✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

दौंड(दि.7ऑक्टोबर):— तालुक्यातील राजेंद्र कदम ( राजेगाव ) व जयकुमार जावळे ( पिंपळगाव ) या दोन ध्येयवेड्या तरुणांनी पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया पासून बंगालच्या उपसागरा पर्यंत सायकल यात्रा काढली. गेट वे ऑफ इंडिया पासून सायकलवर निघालेल्या या दोन तरुणांनी तेविसशे किलोमीटरचे अंतर केवळ १६ दिवसात पार केले. या सायकल यात्रेदरम्यान हे दोन तरुण सायकलवरून दररोज १२५ ते १५० किलोमीटर प्रवास करत असत. त्यांच्या या सायकल यात्रेची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. राजेंद्र कदम व जयकुमार जावळे यांची सायकल यात्रा ज्या शहरांतून गेली त्या शहरातील नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करून त्यांच्या सायकल यात्रेला शुभेच्छा दिल्या. वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास टाळायचा असेल तर प्रदूषण टाळायला हवे. वृक्षतोड थांबवून जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत. हा संदेश घेऊन सायकलवर भारतभ्रमण करणाऱ्या या ध्येयवेड्या तरुणांच्या कार्याची राज्यभर दखल घेतली जात आहे. पर्यावरण रक्षणासाठी व जनजागृतीसाठी सायकल यात्रा पूर्ण करणाऱ्या या तरुणांचे दौंड तालुक्यातील अनेक मान्यवरांनी कौतुक करून त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या सायकल यात्रेची दौंडमध्येच नाही तर राज्यभर चर्चा आहे. त्यांची ही सायकल यात्रा दौंडकरांसाठी अभिमानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया दौंड तालुक्यातील मान्यवर देत आहेत.
——————————-
सायकल चालवा प्रदूषण टाळा

राजेंद्र कदम आणि जयकुमार जावळे हे ज्या गावात जातात त्या गावात ते प्रदूषण मुक्ती, पर्यावरणाची हानी, व्यसनमुक्ती यावर प्रबोधन करतात. आपल्या सायकल यात्रेदरम्यान ते सायकल चालवा प्रदूषण टाळा हा संदेश देत. सायकल चालवणे आरोग्यासाठी लाभदायक आहे म्हणून तरुणांनी सायकलचा वापर केला पाहिजे असा संदेश ते यात्रेदरम्यान देत असत. राजेंद्र कदम हे व्यसनमुक्तीचेही काम करतात.

सन २००० पासून वव्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य गुरुवर्य युवक मित्र बंडा तात्या कराडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन राजेंद्र कदम हे व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करत आहेत. व्यसनमुक्तीसह सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करण्यासाठी ते शेतकऱ्यांना प्रेरित करत असतात. व्यसनमुक्तीसाठी केलेले काम तसेच सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेली शेती यासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED