कोलामांच्या रंगात रंगले जिल्हाधिकारी

68

🔹आदिम कोलामांच्या प्रश्नांवर थेट संवाद : समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्ध

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(ता.9ऑक्टोबर): – जिल्ह्यातील आदिम कोलाम समुदायांना भेडसावणारे प्रश्न हे मुलभूत स्वरूपाचे व त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जुळलेले असून, ते कोलामांच्या जिवनमानावर परिणाम करणारे आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करून कोलामांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यास प्रशासन कटीबद्ध असल्याचे मत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले.*

कोलाम विकास फाऊंडेशनने आयोजित केलेल्या जिल्हाधिका-यांचा कोलामांशी थेट संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, राजुरा चे उपविभागीय अधिकारी खलाटे, तहसीलदार गोगुर्ले, कोलाम विकास फाऊंडेशन चे अध्यक्ष विकास कुंभारे, पंचायत समिती सभापती अंजली पवार, सरपंच सुषमा मडावी, संस्थेचे सचिव मारोती सिडाम, गाव पाटील भिमराव आत्राम, भीमराव मडावी भीमराव पवार उपस्थित होते.

कोलामांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेऊन कोलाम गुड्यांवरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोलाम विकास फाऊंडेशन ने व्यापक जनआंदोलन उभारले. स्वातंत्र्य दिनी घोडणकप्पी या आदिम वस्तीवर आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याआधी ढोल सत्याग्रह आयोजित केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिका-यांनी कोलामांच्या प्रश्नांवर बैठक बोलावून चर्चा केली. त्याचवेळी कोलामांशी हितगुज करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज (ता.८) जिवती तालुक्यातील सितागुडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात जवळपास पंचवीस कोलाम गुड्यांवरील कोलाम बांधव सहभागी झाले.

प्रत्येक कोलाम गुड्यांवरील रस्ता, पाणी, घरकुल, जात प्रमाणपत्र, शेती पट्टे अशा अनेक विषयांवर कोलामांनी आपली व्यथा मांडली. कोलामांचे मुलभूत व दैनंदिन जीवन प्रभावित करणारे प्रश्न ऐकून जिल्हाधिकारी व्यथित झाले. यानंतर कोलामांना आपले प्रश्न घेऊन कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज पडू नये व त्यांची आवश्यक कागदपत्रे जात्यावरच्या मिळावी यासाठी तातडीने प्रत्येक कोलामगुड्यावर शिबिरे भरविण्याचे आदेश तहसिलदारांना दिले. या शिवाय आंगणवाडी, वाचनालय, व्यायामशाळा, समाज भवन अशा सुविधांची ही आवश्यक ठिकाणी पुर्तता करण्यात येईल असे सांगितले. व कोणताही कोलाम गुड्यांवर रस्ता किंवा पाण्याची समस्या राहणार नाही असेही सांगितले.प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी कोलामांसाठी असलेल्या योजनांची माहिती देऊन त्या प्रत्येक कोलामगुड्यावर तातडीने लागू करण्यासाठी आपले कार्यालय कामाला लागले असल्याचे सांगितले.तत्पुर्वी कोलाम विकास फाऊंडेशन चे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी कोलामांचे प्रश्न व त्यासाठी संस्थेचे सुरू असलेले प्रयत्न याबाबत माहिती दिली.

*जिल्हाधिका-यांनी फेर धरला*
कोलामांनी भूपाळी दंडार व पारंपरिक वाद्याच्या गजरात जिल्हाधिकारी व अन्य पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रम स्थळी सादर झालेल्या कोलामांच्या पारंपरिक नृत्यात जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी रमले. व त्यांनीही कोलामांसोबत फेर धरला.

*वाचनालयात स्वागत*
सितागुडा या कोलामगुड्यावर असलेल्या विर शामादादा कोलाम वाचनालय तथा अभ्यासकेंद्राला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी भेट दिली, तेव्हा त्यांचे कुंकुमतिलक करून स्वागत करण्यात आले. वाचनालयातील पुस्तके व अभ्यास करणा-या मुलांची त्यांनी आस्थेने चौकशी केली.

*रायपूर येथेही थेट संवाद*
सकाळी ११ वाजता रायपूर -खडकी येथे जमलेल्या अकरा गुड्यांवरील कोलामांशी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी थेट संवाद साधला.