नवरात्र

28

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यापासून अनेक सण साजरे व्हायला सुरूवात होते.गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर वेध लागतात ते म्हणजे शारदीय नवरात्रीचे.आपल्याकडे प्रत्येक सण आणि उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात.शारदीय नवरात्रीचे महत्व आपल्याकडे अनन्यसाधारण आहे.यावर्षी नवरात्रौत्सव सुरू होत आहे अर्थात घटस्थापना आहे ७ ऑक्टोबर २०२१ रोजी आणि दसरा अर्थात विजयादशमी आहे १५ ऑक्टोबर २०२१ रोजी.नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते.तर काही जण नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करतात.हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात.त्याशिवाय या नऊ दिवसात नऊ रंगाचे कपडेही परिधान करण्यात येतात.नवरात्रीच्या शुभेच्छा ही देण्यात येतात.शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे.देवीचे नामस्मरण करणे,उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत.असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी हा चांगला कालावधी मानण्यात येतो.शरद ऋतुच्या सुरूवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रौत्सव असे म्हटले जाते.

अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यता येतो.सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता.त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत होते.पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला.दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले.या काळात या देवींचे दर्शन घेण्यसाठीही मोठ्या संख्येने भक्त जातात.देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे.संस्कृत मध्ये नऊ रात्री असा याचा अर्थ होतो. नऊ दिवस क्रमाने नऊ वेगवेगळ्या देवींची पूजाअर्चा करण्यात येते.तर दहाव्या दिवशी रावणदहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो.दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानण्यात आल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी,दुसरा दिवस असतो तो ब्रम्हचारिणी देवीचा,तिसरा दिवस चंद्रघटा देवीचा मानण्यात येतो तर चौथा दिवस कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते.पाचवा दिवस स्कंदमाता देवी,सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा,सातवा दिवस हा कालरात्री देवीसाठी,आठव्या दिवशी महागौरी देवी आणि नववा दिवस हा सिद्धिदात्री देवीच्या पूजनाचा दिवस मानला जातो.पहिल्या दिवशी घटस्थापना करून विधीनुसार पूजा करण्यत येते.

यामध्ये कुमारिका पूजन,पार्वती पूजन,सरस्वती पूजन आणि काली पूजनही करण्यात येते.पहिल्याच दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यात नऊ प्रकारचे धान्य पुरण्यात येते.दहा दिवस घटाच्या बाजूला हे ठेवण्यात येते.टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो आणि त्याचीही पूजा करण्यात येते.प्रत्येक दिवशी या घटावर एक माळ चढविण्यात येते.पूजेमध्ये पाच प्रकारची फळे असतात आणि ही माळ रोज नऊ दिवस वेगवेगळी चढवली जाते.तर सकाळी संध्याकाळी धूप – दीप – आरती आणि देवीला नेवैद्य दाखवून देवीची पूजा करण्यात येते.नऊ दिवस सतत या घटाजवळ दिवा तेवत ठेवला जातो.कुमारिकांमध्ये दुर्गेचे रूप असते असे मानण्यात येते.नऊ कुमारिकांचे त्यांचे पाय धुऊन आणि त्यांच्या आवडीचे जेवण करून पूजन करण्यात येते.तर त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात.अनेक ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होमहवन करण्यात येतो.कोणतीही नजर लागली असेल अथवा वास्तूमध्ये कोणताही त्रास असेल तर होमहवन करून सर्व गोष्टी पवित्र करण्यासाठी पूजा केली जाते.देवीला या नऊ दिवसांमध्ये सुती अथवा रेशमी साडी अर्पण करायची असते.

या धाग्यांमध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते.म्हणून ही प्रथा आहे.त्यामुळेच या दिवसात साडी नेसण्याला प्राधान्य देण्यात येते.देवीकडून आपल्याला अधिकाधिका उत्साह मिळावा आणि आपली उन्नती व्हावी यासाठीच या काळात देवीची ओटी भरून तिची प्रार्थना करण्यात येते.अशाप्रकारे नवरात्र महोत्सव साजरा केला जातो.या निमित्ताने सर्व माता – भगिनींनी नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

✒️लेखक:-राजेंद्र लाड(राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक,आष्टी,जि.बीड)मो:-९४२३१७०८८५