गणेशोत्सव आणि महाड तळीये चार एक दिवस

28

बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय ओबीसीचा आवडता गणेशोत्सव नुकताच पार पडला आणि आता दसरा,दिवाळी, तुळशीचे लग्न असे सर्व सण एकामागून एक आपली पर्वणी लावत आहेत.कोरोना आणि कोरोनाच्या नियमावली बरोबर या उत्सवामध्ये दिसणारी गर्दी, लोकांचा उत्साह हे सगळं काही विज्ञानाच्या पेक्षा श्रध्दा अज्ञान एक (कोणत्या) सकारात्मक दिशेने घेऊन जात असल्याचे दिसत आहे.देव,देवीच्या उत्सव,पूजा अर्चा मनोभावे करून ही काही महिन्यापूर्वी महाड,चिपळूण तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने आणि डोंगर खचल्याने नागरिकांच्या मृत्युच्या घटना आणि वाचलेल्या लोकांची विदारक परिस्थिती अजून ही डोळ्यासमोरून जात नाही. नोकरी करत असतानाच पुरात नुकसान झालेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांच्यासाठी आवश्यक गोष्टीचा सहकार्याच्या मदतीने पुरवठा करून, मिळालेल्या वेळेत पुण्यातील मानाचा पाचवा गणपती टिळकांच्या वाड्यातील म्हणजेच केसरी वाडा ह्या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्याचा योग आला आणि गणपती दर्शनाच्या निमित्तानेच केशरी वाड्यातील टिळकांचे ग्रंथालय आणि संग्रहालय पाहण्याचा योग अनेक वर्षानंतर आला.

गणपतीचे दर्शन घेऊन पहिल्या मजल्यावरील ग्रंथालयाकडे जाताना डोक्यात विचारचक्र सुरू झाले की, नेमकं काय असेल या ग्रंथालयांमध्ये ज्यांनी लाखो लोकांना सद्विवेक बुद्धीचा वापर करण्यास पूर्ण पणे बंदी केली.जे लिहले तेच सत्य मान्य करा.लाखो लोक आज त्यांची तंतोतंत पालन करतात.स्मार्टफोन गुगल सर्च नेटवर्किंग उपलब्द असतांना ही सत्य असत्या शंका घेऊन तपासण्याची हिंमत करत नाही. पुस्तकाच्या सोबतीला अजून काय पाहता येईल हा विचार करत पायर्‍या चढत असताना, त्या ग्रंथालय रुपी संग्रहालयामध्ये पाऊल ठेवले. त्या ठिकाणात प्रवेश केल्यावर क्षणाचा ही विलंब न करता मनात आले की, जनु आपण जिवंत असणाऱ्या टिळकां सोबतच वेळ घालवत आहोत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की, स्वातंत्र्य लढा नंतर आज इतक्या वर्षानंतर टिळक आपल्या मध्ये जिवंत असल्याचा अनुभव किंवा प्रचिती ही फक्त टिळकांच्या संग्रहालयातील मांडणी पाहिल्यावर आली आणि कदाचित ती पुढेही येत राहील.

स्वातंत्र्यासाठी लढा आणि गणेशोत्सवातून त्यांनी समाज सुधारण्याचे काम हाती घेतले परंतु टिळक याचा गणेशोत्सव आणि आज सुरू असलेला गणेशोत्सव यांच्यामध्ये तुलना केली तर खूप सारा विरोधाभास जाणवतो. हे त्यांच्या संग्रहालयातील असलेल्या ऐतिहासिक गोष्टी म्हणजेच त्यांचा लिखाणाचा टेबल, त्यांचा कोट,काठी,टेबल-खुर्ची, शूज या सर्व गोष्टींची कबुली देतात असं भासत होतं.पूर्ण ग्रंथालय फिरताना उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती पण मन उदास होतं की आपल्याला हे क्षण साठवून ठेवता येत नाही, पण दुसर्‍या क्षणी फोटोग्राफी करण्याची परवानगी असल्याचे समजताच आनंद हा गगनात मावेना झाला. मग काय कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन मोडवर ती स्वतःला टाकून ग्रंथालयातील आणि संग्रहालयातील प्रत्येक गोष्ट बारकाईने टिपण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाला. हे सुरू असताना उत्सुकता द्विगुणित होत चाललेली छायाचित्रे टिपता टिपता खूप साऱ्या गोष्टी कॅमेरात कैद होत होत्या, पण त्यातली मनावर ठसा उमटवणारी गोष्ट म्हणजे डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. मनात विचार आला 101 दिवस टिळकांनी कसे काढले असतील डोंगरीच्या तुरुंगात? आणि दुसर्‍या क्षणी आठवण झाली ती म्हणजे महाड चिपळूणच्या परिस्थितीची!

ग्रंथालय आणि संग्रहालय फिरून झाले होते पण विचारांना गती प्राप्त होत होती ग्रंथालय मागे राहिले होते पण विचार चक्र मात्र धावु लागले होते.कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन, दुकाने बाजारपेठा हळूहळू सुरू झाल्या आहेत, हळूहळू ऑनलाईन परीक्षा सुरू झाले, काटेकोर नियम पाळून उत्सव ही सुरू झाले. सगळं काही सकारात्मकतेने पूर्ववत होत चालले आहे पण जी पूरस्थिती महाड चिपळूण आणि तळीये या ठिकाणी निर्माण झालेली ती परिस्थिती खरंच पूर्ववत होत असेल का? किंवा झाली असेल का ? अशा प्रकारचे विचारचक्र डोक्यातून मात्र जात नव्हते.
आपल्या रुग्णालयातील “एक हात मदतीचा” टीमने पुरवलेली मदत मुबलक होती का? तिथल्या लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या असतील की, अजून त्यांचे प्रश्न ऐरणीवर असतील. असे एक ना अनेक प्रश्नांचा घेराव मनामध्ये सुरू झाला आणि तात्काळ चिपळून येथील नगरसेवकाला फोन करून विचारणा केली तर त्यांचा प्रतिसाद हा सकारात्मक मिळाला आणि त्यांचे जीवन पूर्ववत असल्याचेही त्यांनी कळवले. आनंद झाला पण दुसर्‍या क्षणी विचार आला तो महणजे, तळीये येथील मातीच्या ढिगाऱ्याखाली जमीनदोस्त झालेली मानस आणि तेथील घरं! आमच्या रुग्णालयातील “एक हात मदतीचा” टीमच्या प्रत्येक सदस्यांनी तळीये येथील परिस्थिती पाहिली तेव्हा प्रत्येकाच्या अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू होते. अशा या गावाची परिस्थिती आता पूर्ववत असेल का? ती लोकांचे पुनर्वसन झाले असेल का?

येथील लोकांना सर्व मूलभूत गरजा मिळत असतील का? कोणा कडून योग्य ती मदत गावकऱ्या पर्यंत पोहोचत असेल का? असे एक ना अनेक प्रश्न तळीयेला घेऊन आजही मनात घर करून आहेत. “एक हात मदतीचा” या टीमचा एक दिवस चिपळूणचा हा अनुभव खूप वेगळा होता. खरं तर खूप काही शिकवून गेला सर्वांनाच आणि मानव जातीला ही.पण तळीये चा तो एक दिवस पण आयुष्याला कलाटणी देऊन जाणारा ठरला आहे. मदत पोहोचण्या आधीचा दिवस, आणि ज्या दिवशी आम्ही मदत कार्य घेऊन गेलो तो दिवस आयुष्यातील अविस्मरणीय दिवसातील एक दिवस असेल. “एक हात मदतीचा”, ह्या टीमने रुग्ण सेवा सांभाळून कमी वेळेमध्ये तळीये येथे मदत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला.पण ही मदत खरंच पुरेशी होती का? तळीये पुन्हा पूर्ववत उभे राहिले असेल का? त्या ठिकाणी नुकसान ग्रस्त घरांचे पुनर्वसन झाले असेल का? त्यांना मूलभूत सुविधा म्हणजे घर, वीज, पाणी यांचा पुरवठा तरी झाला असेल का? प्रश्न पुन्हा पुन्हा समोर उभे राहतात.

तळीये येथे भेट दिली होती तेव्हा त्यांची आप बीती त्यांच्या तोंडून ऐकताना अक्षरशः डोळ्यातील अश्रूंना वाट मिळाली. अनेक कटू आठवणी घेऊन टीम तळीये वरून मुंबईकडे येताना टीम मधील सर्वांचे मन हे सुन्न झालं होते.मुंबईकडचा परतीचा प्रवास एकदम भयान शांततेत पार पडला.. निसर्गाचा कहर आणि निसर्गाचे रौद्ररूपा समोर माणूस हतबल होतो हेच खर. पण त्यातूनही उभं राहणं म्हणजे नेमक काय असतं हे तळीये येथील लोकांना भेटल्यावर समजले. मदत कार्य पुर्ण करुन मुंबईकडे आम्ही सर्वजण परत आलो, दैनंदिन रुग्णसेवेसाठी पुन्हा जुंपलो, सर्व काही पूर्ववत होत चालले आहे, मात्र अजुनही तेथील लोकांचा संघर्ष संपलेला नाही. आजही परिस्थिती पूर्ववत नाही. त्या ठिकाणी वाचलेला प्रत्येकजण पुन्हा उभं राहण्यासाठी धडपडत आहे. तळीये येथील युवा वर्ग आजही शासनासोबत झुंज देतोय, तेल पुनर्वसनाला वेळ तर लागत आहे परंतु होणार पुनर्वसन हे पारदर्शी आणि नियमां प्रमाणे असावं अशी प्रामाणिक इच्छा येथील युवा वर्गांची तसेच ग्रामस्थांची आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदत देऊन टीम परत आल्या आहेत पण, तरी येथील निसर्गाच्या प्रकोपानं तर जीव वाचवून आता पुन्हा एकदा झुंज देत आहेत ते या प्रशासना सोबत! महाड पूर्णच काय तर महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली विदर्भ मराठवाडा अतिवृष्टीने झोडपलेल्या आणि शेतीचे नुकसान झालेल्या महाराष्ट्राला मदत पोहोचेल की नाही हा प्रश्न फक्त प्रश्न म्हणूनच राहतो!तळीये गाव जमिनोदस्त होण्या आधी येथील ग्रामस्थांनी खूप सारे गणेशोत्सव खूप सारे नवरात्री आणि सर्व उत्सव हे आनंदाने साजरे केले होते पण या वर्षीच्या गणेशोत्सवात आणि नवरात्रीत या गावावर दुःखाचा डोंगर आजही घर करून आहे.विघ्नहर्ता सुखकर्ता सर्व प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्याला सद्विवेक बुद्धी देऊन ग्रामस्थचे संकट दूर करो हीच अपेक्षा. आपण सणासुदी मध्ये आनंदाने उत्साही असताना तिथला प्रत्येक ग्रामस्थ गतवर्षीच्या आठवणींना उजाळा देत आहे. पापण्यांच्या कडा पाणावत आहे सणासुदीच्या आठवणी मध्ये. तिथला प्रत्येक युवक लढतो आहे शासनाच्या लालफितीत अडकलेल्या निधी मंजूर करून घेण्यासाठी आणि निसर्गाच्या कुशीत पुन्हा ऊभे आपलं घरकुल उभं करण्यासाठी.

✒️लेखिका:-भाग्यश्री बळीराम सानप.परेल मुंबई(मो:-90828 63640)