जातिव्यवस्था व वर्णभेद विरोधक!

26

(गोपाळ हरी देशमुख पुण्यस्मृती विशेष)

गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी हे एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहास लेखक होते. त्यांना ब्रिटिशांनी जस्टीस ऑफ पीस व रावबहाद्दूर या पदव्यांनी सन्मानित केले. तर ब्रिटिश सरकारने त्यांना फर्स्ट क्लास सरदार म्हणून मान्यता प्रदान केली होती. त्यांच्याविषयी ही अधिक माहिती श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी यांच्या भारदस्त लेखणीतून साभार… – संपादक.

गोपाळरावांनी प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने समाज सुधारणाविषयक १०८ शतपत्रे लिहिली. भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुंटे हे साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका शतपत्रांचा इत्यर्थ या मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी संस्कृतविद्या, पुनर्विवाह, पंडितांची योग्यता, खरा धर्म निर्माण करण्याची गरज, पुनर्विवाह आदी सुधारणा ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.आपल्या समाजातील दोषांवर त्यांनी टीका केली. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा, असे ते सांगत. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते.

म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचार विचारांचा अंगीकार करावा असे त्यांनी म्हटले होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. सुधारणावादाचा विचार मांडणारे आणि स्वकियांवर प्रखरपणे टीका करणारे, त्यांचे दोष त्यांच्या लक्षात आणून देणारे तत्कालीन सुधारकामधील हे महत्त्वाचे सुधारक होते. समाजाची उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे त्यासाठी महत्त्वाचे माध्यम असले पाहिजे. सामाजिक भेद दूर करून समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते गेले, त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. तत्कालीन सनातनी समाजाला उद्बोधन करताना त्यांनी समाजाची खरी गरज लक्षात आणून दिली. अशा या सामाजिक सुधारणेच्या काळामध्ये लोकहितवादींनी समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले.

त्यांची महत्वाची सामाजिक कार्ये अशी होती- अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना, हितेच्छू या गुजराती नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य केले, गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना उघडला. गुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन केले. गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत केली. पंढरपूर येथील अनाथ बालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग घेतला.
सरदार गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म दि.१८ फेब्रुवारी १८२३ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये होते. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत. इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला.

त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. सदर अदालतीची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सन १८६२पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले. लोकहितवादीनी कोणाची मजुरी पत्करली नाही. लोकांनी ज्ञानी व्हावे आणि ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत, त्या बाजूला ठेवाव्यात, इग्रंजी भाषेवर प्रभुत्व असावे, असे त्यांना वाटत असे.श्रमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे? याची दिशा समजली. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत, ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवनवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय देशाला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटे. शेवटी त्यांनी दि.९ ऑक्टोबर १८९२ रोजी जगाचा निरोप घेतला…

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या अचाट कार्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी(भारतीय थोर पुरुषांचे चरित्र व इतिहास अभ्यासक)मु. रामनगर वॉ.नं.२०, गडचिरोली.जि. गडचिरोली, फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com