गोंडवाना विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दरवर्षी निधी उपलब्ध करणार – मंत्री विजय वडेट्टीवार

28

🔹दशमानोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सिनेअभिनेते नितीश भारद्वाज उपस्थित

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.3ऑक्टोबर):- गोंडवाना विद्यापीठाच्या दशमानोत्सव कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात मंत्री विजय वडेट्टीवार व महाभारतात श्रीकृष्णाची भुमिका साकारणारे नितीश भारद्वाज यांच्या दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मंत्री वडेट्टीवार यांनी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी दरवर्षी शासनाकडून किमान 25 कोटी रूपये मिळावेत यासाठी नियोजन करणार असल्याचे सांगितले. विद्यापीठास शाश्वत निधीतून आपला विस्तार सहज करता येईल असे ते म्हणाले.

यावेळी मंचावर विद्यापीठाचे कुलगूरु श्रीनिवास वरखेडी, महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे डॉ. निपुन विनायक, संस्थापक अध्यक्ष ज्ञान फाऊंडेशन, नागपूरचे अजिंक्य कोत्तावार, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील डॉ. राजेंद्र कुंभार, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ मेश्राम, माजी आमदार नामदेवराव ऊसेंडी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल चिताडे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, तसेच व्यवस्थापन परिषदेचे व अधिसभेचे सदस्य, प्राचार्य राजुभाऊ मुनघाटे आणि रुसाचे कन्सल्टंट महाराष्ट्र राज्य, डॉ. प्रमोद प्राभदेकर उपस्थित होते.

आपल्या भाषणात विजय वडेट्टीवार यांनी विद्यापीठाला शुभेच्छा देऊन 10 वर्षापुर्वी गोंडवाना विद्यापीठ एक लहान रोपटं होतं आता त्याचे रुपांतर वटवृक्षामध्ये झाल्याचे त्यांनी म्हटले. अत्यंत दुर्गम, मागास व नक्षलग्रसत जिल्ह्यामध्ये आधी उच्च शिक्षणाची संधी नव्हती. आता विद्यापीठ निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्याकडे जाण्याची आवश्यकता नसून आपल्या गडचिरोली जिल्ह्यातच उच्च शिक्षणाची संधी निर्माण होत आहे. काही दिवसात इंजिनिअरींग कॉलेज विद्यापीठाचा भाग असेल असे ते यावेळी म्हणाले. उच्च शिक्षणाच्या सोयी इथे निर्माण व्हाव्यात म्हणून ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे मनापासून आभार मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मानले. विद्यापीठाला सर्वांगीण विकासाची संकल्पना आहे. विद्यापीठाच्या वाढीसाठी, प्रगतीसाठी मी शक्य तितका वाटा उचललेला आहे. मला शक्य होईल तेवढी मदत भविष्यातही करणार असल्याचे ते म्हणाले. गडचिरोली चंद्रपूर मधील मुलांमध्ये गुणवत्ता चांगली असून त्या गुणवत्तेला ओळखून विद्यार्थ्यांना कशात आवड आहे त्यानुसार त्यांना क्षेत्र निवडायची संधी हवी असे त्यांनी यावेळी विद्यापीठाला सूचना केल्या. पुढे ते म्हणाले गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाठी सदैव प्रयत्नशील राहिल. येत्या काळता 10 हजार मुलींना सायकलचे वाटप करण्यात येणार असून 300 गावांना शुद्ध पाणी देण्यासाठी आर. ओ. प्लान्ट देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात शैक्षणिक, आरोग्य सुविधा जास्त प्रमाणात निर्माण करुन येथील लोकांचे जीवनमान उंचावण्यात मदत होईल यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.

विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी आपल्या प्रास्ताविकात येथील युवावर्ग खूप सकारात्मक असून विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांना इतरांपेक्षा वेगळे करण्याची संधी दिली जात असल्याचे सांगितले. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. गोंडवना विद्यापीठाला इतरांबरोबर स्पर्धा करायची नसून गोंडवाना विद्यापीठ एक ब्रँड बनायला पाहिजे. या विद्यापीठात मुलांना कौशल्य प्रधान व्हायला हवे ज्यामुळे येथील विद्यार्थी काही नवीन करु शकतील. तसेच विद्यापीठाने तसे नियोजनही करण्यास सुरूवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

*स्थानिक वैशिष्टये जोडून विद्यापीचा विकास करावा – डॉ. निपुन विनायक*

आपल्या या आदिवासी भागाची ताकत ओळखून शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी द्यावी. शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात खुप संधी असून येथील विद्यार्थ्यांची गुणवत्तेची ताकद ओळखून त्यांना सोबत घेवून आपण पुढे गेले पाहिजे असे प्रतिपादन विनायक निपून यांनी केले. कोणत्याही इतर विद्यापीठांशी तुलना न करता आदिवासी भागात आवश्यक व गरजेचे स्थानिक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत असेही ते पुढे म्हणाले.

*खरी संस्कृती, प्रकृती, निसर्ग हा जंगल भागातच असतो – नितीश भारद्वाज*

नितीश भारद्वाज यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन सगळयांचे आभार मानले. गोंडवना विद्यापीठाचे व्हीजन मोठे असून खरी संस्कृती ही इथेच कळून येत असल्याचे ते यावेळी म्हणाले. वनवासी भागामध्ये उत्साह खूप असतो. खरी संस्कृती, प्रकृती, निसर्ग हा जंगल भागातच असतो असे त्यांनी यावेळी सांगितले. उत्साह हा क्रीडा तसेच शैक्षणिक या दोन्ही कामासाठी उपयोगी असतो. म्हणून गोंडवना विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास व्हायला हवा. 10 वर्ष विद्यापीठाला झाली असून विद्यापीठाच्या व्हिजन पुर्ण करण्यास विद्यापीठ, विद्यार्थी तसेच सर्वांनी हातभार लावल्यास विद्यापीठाला यश निश्चितच लाभेल. या कार्यशाळेबद्दल बोलतांना श्री. भारद्वाज म्हणाले की, लोकांना आधी पेटेंट काय होते ते माहिती नव्हते. आपली संपदेची माहिती आपणालाच नव्हती. त्यामुळे दुसरे देश आपली संपदेचे त्यांच्या नावाने पेटेंट करुन घेत होते. आता लोकांमध्ये जागृती निर्माण झाली असून पेटेंट काय आहे आता त्यांना समजत आहे. गोंडवाना ही संस्कृती खुप जुनी असून जेवढी संस्कृती जुनी तेवढे त्यांचे ज्ञान जास्त असते. गोंडवाना विद्यापीठाने जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो उत्तम कार्यक्रम आहे. सर्वांनी आपले योगदान दिले पाहिजे. जी संधी विद्यापीठामार्फत दिली जात आहे त्याचे उपयोग विद्यार्थ्यांनी करुन घेतला पाहिजे.
***