सरकारी वकिलानी देखील ही विटंबना आहे हे पटवून देण्यासाठी काही खास प्रयत्न केला नाही म्हणा.प्रियंका सोबतच तीची आई सुरेखाताई (४२), सुधीर (२१) अन रोशन (१९) यांच्या बॉड्याही याच कालव्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून काढण्यात आल्या.

आजच्या घडीपासून ठीक १३ वर्षांपूर्वी म्हणजे २९ सप्टें २००६ रोजी अशाच संध्याकाळी खैरलांजीतील कुणबी अन कलार या सवर्णानी भोतमांगे कुटुंबियांवर घाला घातला. पाच जणांच्या कुटुंबातील भैयालाल भोतमांगे हे, हल्ला झाला त्यावेळी घरी नव्हते म्हणूनच केवळ वाचले.जवळजवळ दीडदोन तास अक्षरशः नंगानाच करत सवर्ण गावकऱ्यांनी दलित भोतमांगे कुटुंबियांना गुराढोरांसारखं झोडपून झोडपून मारून टाकलं. एव्हढंच नव्हे तर प्रियंका व तीची आई सुरेखाताई यांच्यावर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार ही करण्यात आल्याचं, स्वतंत्र fact finding करणाऱ्या विविध संघटनांनी नोंद करून ठेवलंय.

निमीत्त घडलं तें अत्यंत हुशार असलेल्या व सायकलीवर कॉलेजला जाणाऱ्या प्रियंकाला गावातील सवर्ण टवुर मुलांनी छेडण्याचं व त्याचा जाब सुरेखाताईच्या आतेभाऊ यांनी त्या मुलांना विचारण्याचं.गावकुसाबाहेर दलितांची तीनच घरटी असलेल्या या गावांतून वर्षभरापूर्वी (२००५) आणखीन एक खोब्रागडे नावाचा होतकरू दलित तरुण असाच गायब झाला होता. अत्यंत मेहनती असलेलं हे भोतमांगे कुटंब त्यांच्या स्वतःच्या अल्पशा शेतजमिनीवर राबराब राबून स्वाभिमानानं जगत होतं. खैरलांजी हात्याकांड 29 सप्टेंबर 2006 काळा ⚫ दिवस

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED