विनोदाचे चालते बोलते विद्यापिठ – हिरालाल पेंटर

52

जीवन म्हणजे आसू आणि हसूंचे एकजीव मिश्रण . दुःख आणि सुखामुळे आयुष्याला ख-या जगण्याचे संदर्भ सापडतात . दुःखाचे क्षण माणसाला अस्वस्थ करतात . तर सुखाचे क्षण आयुष्याचा तरू मरूस्थळी देखील सदैव बहरत ठेवतात . दुःखाची काळी रात्र सरली की सुखाचा सूर्य उजाडतोच . त्याच न्यायाला अनुसरून नाटक सिनेमांतून सुद्धा दुःखा नंतर सुखाची पखरण करणारे सोनेरी क्षण पेरले जातात . विनोदवीरांमुळे हे क्षण जिवंतपणे फुलवले जातात . त्यामुळे प्रेक्षकांना दुःखाचा विसर पडून हास्याचा सुगंध अलगद वेचता येतो .
झाडीपट्टी नाटकांतूनही लेखक विनोदी प्रसंगाचे रेखाटन करतात . त्या प्रसंगांना जिवंत करण्याचे महत्कार्य विनोदी कलावंत करतात . प्रा . शेखर डोंगरे , के. आत्माराम , गोपी रंदये , किरपाल सयाम , अंबादास कामडी , अरविंद झाडे , भुपेश शिंदे , विलास पेंटर , एम .के. जादूगर ,रविंद्र धकाते , प्रविण वाघमारे , पी. लालचंद , जगदिश देशमुख , संदीप गंधारे यासारखे अनेक विनोदवीर प्राण ओतून साकारलेल्या अभिनयाने रसिकांना पोट धरून हसायला लावतात . त्यापैकी हिरालाल पेंटर हे एक महत्त्वाचे विनोदी कलावंत आहेत . हिरालाल पेंटर म्हणजे झाडीच्या विनोदाला पडलेले गोड स्वप्नच !

हिरालाल पेंटर , असं नुसतं नामोच्चारण केलं , तरी समोरच्या चेह-यांवर हास्याचा टवटवीत पारिजात फुलल्या शिवाय राहत नाही . विनोदाची खाण आणि टायमींगची उत्तम जाण असणारा हा कसदार अभिनेता रंगमंचावर प्रगटल्यानंतर खळखळून हसला नाही तो प्रेक्षकच कसला ? इतकी त्याची ख्याती ! हसता हसता रसिकांची पुरेवाट लावण्यात तरबेज असणारा हास्याचा हा प्रचंड धबधबा , ” विनोदाचा बादशहा – हिरालाल पेंटर “म्हणून समस्त झाडीपट्टीत सुप्रसिद्ध आहे . शिवाय त्यांच्यातील नाना कलाविष्कारांनी ” हिरालाल पेंटर ” हे नाव झाडीच्या रसिक मनावर आजतागायत अधिराज्य गाजवत आहे आणि निर्विवाद राहील सुद्धा .

ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी या छोट्याशा गावात जन्मलेला आणि तिथेच पैलू पडलेला हा हिरा ख-या अर्थाने ” झाडीचा हिरा – मानाचा तुरा” ठरला आहे .

” आठवी पास ,नववी नापास !” अशी स्वतःची विनोदी शैलीत ओळख करून देणारा हिरालाल तिसरीत , सहावीत आणि नववीत जणू तिनच्या पाढ्यात नापास होत गेला . नववीत शिकत असतांना परीक्षेच्या चिखलात विषयांचा गाडा असा काही रूतून बसला की पुढे पास होऊन ओढताच आला नाही . आणि नववी नापासचा ठपका बसला तो आजतागायत कायम आहे . शालेय परीक्षांत सातत्याने नापास होणारा हा अवलीया जिवनाच्या परीक्षेत मात्र गुणवत्ता यादीत झडकला. त्यातल्या त्यात गणित विषयात भोपळा घेणा-या हिरालालचे आयुष्यातील सारी गणितं जुळत गेलीत . असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . दोन मुले आणि एक मुलगी असा संसार रथ सुशील पत्नीच्या यशश्वी सोबतीने ते ओढत आहेत . उच्च शिक्षित मुलीचे लग्न झाले असून ती सुखाने संसार करत आहे .त्यांचे जावई दिल्ली येथे नेव्हीत कार्यरत आहेत .

” मुलाचे पाय पाळण्यात दिसतात .” ही लोकोक्ती जरी खरी असली तरी समाजात जीवन जगत असतांना एखाद्याच्या सुप्त गुणांना वाव मिळाला नाही तर पुढे त्याचे नाव होत नाही . अस्सल हि-याची पारख करण्यासाठी एखादा जोहरीच असावा लागतो .त्या हि-याला पैलू पडले की मग मात्र दुनियेच्या बाजारात त्याचं नाणं खणखणीत होते . हिरालालच्या आयुष्यातही असाच एक जोहरी श्री .चहांदे गुरूजींच्या रूपाने आला . इयत्ता तिसरीत असतांनाच त्याला पैलू पाडले . श्री. चहांदे गुरूजींनी त्याला पाच मिनिटांचे किर्तन लिहून दिले . योग्य सराव करून सादरीकरण केले . त्या विनोदी किर्तनाचे सादरीकरण इतके झकास होते की गणपती , दुर्गोत्सव , लग्न आदी कोणत्याही ठिकाणी हमखास सादर केले जायचे . लोकांची वाहवा , हशा आणि टाळ्यांनी हा बाल किर्तनकार हरकून जायचा .सत्यपाल महाराजांच्या किर्तनाचे आॕडिओ कॕसेटस् , किर्तनाची पुस्तके वाचून त्यांनी आपल्यातील किर्तनकार आजही जिवंत ठेवला
. सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज , तुषार सूर्यवंशी , इंजी . थुटे महाराज यांची किर्तनं आणि ग्रामगिताचार्य बंडोपंंत बोढेकर यांचे मार्गदर्शन त्यांच्या प्रबोधनाच्या वाटेवरील मैलाचे दगड ठरले .
कालचा बालकिर्तनकार आज ह.भ.प.झाला .
ह.भ.प. म्हणजे “हळूच भलतीकडे पाहणारा महाराज ” असे ते विनोदाने वर्णन करतात . आपल्या विनोदी शैलीतून हा ह.भ.प. अज्ञान ,अंधश्रद्धा , मुलींचे शिक्षण ,ग्राम स्वच्छता आदी अनेक विषयांवर ताशेरे ओढत राष्ट्रसंतांचे विचार पेरतो .
इयत्ता तिसरीत असतांनाच त्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला . यात त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले . भेट म्हणून डब्बा मिळाला . शिदोरीचा डब्बा !हातातील कुंचल्याने उपजिविकेचे साधन उपलब्ध करून दिले . चित्र कोरणे , नावे लिहिणे ,लग्न समारंभात भिंतीवर चित्र काढणे , पुढे पुढे तर कुंचल्यानी नाटकांचे पोस्टर्स रंगवणे , नाटकाचे पडदे रंगवणे आदी महत्वपूर्ण कामे हाती आली . विशेषत्वाने बिसेन आर्ट , किन्ही यांचेकडे त्यांनी नाटकाचे नेपत्थ्य , पडदे आदींचे रंगकाम केले . कामांची प्रशंसा झाली . त्यामुळे हिरालाल सहारे हे पंचक्रोशीत ” हिरालाल पेंटर ” याच नावाने सुप्रसिद्ध झाले .
लग्न प्रसंगी घराच्या दर्शनी भिंतीवर काढलेल्या चित्रांमध्ये वाघाचे चित्र पंचक्रोशीत फेमस होते . आजही आहे . मुंबईतील त्यांचे नातेवाईक सुद्धा वाघाच्या प्रेमात पडले. आकर्षक रंगसंगतीतून साकारलेला पट्टेदार वाघ बैठक खोलीच्या भिंतीवर ऐटीत बसला . ख-या अर्थाने चांद्याचा वाघ बांद्यात पोचवण्याचे कसब हिराभाऊच्या कुंचल्याने साकार केले असेच म्हणायला हवे.
या कुंचल्याची भुरळ कित्येकांना पडली . हिराभाऊची लग्न गाठ बांधण्याचे महत्वपूर्ण कार्य कुंचल्यामुळे साकार झाले . घरजोड्या कुंचल्याची हकीकत खुमासदार शैलीत सांगतांना पेंटर म्हणतात,” बोथलीला लग्नाची पेंटिंग करत होतो . गणपतीचे चित्र कढत असतांनी चारपाच बाया , पोरी चित्र पाहात होत्या . तेथली एक पोरगी मालं पसंत पल्ली . तिलं बिस्किटचा पुळा देलो .
नंतर ती आमच्या घरी आली . एका लग्नाच्या वरातीवर जातांनी नाही का जी . वरातीचं बंडी , खासरा आमच्या घरासामने थांबले . पाणी पेण्यासाठी पोरी ,बाया आमच्या घरी आल्या .ते पोरगीही होती . तिना घराची पाहाणी केलन . आमच्या घरच्यायलं ते पसंत पल्ली आणि मंग कोठी आमचा लग्न जुल्ला . तेच पोरगी माझ्या आयुष्यभराची जोडीदार झाली . ” गुरूदेव सेवा मंडळ मालडोंगरी येथे 12 जानेवारी 1991 ला त्यांची लग्नगाठ बांधल्या गेली .
.

मा. दादा पारधी नावाचे सुप्रसिद्ध नकलाकार त्यांना गुरूस्थानी लाभले . त्यांनी त्यांच्यातील नकलाकाराला नवा आयाम दिला . या निमित्ताने आपसूकच त्यांचेवर अभिनयाचे संस्कार होत गेले . ” शेंबडा विद्यार्थी , माहा लगन कवर होईल , खेड्यातली बाई मुंबईला गेली ” अशा एक ना अनेक नकलांतून त्यांनी रसिकांची दाद मिळवली . माजी आमदार स्मृतीशेष बाबासाहेब खानोरकर , माजी आमदार उद्धवराव सिंगाडे यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल ते करायचे . तथापि नकलांपेक्षा विनोदी किर्तनच वरचढ ठरत गेले . हे विशेष .

” एक तरी अंगी असू दे कला ” राष्ट्रसंतांच्या या उक्ती पल्याड हिरालाल पेंटर यांची धाव आहे . एक नाही तर अनेक कलागुणांचा संगम असलेली ही वल्ली ख-या अर्थाने अष्टपैलू आहे .
इतर कलाकारांसोबत त्यांनी जादूचे प्रयोग सादर केले . पिढ्यान् पिढ्या मानगुटीवर बसलेले अंधश्रद्धेचे भूत , अज्ञान घालवण्यासाठी या कलेचा विनोदी ढंगाने वापर केला . हसत , खेळत , मनोरंजन करत जनमानसांचे प्रबोधन करण्याचा त्यांनी जणू विळाच उचलला . जादूचे प्रयोग शिकवणारे त्यांचे गुरू मा. जादूगर विजयकुमार हे पाटबंधारे विभागात कार्यरत होते . एकदा ते उदापूरला कार्यक्रम बघायला आले होते . त्यांनी पेंटरच्या नकला आणि किर्तन बघून सोबत येण्याची गळ घातली . सोबत जादूचे प्रयोग शिकवण्याचे आणि मानधनाचे प्रलोभनही दाखवले . पण पेंटरच्या आई वडीलांनी विरोध दर्शवला . ” काहालं जातेस रे . तो जादूवाला आहे . काही बाही करून गिरून टाकलं .” ही अनामिक भीती घातली . पण न घाबरता त्यांनी जादूगर विजयकुमारची वाट धरली . त्यांचे दारावर तीन एक्के आणि साई बाबांची मुर्ती बघून पेंटर आश्चर्य चकित झाले . त्यांच्या सोबत राहून जादूचे प्रारंभिक धडे घेतले . तद्नंतर विजयकुमारांना जादूच्या प्रयोगात सहाय्य केले . दोनशे पन्नास रूपयांचे मानधन ते देत असायचे . त्यामुळे जादूचे शिक्षण आणि आर्थिक मदत असा दुहेरी लाभ यातून मिळत गेला .
मा. विजयकुमारांच्या मृत्युनंतर हिरालाल पेंटर यांनी स्वतंत्रपणे जादूचे प्रयोग दाखवायला सुरवात केली . विविधांगी मिश्र कार्यक्रमांतून जादूच्या प्रयोगांची पायाभरणी करत कौशल्य प्राप्त केले . ही ” जादू ” अर्थात ” हात सफाईचे खेळ ” हे या ठिकाणी प्रकर्षाने मला नमूद केले पाहिजे . आज त्यांचेकडे जादूच्या प्रयोगांचे दोन संदूक भरून उरतील एवढी साहित्य आहेत .नवनवे साहित्य बनवण्याचे कार्य अजूनही चालूच आहे .

पेंटर , विनोदी किर्तनकार , नकलाकार , जादूगर या विविधांगी कलांमुळे जनमानसात त्यांच्या परिचयाचा चंद्र कले कलेने वाढत गेला . हिरालाल पेंटर यांना पंचायत समिती अंतर्गत वेगवेगळ्या अभियानात कलापथकांचे कार्यक्रम मिळायला लागले . पोलीस जनजागरण मेळाव्याचेही कार्यक्रम मिळत गेले . गावोगावचे सरपंच ते आमदार -खासदार असा परिचयाचा आलेख वाढत गेला . शासकिय कर्मचारी ,अधिकारी यांच्याही ओळखी वाढल्या . परंतु या ओळखीचा फायदा वैयक्तिक आयुष्यासाठी कधीच करून घेतला नाही .
माजी आमदार ह.भ.प. उद्धवराव सिंगाडे महाराज यांचेशी खास मैत्री झाली . हिरालाल पेंटर यांच्या सहवासातून त्यांनी “अशीच राहावी प्रित साजना , दारू पाई विकली बाई , वेशेच्या द्वारी येती ब्रम्हचारी ” आदी नाटकांचे लेखन , सादरीकरण आणि अभिनय देखील केला .

झाडीपट्टी म्हणजे अनेक कलांचे माहेर घरच जणू . दंडार , नाटक , तमाशा ,गोंधळ , खडी गंमत, डहाका , कव्वाली या कलांना लोकाश्रय मिळाल्यामुळे त्या आजही जिवंत आहेत . दंडार आणि नाटक म्हणजे झाडीपट्टीचा प्राण ! हिरालाल पेंटर यांनीही चिलीया बाळ , नागसेन बाळ यासारख्या दंडारीतून भुमिकाभिनय केला . त्यांचा पंचमात लागणारा स्वर हा दंडारीत गाणे म्हणण्यासाठी फारच महत्त्वाचा ठरला .
नाटकांचे पोस्टर रंगवतांना त्यांचा नाटकांशी अप्रत्यक्ष संबंध येत राहिला . परंतु उदापूरचे कलावंत मा. अनिल नाकतोडे यांचे घरी ” धर्म भाष्कर ” नाटकाचे पोस्टर रंगवतांना ” मालंही एखांदा रोल द्या ना जी .” अशी गंमत केली . पुढे हीच गंमत लोकरंजनासाठी , रंगभूमीच्या सेवेसाठी , अर्थार्जनासाठी आणि नावलौकिकासाठी आयुष्यभराला कामात येईल असे हिराभाऊंना स्वप्नातही वाटले नसेल . योगायोग म्हणजे ” धर्मभाष्कर ” नाटकात त्यांना ” शाहिराची ” छोटेखानी भुमिका मिळाली . तेही नटवर्य मोरेश्वर खानोरकर , टी. खरकाटे ,गितांजली या सारख्या नामवंत कलावंतांसोबत . हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल . पहिल्याच प्रयोगात रसिकजनांची दाद मिळाली . रंगदेवता प्रसन्न झाली . यानंतर नाटकांचे दालन त्यांच्यासाठी सर्वार्थाने खुले झाले . पुंडलीक ठाकरे यांच्या पुढाकाराने चिकमारा आणि कोंढाळा येथे ” शिवा रामोशी ” नाटकात मखमलीची भुमिका मिळाली .

झाडीपट्टी नाटकांच्या महाराष्ट्र ललीत कला रंगभूमी , भारत नाट्य रंगभूमी , ” धनंजय स्मृती रंगभूमी ” गृपला विनोदी कलावंत म्हणून त्यांची वर्णी लागली आणि मागे वळून बघायलाच लागले नाही . शेखर पटले , ज्ञानेश्वरी कापगते , पुजा बन्सोड , शुभलक्ष्मी या सहकलावंतांसह रंगमंचावर अभिनय साकारता आला .
सिंहाचा छावा , ब्रम्हाकुमारी , चमके शिवबाची तलवार , संत गोरा कुंभार , प्रित जमली चाळातून , झांशीची राणी , लावणी भुलली अभंगाला अशा एक ना अनेक नाटकांतून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले . पसंतीस उतरले . दिवाळी ते होळी असा 165 नाटकांचा पल्ला दर वर्षी पार करत त्यांनी रंगमंच जिंकला . ” सयमाया सजनीले चैनच पडेच ना ” हे गीत हिरालाल पेंटर यांनी नाटकाच्या माध्यमातून गावागावात अबाल वृद्धांपर्यंत पोचवले . हिरालाल पेंटर हे दादा कोंडके यांचे चाहते असल्यामुळे “ढगाला लागली कळ “असो की “चल खेळ खेळू दोघे” हे लोकप्रिय गाणे सुद्धा रंगमंचावर सादर करायचे . धनंजय स्मृती रंगभूमीने पंधरा वर्ष या कलावंतावर मायेची पाखर धरली .

सुरवातीला त्यांना नाटकाचे मानधन फक्त पन्नास रूपये मिळायचे . नंतर ते पाचशे पन्नास , सहाशे पंचवीस , नऊशे आणि तेराशे असे वाढत गेले.

नृत्यबिजली लावणी साम्राज्ञी ज्ञानेश्वरी कापगते आणि विनोदवीर हिरालाल पेंटर हे समिकरण इतके जुळले की ज्या नाटकात ही जोडी असेल ते नाटक हाऊसफुल जायचे .

त्यानंतर राजसा नाट्य कला रंगभूमीची निर्मिती करण्यात आली . राजसा यात गुढ अर्थ दडलेला आहे . रा- रामचंद्र , ज-जमनाबाई ,सा – सायत्राबाई , वडील आई आणि आजी यांच्या स्मरणार्थ रंगभूमीला हे नाव दिल्या गेले .
यात लेखक – दिग्दर्शक देवेंद्र लुटे , पुजा पिंपळकर , शेखर पटले , किरपाल सयाम , विलास वटी , अशोक दुधकुंवर , शुभलक्ष्मी ,पौर्णिमा काळे या यशश्वी कलावंतांची सोबत होती .
सुनबाई जरा जपून ( लेखक संजय ठवरे ), सासूरवासीन ( लेखक देवेंद्र लुटे ) , सून सांभाळा पाटलीन बाई ( लेखक देवेंद्र लुटे ) , विसरू नको रे आई बापाला , पोरगी फसली रे फसली , ह्या नाट्य कलाकृती प्रचंड गाजल्या .
हिरालाल पेंटर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती झाडीपट्टी नाटकांमुळे . ते पट्टीचे विनोदवीर म्हणून नावलौकिकास आले . भुमिका कळली आणि अभिनय रक्तात भिनला . तथापि लेखणी आणि पेंटर यांचे जवळचे नाते नसतांना देखील ते नाट्य लेखक म्हणून उदयास आले . आठवी पास नववी नापास ,एका अल्प शिक्षित माणसाची लेखणी लोक पसंतीस उतरली . याचा किस्सा फार मजेदार आहे .
राजसा रंगभूमी जवळ नवे नाटक नसल्यामुळे गोची निर्माण झाली होती . झाडीपट्टीच्या लेखकांचे उंबरठे झिजवून थकल्यानंतर काय करावे असा प्रश्न आवासून उभा असतांना त्यांना साक्षात्कार झाला . जिद्द , चिकाटी आणि नाटकांचा पूर्वानुभवाच्या हिंमतीवर त्यांनी नाट्य लेखणाचे शिवधनुष्य संयतपणे पेलले . गावाशेजारी असलेल्या गोपाळ समाजाच्या समस्यांनी त्यांचे लक्ष वेधले . त्या समस्या आणि राष्ट्रसंतांचे विचार ” मायेची पाखरं ” या नाटकातून उजागर करता आले . पहिल्याच वर्षी नाट्य निर्माता , लेखक आणि कलावंत म्हणून 75 नाटकांचा पल्ला गाठता आला .

त्या नंतर आदिवासी मुलींच्या शिक्षणावर आधारीत ” कष्टाची शिदोरी ” हे नाटक रंगभूमीवर आले . या नाटकाचे एकाच महिण्यात एकाच रंगमंचावर दोनदा प्रयोग करण्याचा सन्मान शेगाव (बु. ) ता. वरोरा येथे मिळाला .
झाडीपट्टी नाटक , निर्माता , कलावंत यावर ताशेरे ओढणारे ” अनाथांची माय ” , धार्मिक विषयाचा आलेख मांडणारे ” दगडाचा देव ” ह्या नाटकांचे त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले .

त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा विशाल सहारे सुद्धा नाट्य क्षेत्रात यशस्वी पाय रोवतो आहे .” उघडं पडलं घरटं माझं ” या नाटकात बालकलावंत असलेला विशाल ” कष्टाची शिदोरी “सारख्या नाटकांतून खलनायक साकारतो .हा खलनायक पहातांना प्रेक्षकांच्या अंगात कापरे भरतात .

झाडीचा हिरा केवळ नाटकांतच नाही तर छोटा पडदा आणि मोठा पडदा या दोन्हीवर झळकला . टि.व्हीवर दिसावं . या प्रसार माध्यमांतून आपण महाराष्ट्रातील घरा घरात पोहचावं . आपल्याही नावासमोर सिनेस्टार लागावं . ही प्रत्येक कलावंताची आंतरीक इच्छा असते .” दे गा हरी खाटल्यावरी ” असं होत नाही . त्यासाठी अंगीभूत कला , मनापासून तळमळ , धडपड आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते . जिवाची मुंबई करणाऱ्यांना हे यश नक्कीच पदरात पडते . नुसता टिव्हीवर दिसलो पाहीजे ही सुप्त इच्छा साकार करण्यासाठी ” क्लोजप अंताक्षरी ” चा सेट गाठला . त्यातून ते प्रेक्षक म्हणून टि. व्ही वर दिसले . टि.व्हीतून लोकांपर्यंत पोहचण्याची सुप्त इच्छा पूर्णत्वास आली . मग काय ” जित्याची खोड ” या टि. व्ही. शो मध्ये अभिनयाची संधी मिळाली .
सिनेस्टार प्रेमा किरण झाडीपट्टी नाटकांमधे आल्यानंतर त्यांचेशी मैत्री झाली . त्यांच्या परिचयामुळे माहेरची साडीचे सिनेदिग्दर्शक पितांबर काळे यांचेशी ओळख झाली . अविनाश नारकर ,ऐश्वर्या नारकर , दीपक देऊळकर ,निशिगंधा वाड , अंकुश चौधरी , रमेश भाटकर या दिग्गज सिनेनटांच्या महत्वपूर्ण भुमिका असलेल्या ” तूच माझी भाग्य लक्ष्मी ” या चित्रपटात छोटीशी भुमिका मिळाली . झाडीपट्टीच्या ” सून सांभाळा पाटलीन बाई ” या गाजलेल्या नाट्यकृतीवर आधारीत त्याच शिर्षकाच्या चित्रपटातही महत्वपूर्ण भुमिका साकारता आली . या चित्रपटाचे चित्रीकरण कुही , गुरनोली ,मालडोंगरी या परिसरात झाले . अलंकार टॉकीज ब्रम्हपुरी येथे हा मराठी चित्रपट सर्वाधिक चालल्याची नोंद आहे .
” चमत्कारी गणेश ” या चित्रपटात त्यांचेवर नृत्य चित्रित करण्यात आले .
” झाडीवूड” सिनेमातून देखील ते झडकणार आहेत .

17 फेब्रुवारी 2020 ला मुंबई दूरदर्शन वरून लाईव्ह मुलाखतीचे प्रसारण करण्यात आले .
मनाली दिक्षित मुलाखतकार होत्या. मुंबई दूरदर्शनचे मा. आलोक खोब्रागडे ,मा. अमोल शेंडे , मा. राणी कोटांगणे यांचे विशेष सहकार्य लाभले .
1990 ला आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून पहिली मुलाखत प्रसारीत झाली .हा आनंद शब्दातीत आहे . मा. श्रीराम धोटे , मा.अनिल देशमुख कार्यक्रम अधिकारी यांच्या सहकार्याने ही मुलाखत पार पडली होती . गोकुळ कार्यक्रमातून या मुलाखतीचे प्रसारण करण्यात आले होते . पुढे तीन चारदा चंद्रपूर , नागपूर आकाशवाणीहून मुलाखतींचे कार्यक्रम प्रसारीत करण्यात आले .

” झाडीचा हिरा -मानाचा तुरा ” या गीतांच्या व्हिसीडी कॕसेटची निर्मिती सिने . देवेंद्र दोडके आणि प्रशांत नाकाडे यांनी केली . महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे हस्ते या कॕसेटचे विमोचन करण्यात आले . ” किती गुणी माझा वतन ” या गाण्याने रसिकांची मनं जिंकली .
त्यानंतर ” गोरी गोरी झुमकेवाली ” या आॕडीओ गितांच्या सि.डी.चे लोकार्पण करण्यात आले .

“सून सांभाळा पाटलीन बाई ” नाटक मुंबईच्या सिनेकलावंतांसह यशवंत नाट्य मंदिरात सादर केले . ही बाब झाडीपट्टी नाटकांच्या दृष्टीकोनातून अधोरेखित करण्यासारखीच आहे . यात सिनेस्टार मोहन जोशी , पुजा पिंपळकर , देवेंद्र लुटे , विक्रम मोरे यांनी भुमिका साकारल्या होत्या .

सिनेसृष्टीतील मोहन जोशी , विलास उजवणे , चेतन दळवी , प्रेमाकिरण या दिग्गज कलावंतांना झाडीचे वेध लागले . त्यांचे सोबत हिरालाल पेंटर यांनी झाडीचा रंगमंच गाजवला .

नाटकांच्या बाबतीत अनेक कडू गोड अनुभव त्यांच्या वाट्याला आलेत . अनुभव हाच खरा गुरू असल्याचे ते सांगतात . या अनुभव आणि आठवणींचा खजिना ” मी असाच आहे ” या आत्मचरित्राच्या रूपाने भविष्यात ते वाचकांसमोर ठेवणार आहेत .
तत्पुर्वी काही मोजक्या आठवणींचा मेवा खास आपल्या पुढ्यात ठेवतो .
” लावणी भुलली अभंगाला ” या नाटकात चारूदत्त आफळे , कमल आगलावे ,अर्चना कुबेर यासारखे नामांकीत कलावंत होते . यात त्यांना छक्क्याची (भवान्या ) भुमिका होती . मेकअप करतांना त्यांना विंचवाने नांगी मारली . हळूहळू विष अंगात भिनायला लागलं . डोळ्यात वेदनांचा पाऊस आणि अंगात जळफळाट होत होता . असे असतांनाही त्यांनी तीन चार जादूचे प्रयोग दाखवून रसिकजनांची मने जिंकली .
” शाहिराची बाजू घ्यावी तर गंगाबाई रूसून बसत्यात . आणि गंगाबाईची बाजू घ्यावी तर शाहीर रूसून बसत्यात . ढोलकीवानी गत झाली आहे माझी ! ” भवान्याच्या या वाक्याने त्यांच्या डोळ्यातून ओघळणारा अश्रूंचा पूर रसिकांच्या मनाचा ठाव घेत टाळ्या घेऊन गेला . ” वाह , काय जिवंत अभिनय ! ” म्हणत प्रेक्षकांची प्रसंशा मिळाली . पण आंतरिक वेदना मात्र विंचवाने दिली होती . याची साधी भनक देखील प्रेक्षकांच्या गावी नव्हती . रात्री मारलेल्या विंचवाचा डंख दुस-या दिवशीच उतरला . दुस-या दिवशी जेवणाळा येथे असलेले नाटक भारी पावसामुळे रद्द झाले . त्यामुळे वैद्यकिय उपचारासाठी आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळाला .
हिरालाल पेंटर यांनी साकारलेला छक्का इतका अप्रतिम की पुरूषांना भुरळ पडावी . मेकअप केल्यानंतर एखाद्या स्त्रीला लाजवेल एवढे ते रूपवान दिसायचे . त्यामुळे मखेपल्ली गावात त्यांना विनयभंगाला सामोरे जावे लागले . कलावंतांच्या सतर्कतेमुळे अतिप्रसंग टळला . अन्यथा नटरंगचा “गुणा” व्हावे लागले असते .

कारू टोला जि. गोंदिया येथे “राया गेले वाया ” ह्या नाटकाची नांदी संपताच आॕरगान मध्ये बिघाड पडला . कोणीच हार्मोनियम सुद्धा उपलब्ध करून दिली नाही . त्यामुळे संबंध नाटक तबल्याच्या ठेक्यावर पार पडले .
खडकी ( पान्होरी) येथे सिने. रमेश भाटकर केवळ ” सून सांभाळा पाटलीन बाई ” हे नाटक बघावयास आले असतांना ” हिरालाल , विनोदाचे टायमिंग सांभाळणारे अजब रसायन !” असे गौरवोद्गार काढतात . ही कौतुकाची थाप एखाद्या पुरस्कारा पेक्षा कमी नव्हतीच .

मराठी सिनेस्टार अलका कुबल एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागभिड येथे आल्या असतांना त्यांचे आईलपेंटने रंगवलेले पोर्ट्रेट भेट देऊन शाब्बासकीची थाप मिळवली .

” दगडाचा देव ” नाटकाच्या मेकअप रूममध्ये एकदा अजगर दिसला . दोनदा स्पिकर बांधतांना कामगार पडले . मुंडीपार ( गोंदिया ) येथे अचानक पडदा पेटायला लागला . सुदैवाने या संकटांच्या मालिकेतून फारसे नुकसान झाले नाही . परंतु पुन्हा संकटांना निमंत्रित करण्यापेक्षा सर्व कलावंत , तंत्रज्ञांच्या विनंतीनुसार अल्पावधीतच ह्या नाटकाचे प्रयोग बंद करावे लागले .

हिरालाल पेंटर हे एक पट्टीचे कलावंत आहेत . तथापि ते हाडाचे शेतकरी सुद्धा आहेत . शेतीच्या उपकाराची आणि शेतक-यांच्या कष्टाची जाणिव त्यांना आहे . आपल्या रोजमर्रा जिंदगीतून त्यांनी ते सोसलं आणि भोगलं सुद्धा ! ‘अस्मानी ,सुलतानी संकटांना भीक न घालता धैर्याने सामना केला पाहिजे . आत्महत्या हा त्यावरचा अंतिम इलाज नव्हे .’ असे त्यांचे ठाम मत आहे .
साधारणतः पंधरा वर्षांपूर्वीच्या घटनेवरून याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. शेतात पेरलेला धान अती पावसामुळे उगवलाच नाही . त्यामुळे त्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले . परंतु घरात पेरायला धान शिल्लक नव्हते . मग काय ? त्यांनी इतर शेतक-यांच्या शेतात पेरून उरलेले मिळतील त्या धानाचे परे आणून आपल्या शेतात रोवणी केली . कमी अधिक दहा बारा प्रकारचे धान रोवल्यामुळे शेतात “अनेकता मे एकता” दर्शवनारा नकाशा निदर्शनास येत होता . काही धान आधी निसावला तर काही उशीरा . कुठे उंच कुठे सखल , कुठे हिरवं तर कुठे पिवळं सोनं लखलखत होतं . शेताचे हे चित्र विचित्र रूप वृत्तपत्रांच्या माध्यमांनी अचूक हेरले आणि लोकांसमोर ठेवले . ” हा कुठला धानाचा प्रकार ? ” असं विचारताच नेहमीप्रमाणे विनोदी पण मार्मिक उत्तर देत पेंटर उद्गारले , ” हा सर्व धर्म समभाव धान हो जी !” शेतातील धानाच्या माध्यमातूनही त्यांना राष्ट्रसंतांचे विचार जनमानसात पेरता आल्याचे समाधान ते व्यक्त करतात . तत्कालीन आमदार इंदूताई नाकाडे यांनी या धानाची स्तुती केली होती . धान पिकणार की नाही याविषयी शाशंक असतांना अकरा पोते रास दारात आल्याने वर्षभराच्या भाताचा प्रश्न सुटला होता . रोवणीच्या कामात त्यांची पत्नी आणि त्यांचा जिवलग मित्र नवलाजी पिलारे यांची मोलाची साथ मिळाली होती . खरे उपकार उरलेले परे देणाऱ्या गावातील शेतक-यांचे होते .

राजकारणी मंडळींच्या निवडणूक प्रचारात किंवा अन्य ठिकाणी सुद्धा हिरालाल पेंटर यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले .
राजकारणात राजकारण्यांनी त्यांचा वापर केला परंतु राजकारणाचा त्यांना फायदा झाला नाही . राजकारणावर माझा विश्वास नाही . राजकारण माझ्या रक्तात नाही . अशी खंत ते स्पष्टपणे बोलून दाखवतात .
सांस्कृतिक विभागाने कलावंतांसाठी किमान पाच हजार महिना मानधन लागू करायला हवे . कलावंतांना आमदार खासदारांसारखे पेंशन मिळायला पाहिजे . कोरोनात अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत . सरकारने त्यांना मदतीचा हात द्यायला हवा . पोटतीडकीने सरकार दरबारी अशा मागण्याही ते मागतात .

पद …

हिरालाल पेंटर हे कलावंत म्हणून जेवढे लोकप्रिय आहेत तेवढे एक व्यक्ती म्हणून . त्यांच्यातील संघटनात्मक कौशल्यांमुळे अनेक संघटनांची महत्वपूर्ण पदे त्यांनी भुषविली आहेत .
झाडीपट्टी नाट्य रंगभूमी , वडसाचे पहिले अध्यक्ष अनिरूद्ध वनकर असतांना ते उपाध्यक्ष राहिले आहेत . चंद्रपूर जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समिती सदस्य ,
झाडीपट्टी नाट्य निर्माता संघटना उपाध्यक्ष ,
झाडी नाट्य विकास मंडळाचे विद्यमान सचिव
आदी संस्थांच्या कार्यात्मक वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा आहे .

पुरस्कार…

1997 ला हिरालाल पेंटर आणि अनिरूद्ध वनकर हे जिल्हा युवा पुरस्काराचे मानकरी ठरले . मानव विकास संसाधन मंडळा तर्फे हा पुरस्कार घोषित करण्यात आला होता .
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद , मुंबई अंतर्गत
गोविंद बल्लाळ देवल यांचे स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा स्व. दादू इंदूरीकर पुरस्कार जाहीर झाल्याचे
मुंबईहून सिने . स्मिता तळवळकर यांनी फोनवर कळवले होते . तो क्षण अविस्मरणीय असल्याचे ते सांगतात . रविंद्र नाट्य मंदीर मुंबई येथे हा पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न झाला . या सोहळ्यात ” सून सांभाळा पाटलीन बाई ” या नाटकातील एक प्रसंग सादर करण्याची संधी मिळाली . या संधीचं सोनं करण्यासाठी साथीला पुजा पिंपळकर होत्या . ” किती गुणी माझा वतन ” या गाण्याने सभागृहाची मने जिंकली . जाधव साहेब , अशोक हांडे , वंदना गुप्ते यासारख्या सिनेनट दिग्दर्शकांनी प्रेमाने पाठ थोपटली .
हिरालाल पेंटर हे ब्रम्हपुरी भुषण ” आहेत . जादूच्या प्रयोगांसाठी ” जादूगर मायाजाल “गौरव पुरस्काराचे ते मानकरी आहेत .पु.ल. देशपांडे कॉमेडी स्पर्धा 2019 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा सन्मानही त्यांना प्राप्त झाला .

हिरालाल पेंटर हे सामान्य शेतकरी कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतात . त्यांची मुलगी तीन वर्षाची होईपर्यंत त्यांच्या घरी पंखा नव्हता . कलेच्या पैशांतून त्यांनी 12000/- रूपयांची M_80 खरेदी केली . दुःख ,दैन्य , दारिद्रयाची असह्य होरपळ त्यांनी सोसलेली आहे . त्यातून तावून सुलाखून निघालेला हा अस्सल हिरा झाडीच्या रसिकांसाठी , रंगभूमीच्या सेवेसाठी आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण खर्ची घालतो आहे . ” माझा जनतेवर विश्वास आहे . कलेवर निष्ठा आहे .माज नाही पण कलेचा अभिमान आहे . ” असे ते छातीठोकपणे सांगतात . उर्वरीत वेळ सुद्धा जनजागृती करण्यात खर्ची घालणार असल्याचे ते सांगतात . हिरालाल पेंटर हे आजही चौकात , रस्त्यावर जिथे उभे असतील तिथे उपस्थितींचे विनोदी शैलीत प्रबोधन करत असतात . .त्यांना शेखर डोंगरे , आत्माराम खोब्रागडे , देवेंद्र दोडके , देवेंद्र लुटे , पुजा पिंपळकर यांचा सहवास आणि मार्गदर्शनाचा लाभ झाला .

त्यांनीही अनेक कलावंतांना मार्गदर्शन केले . प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे घडवले . इतरांची नक्कल करणा-या या कलावंतांची नक्कल उरवतांना पाहून समाधान व्यक्त करतात .हसत खेळत , चालत बोलत अस्सल मायबोलीतून ते लोकसंवाद साधत असतात .
त्यामुळे ख-या अर्थाने हा अवलिया विनोदाचे चालले बोलते विद्यापिठच आहे .
लअशा या सच्च्या कलावंतास लोकरंजनासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी अगणित शुभेच्छा !!!!!

***********************************
✒️लेखक:-रोशनकुमार शामजी पिलेवान(मु.पो. पिंपळगाव भोसले ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर पिन 441206 मो. 779850981
***********************************