अखेरचे अभियान !

मी पुसद शहरात १९५९साली विद्यार्थी म्हणून आलो,त्यावेळी पुसदात माझ्या ओळखीचे कोणीही नव्हते आज माझा प्रचंड मित्र परिवार आहे.सर्वच जातीधर्माची मंडळी माझ्या मित्र परिवारात आहे,याचा सार्थ अभिमान मला आहे.या मित्र मंडळीच्या सक्रीय सहकार्याने पुसद शहरात सामाजिक – राजकीय क्षेत्रात छोटेमोठे कार्य करून ,खारीचे असेल ;परंतु मी माझे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज ,म.फुले,राजर्षि शाहू महाराज ,डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने मला ते शक्य झाले आहे.मी ज्या खेड्यातून आलो ,त्या खेड्यात मराठी पहिलीची शाळा नव्हती .त्यामुळे मी वयाच्या ८ व्या वर्षी शाळेत दाखल झालो.म.फुले आणि डाॕ.बाबासाहेब हे अवतरले नसते तर, शूद्रातिशूद्र आणि स्रियांना म्हणजेच बहुजन समाजाला आणखी दीर्घ काळ अंधकारात व्यतीत करावा लागला असता याची जाणीव माझ्या सतत डोक्यात असते.कधीही चुकते न करता येणारे ऋण या महापुरूषांचे बहुजन समाजावर आहे.या शुद्ध जाणीवेतून मी फुले-आंबेडकरी विचाराचा प्रचार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे.

डाॕ.बाबा आढाव ,अॕड.बाळासाहेब आंबेडकर , राष्ट्र सेवा संघ आणि महाराष्ट्रातील इतर ४० विचारवंतांना ,कोरोना व्हायरस काळात असे लक्षात आले की, संविधानासंबधी जनतेत प्रचंड अज्ञान आहे आणि त्यामुळे शासन शिक्षण आणि आरोग्य यांचेकडे दुर्लक्ष करीत आहे.म्हणून गाव/वार्ड तेथे संविधान घर ही योजना राबावून जनतेत संविधान जागृती करावी असे त्यांनी आवाहन केले आहे.ज्या वार्डात अथवा गावात संविधान घर स्थापन करावयाचे असेल तिथे मी स्वखर्चाने येऊन संविधान घराची माहिती देईल आणि संविधाननाची प्रत देईल.

डाॕ.बाबासाहेब आंबेडकरानी दोन अनमोल ग्रंथ आपणास दिले आहेत.पैकी एक ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ‘ आणि ‘ दुसरा म्हणजे ‘राज्यघटना’.भारताची राज्यघटना ही बौद्धधम्माच्या तत्वावर अधिष्ठीत आहे.तात्पर्य संविधान घर योजना राबविणे म्हणजे जनकल्याणकारी बौद्धधम्माचा प्रचार करणेच होय !अर्थातच हे माझे शेवटचे अभियान असणार आहे, कारण मी वयाची ७९ वर्षे पूर्ण केली आहेत.सर्व मित्रांच्या सहकार्याने हे अभियान यशस्वी होईल अशी आशा आहे.

आपला स्नेहीः
✒️अॕड.अप्पाराव मैन्द

▪️संकलन- बाळासाहेब ढोले, पुसद

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED