उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची पत्रकार भवनाला भेट

31

🔸जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संशोधन व अभ्यास केंद्रासाठी सहकार्य करू- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अमरावती(दि.1ऑक्टोबर):-अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संशोधन व अभ्यास केंद्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वॉलकट कम्पाऊंड स्थित पत्रकारभवनाला मंत्री श्री. सामंत यांनी भेट देऊन तेथील ग्रंथालय व अभ्यासिकेची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, उपाध्यक्ष संजय शेंडे, त्रिदीप वानखडे, चंदू सोजतीया, संजय निर्वाण, सरचिटणीस प्रफुल्ल घवळे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे संशोधन व अभ्यास केंद्र चालविण्यासाठी परवानगी मिळण्याचे निवेदन करण्यात आले. त्याबाबत सकारात्मकता दर्शवत मंत्री श्री. सामंत म्हणाले की, संशोधनाला चालना देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे विविध योजना- उपक्रम राबवले जातात. पत्रकार संघाच्या संशोधन व अभ्यास केंद्रालाही निश्चितपणे सहकार्य करू. या केंद्राबाबत व संशोधन शिष्यवृत्तीबाबत सर्व तरतुदींचा अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात चालणा-या घडामोडींची अचूक माहिती, डेटा संकलन हे पत्रकार व अभ्यासक, संशोधकांना उपलब्ध करून देण्याचे काम अभ्यास केंद्राच्या माध्यमातून होईल. अद्ययावत माहितीवर प्रक्रिया करून विविध समस्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना सुचविण्याचे कामही केंद्राद्वारे होईल. ही संशोधनपर माहिती विविध क्षेत्रांना स्थानिक नियोजनासाठी उपयुक्त ठरणार असून, अभ्यासू व संशोधक वृत्तीच्या पत्रकारांची फळी याद्वारे उभी राहणार आहे. पत्रकारांना संशोधनात्मक उपक्रमासाठी एक लाख रूपयांची शिष्यवृत्तीही मिळावी, असे निवेदन संघाचे अध्यक्ष श्री. अग्रवाल यांनी यावेळी केले.

श्री. अग्रवाल व संघाच्या सदस्यांनी मंत्रीमहोदयांचे स्वागत केले. गौरव इंगळे यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार यशपाल वरठे, सुनील धर्माळे, विजय ओडे, मनोहर परिमल, अनुप घाडगे, बाबा राऊत, सुधीर भारती, सुनील दहाट, संतोष शेंडे, बबलू दोडके, प्रेम कारेगावकर, शुभम अग्रवाल, अक्षय नागापुरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.