अवैध सावकाराकडून शेती हडप- महाराष्ट्र सावकारी (नियंत्रण) कायदांतर्गत न्यायाची मागणी

✒️सुनिल शिरपुरे(झरीजामनी प्रतिनिधी)मो:-8767610804

कमळवेल्ली(दि 11ऑक्टोबर):- येथील सौ.भाग्यवती बुचन्ना चुक्कलवार यांच्या मालकीचे शेत गट नं.41/2 क्षेत्रफळ 1.41 हे.आर रुपये 1.17 आहे. सन 2013 मध्ये यांच्या मुलीचा विवाह निश्चित झाला होता. परंतु यांच्याकडे लग्नाकरीता पैसे नव्हते. तर लगतच्या गावातील विठ्ठल रामलु कोपुलवार हा सावकारी करत असल्याचे यांना माहिती मिळाली. त्यामुळे यांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधून कर्जाची मागणी केली. तेव्हा त्या व्यक्तीने कर्ज देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्यांनी उपरोक्त वाद शेताचे नाममात्र विक्रीपत्र ते सांगेल त्या व्यक्तीच्या नावे करून देण्याची अट घातली.

सौ.भाग्यवती यांना पैशाची नितांत आवश्यकता असल्यामुळे त्यांनी घातलेली अट मान्य केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. म्हणून यांनी ती अट मान्य करून, आम्ही करून दिलेल्या विक्रीपत्रावर अंमल करायचा नाही असे ठरवून सदर शेताचे विक्रीपत्र त्यांनी सांगितलेल्या चंद्रशेखर रामदास रजनलवार यांच्या नावे करून दिले. जरी शेताचे नाममात्र विक्रीपत्र करून दिले, तरी शेताचा ताबा सौ.भाग्यवती यांच्याकडेच होता व आहे. त्यामुळे सदरचे विक्रीपत्र हे केवळ नाममात्र असल्याचे दिसून येते. विक्रीपत्र झाल्यानंतर सौ.भाग्यवती यांना 3 लाख 65 हजार रुपये कर्ज मे 2013 मध्ये मिळाले. दिलेल्या रक्कमेच्या मोबदल्यात ठरल्याप्रमाणे 1.5 टक्के दराने नियमीत व्याज यांनी देत आले. अशाप्रकारे जून 2021 पर्यंत व्याज देण्यात आले.

त्यानंतर सौ.भाग्यवती यांनी संपूर्ण रक्कम स्वीकारून शेताचे विक्रीपत्र परत यांच्या नावाने करून देण्याची मागणी केली. परंतु विठ्ठल रामलु रजनलवार यांनी एकमुस्त रक्कम घेऊनही शेताचे विक्रीपत्र सौ.भाग्यवती यांच्या नावे करून दिले नाही. तेव्हा यांनी चौकशी केली असता यांना आपल्याशी धोका केल्याचे लक्षात आले. विक्रीपत्रावर अंमल करायचा नाही असे ठरल्यानंतर देखील चंद्रशेखर रामदास रजनलवार यांच्या नावाने फेरफार घेण्यात आला. म्हणून यांनी फेरफार क्र.234 अन्वये वि.उपविभागीय अधिकारी केळापूर यांचे न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यानंतर सौ.भाग्यवती यांना चंद्रशेखर रामदास रजनलवार यांनी विठ्ठल रामलु कोपुलवार यांनी सांगितल्याप्रमाणे मोहम्मद युसुफ मोहम्मद मुस्तफा यांच्या हक्कात विक्रीपत्र नोंदवून दिल्याचे कळले.

त्यामुळे सौ.भाग्यवती यांनी तलाठी, मंडळ अधिकारी व तहसिलदार यांच्याकडे रितसर द्वितीय विक्रीपत्रावर विसंबून फेरफार करण्यात येवू नये असा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मंडळ अधिकारी यांनी फेरफारची सुनावणी ठेवली असता सौ.भाग्यवती यांनी आपले म्हणने लेखी स्वरुपात मांडले. विठ्ठल रामलु कोपुलवार हे अनेक वर्षापासून सावकारी करीत आहे. त्यांच्या नावाने, परिवारातील प्रत्येक सदस्याच्या नावाने व नात्यातील इतर अनेक लोकांच्या नावाने शेतजमीनीची विक्री सावकारीच्या माध्येमातून करून घेत असून त्यांच्याकडे भरपूर शेती संपादित केलेली आहे. तरी सौ.भाग्यवती बुचन्ना चुक्कलवार यांनी उपरोक्त तिनही अवैध सावकाराविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियंत्रण) कायदा 2014 च्या तरतुदी अंतर्गत कार्यवाही करून योग्य न्याय मिळवून देण्याची मागणी करीत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED