मनपाच्या ३१७० विद्यार्थांना स्वाध्याय पुस्तिकेचे वितरण

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(ता.११ऑक्टोबर):- शहर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी सामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या शिक्षणात सातत्य राहावे यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका शाळेतील वर्ग १ ते १०च्या ३१७० विद्यार्थांना सर्व विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका वितरित करण्यात आल्या. या पुस्तिकेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळा बऱ्याच प्रमाणात दूर होऊन ते शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहतील व त्यांचे शिकणे सोपे होईल, असे मत महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी व्यक्त केले.

यावेळी उपमहापौर राहुल पावडे, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा उराडे, नगरसेविका वंदनाताई जांभुळकर, शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत यांची उपस्थिती होती. कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहे. महानगरपालिका चंद्रपूर येथील शिक्षक-शिक्षिकानी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या परिसरात जाऊन ऑनलाईन वर्ग सुरू केले. आता काही प्रमाणात शाळा सुरु झाल्या आहेत. त्यांच्या शिक्षणात सातत्य राहावे यासाठी महापौर कक्षात विद्यार्थाना सर्व विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका वितरित करण्यात आल्या.