आदिशक्तीचे सगुण रूप नारीशक्ती!

(शारदीय नवरात्रोत्सव विशेष)

महामाया आदिशक्तीची पूर्ण नवरात्री पूजा बांधून तिच्यातील नऊ शक्तींना उद्दीपित केले जाते, त्यांना कार्यप्रवण होण्यास जागविले जाते. या शक्ती किंवा क्षमता निर्जीव मूर्तीत नसून त्या आपल्या माता, भगिनी व मुलीबाळीत सुप्तरुपात असतात. खरे तर त्याच क्षमतांचाच हा जागर असतो. श्री.कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी यांचा डोळ्यांत अंजन घालणारा हा लेख… संपादक.

नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून देव्हाऱ्यात अखंड नंदादीप तेवत असतो. देवीला दररोज पिवळ्या फुलांची माळ चढवली जाते. तिच्यापुढे सप्तशतीचा पाठ करून शारदीय नवरात्री व्रत केले जाते. या दिवसांत स्त्रीशक्तीची उपासना सकल मानव जात करते. मात्र आपण ती एका अदृश्य देवीची अर्थात ती प्रत्यक्षात नाहीच अशा समजुतीने करतो. ती देवी वा आदिशक्ती स्त्रीच आहे, या समजुतीकडे दुर्लक्ष करतो. हे सत्य कळले असते तर हमखास पुरूषवर्गाने स्त्रीवर्गांशी अन्याय, अत्याचार व निर्लज्जपणाचे वर्तन केलेच नसते. एकीकडे देवी म्हणून जिच्या पायावर नाक घासले जाते आणि दुसरीकडे तिच्या इज्जतीचे धिंडवडे काढले जाते. ही काय माणुसकी आहे? जगद्गुरू संत तुकाराम महाराज समजावतात-

“माया तेचि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया।
अंग आणि छाया जयापरी॥१॥
तोडितां न तुटे सारितां निराळी।
लोटांगणांतळीं हारपती॥ध्रु.॥
दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं।
आणिक ते आटी विचाराची॥२॥
तुका म्हणे उंच वाढे उंचपणें।
ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं॥३॥”
(तुकारामांची अभंग गाथा: अभंग क्र.४०)

आदिशक्तीला सनातन, निराकार व परब्रह्म, जी की ब्रह्मांडाहूनही न्यारी एका सर्वोच शक्तीच्या रूपात मानले जाते. शाक्त संप्रदायानुसार ही शक्ती मूळ रूपात निर्गुण आहे, परंतु निराकार परमेश्वर जो स्त्री आहे ना पुरुष! त्यास जेव्हा सृष्टीची रचना करावयाची असते तेव्हा तो आदि पराशक्तीच्या रूपात प्रकटतो. इच्छित रूपात ब्रह्मांड रचना, जनन रूपात जगत पालन आणि क्रिया रूपात तो पूर्ण ब्रह्मांडाला गती तथा बल प्रदान करत असतो. या आदिशक्तीला पराम्बा, परशक्ती वा आदिपराशक्ती असेही म्हणूनही संबोधित केले जाते. ही दुर्गामातेची आरती पहा-

“जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी॥धृ.॥
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी।
हारी पडलो आता संकट नीवारी॥१॥”

प्रत्येक संप्रदायात आदि पराशक्तीला विभिन्न रूपांमध्ये मानून पूजले जाते. शाक्त संप्रदायात तो हा स्वयं ब्रह्मशक्तीच्या रूपात पुजला जातो. ज्यात दोन कुळ आहेत- काली कुळ आणि श्री कुळ. काही अन्य शाक्त भगवती दुर्गाला देखील आदिशक्ती मानतात. वैष्णव सांप्रदायिक भगवतीला राधा मानून पुजा करतात, तर शैव संप्रदायाचे माता पार्वती अथवा शाकंभरीलाही आदिशक्तीचे सगुण स्वरूप मानतात. शीख बांधव शक्तीला निर्गुणच समजतात. ती त्यांची एकंदरीत चंडी अकाल पुरुषाची ऊर्जा शक्ती आहे. देवी भागवत, अथर्व वेद, मार्कण्डेय पुराण आदी प्राचीन ग्रंथांनुसार देवी आदिशक्ती हेच मूळ आहे.

संस्कृत स्तवन सांगते- ||शारदा स्तोत्र||
“भक्तजिह्वाग्रसदना|| शमादि-गुण-दायिनी॥
नमामि यामिनीं नाथ लेखालङ्कृत कुन्तलाम्||
भवानीं भवसन्ताप निर्वापण सुधा नदीम्||
भद्रकाल्यै नमो नित्यं सरस्वत्यै नमो नमः||”

शारदीय नवरात्र हे हिंदू धर्मियांचे एक प्रमुख पर्व आहे, ज्याचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा होतो. या नऊ रात्री आणि दहा दिवसांमध्ये महिलांतील नऊ शक्तींची म्हणजेच देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दहाव्या दिवशी दसरा साजरा होतो. वसंताची आणि शरद ऋतूची सुरुवात हा हवामान आणि सूर्याच्या परिणामांचा महत्त्वपूर्ण संगम मानला जातो. त्यामुळे हा काळ नारीशक्तीच्या अर्थात आदिशक्तीच्या पूजेसाठी पवित्र मानला जातो. शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. वंद.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नारीशक्तीचा गौरव करीत म्हटले-

“काय स्त्रियांनी युद्ध नाही केले?।
पती पुत्रा नाही प्रोत्साहन दिले?।
हजारो स्त्रिया फुलांहून नाजूक।
ब्रीदासाठी जाहल्या राख।।५२।।
त्यांचे करावे तेवढे कौतुक।
थोडेचि आहे।
स्त्रियेसारखी मुलायम नाही।
आणि कठोर रणचंडिका।।५३।।”
(पवित्र ग्रामगीता: दृष्टिपरिवर्तन पंचक: अध्याय २०वा- महिलोन्नती)

दरम्यान, नवरात्रीचे पहिले तीन दिवस देवी दुर्गाच्या पूजेला समर्पित आहेत. ही पूजा देवीची उर्जा आणि शक्तीसाठी केली जाते. नवरात्रीचा चौथा, पाचवा आणि सहावा दिवस लक्ष्मीच्या पूजेला समर्पित आहे, जी समृद्धी आणि शांतीची देवता आहे. सातव्या दिवशी कला आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. आठव्या दिवशी देवीचा सन्मान आणि निरोपार्थ ‘यज्ञ’ केला जातो. नववा दिवस म्हणजे नवरात्रीचा शेवटचा दिवस. याला महानवमी असेही म्हणतात. या दिवशी कन्यापूजन केले जाते. संतकवयित्री बहिणाबाई पाठकजींनी म्हटले-

“दुर्जनाचे संगे दुर्जनची होय!
पाहे पहा अभिप्राय सहज तो!!
हिंगाची संगती लाभली कापुरा!
स्वभाव तो खरा हरपला!!”
बहिणी म्हणे संग आपुले ते करी!
म्हणोनी विचारी साधुजना!!”

त्यानंतर आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी साजरी होते. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे. हा दिवस नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस मानला जातो.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे शारदीय नव रात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री. कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(भारतीय सण- उत्सवाचे गाढे अभ्यासक व विश्लेषक)मु. पो. ता. जि. गडचिरोली.व्हा. नं. ७४१४९८३३३९.

अमरावती, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED