✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-८६०५५९२८३०

चिमूर(दि.5ऑक्टोबर):– भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-यांनी आजच आपल्या नावाची नोंद मतदार यादीत करावी. यादीत नाव समविष्ट करणे किंवा वगळणे हे अभियान सध्या सुरु आहे. मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरु असून या कामात सहकार्य करण्याकरिता प्रत्येक राजकीय नेत्यांनी प्रत्येक गावातील प्रत्येक बूथवर बूथ लेवल एजंट (बी.एल.ए.) ची नियुक्ती करून तहसील कार्यालयात नोंद करणे आवश्यक आहे. बी.एल.ए. नियुक्ती करण्याची सुविधा 2013 पासुन अस्तित्वात असताना सुद्धा आजपर्यत एकाही राजकीय पक्षाने बी.एल.ए. ची नियुक्ती केली नाही असे प्रतिपादन चिमूर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले. यावेळी चिमूर तहसीलचे प्रभारी तहसीलदार कोवे, निवडणुक विभागाचे प्रतिनिधी नामदेव वाडगुरे उपस्थित होते.

मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम अंतर्गत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी करिता आयोजित विशेष सभेत बोलताना प्रकाश संकपाळ पुढे म्हणाले चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर मतदार संघाचे निवडणुक विभागाचे आघाडीवर आहे. या मतदार क्षेत्रातील मतदार यादीत मतदाराचे नावाचे समोर त्याचे छायाचित्र असल्याचे काम शंभर टक्के झाले आहे. यात काही त्रुटी असू शकते. त्या दूर करण्याचे काम सुरु आहे. भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक १ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यत छायाचित्रासह मतदार यादीत मय्यत, स्थलांतरित, दुबार नावाची दुरुस्ती करणे आदी कामाचे प्रारूप तयार करून यादी प्रसिध्द करावयाचे आहे. या कामात राजकीय पक्ष, समाजसेवी संघटना व प्रसार माध्यम यांनी सहकार्य करावे असे आवाहन चिमूर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले.

या सभेला रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष हेमंत भैसारे, बहुजन समाज पार्टीचे सुभाष पेटकर, वंचित बहुजन आघाडीचे शालिक थूल, मनोज राऊत, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र शासन अधिस्वीकृत पत्रकार तथा साप्ताहिक पुरोगामी संदेशचे संपादक सुरेश डांगे, दैनिक सकाळचे तालुका प्रातिनिधि जितेंद्र सहारे, पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी भरत बंडे, महासागरचे रवींद्र गोंगले आदी उपस्थित होते.

——————————————————————————————————-

मतदार यादी बाबत राजकीय पक्षाची उदासीनता

मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम अंतर्गत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी करिता आयोजित विशेष सभेत उपस्थित राहण्याकरिता चिमूर तहसील निवडणुक विभागाने विविध राजकीय पक्षांना निमत्रीत केले होते. परंतु यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची उपस्थिती नगण्य होती. स्वतःला मोठे राजकीय पक्ष समजणारे भाजप, काँग्रेस, राकाँ, शिवसेना सारख्या पक्षांनी मतदार यादी सारख्या महत्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करणे हे राजकीयदृष्ट्या योग्य नसल्याची प्रतिक्रिया जनतेत उमटत आहे. या सभेला राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष हेमंत भैसारे, बहुजन समाज पार्टीचे सुभाष पेटकर, वंचित बहुजन आघाडीचे शालिक थूल, मनोज राऊत उपस्थित होते.

निवडणुक मतदानाच्या दिवशी मतदार यादीत घोळ झाल्याची ओरड करणारे राजकीय पक्ष हे मतदान यादीचे काम करताना सहकार्य करीत नाही. ही लोकशाही करिता चिंतनीय बाब असल्याची चर्चा जनतेत सुरु आहे.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED