शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्यांनो आता गाठ शेतकऱ्यांशी आहे – कैलास फाटे

🔹लाजिरवाणा पिकविमा देऊन शेतकऱ्यांचा शासन प्रशासनाने केला खेळ

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.13ऑक्टोबर):-गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना पिकविम्याचा मोबदला मिळाला पाहिजे त्या करिता सत्याग्रह शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे. शेतकरी सुध्दा शासन प्रशासनावर विश्वास ठेवून होते म्हणून आक्रमक भूमिका घेण्यास नकार देत होते. परंतू आज पिकविम्याचा मोबदला कोणाच्या खात्यावर 250 तर कोणाच्या खात्यावर 500 रु पाहून सर्व शेतकरी हादरून गेले.शेतकऱ्यांची अशी क्रूर थट्टा केल्याचे पाहून सत्याग्रह शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. गेल्या खरीप 2020 – 21 च्या हंगामात शेतकऱ्यांनी पिकांचे मोठ्या मेहनतीने चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला.

पिक सुध्दा चांगले जोमात होते. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मध्ये तर खेळावले पण पिक जोमात असल्यामुळे सरकारच्या तुनपुंज्या कर्जमुक्तीला शेतकऱ्यांनी भिक घातली नाही आणि शेतकरी शांततेच्या मार्गाने राहून पिक घरात येइपर्यंत मेहनत व खर्च करू लागला. पिक हातात येण्याच्या पंधरवड्यातच पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचा सत्यानाश करून टाकला.बहुसंख्य शेतकऱ्यांनी शासनाने केलेल्या प्रचाराप्रमाणे मोठा विश्वास ठेवून पीकविमा काढला. प्रशासनाने तक्रारी, निवेदने स्वीकारून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन दिले. परंतू त्या आश्वासनांचा प्रत्यय प्रत्येक्षात आज शेतकऱ्यांना पाहायला मिळाला.

शासनाने पीकविमा कंपनीला मनमानी करायला मोकळे सोडले व प्रशासनाने नुकसानीचे अहवाल चुकीचे पाठवल्यामुळे दोषी शासन प्रशासनच आहे म्हणून शेतकऱ्यांच्या या क्रूर थट्टेला आता शेतकरी खतपाणी घालणार नाही. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्यांनो आता गाठ शेतकऱ्यांशी आहे असा इशारा देत सत्याग्रह शेतकरी संघटनेने येणाऱ्या 21/10/2021 गुरुवार रोजी खामगाव उपविभागीय कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केले असून शेतकऱ्यांना जात, पात, पक्ष भेद विसरून मोठया संख्येने हजार राहण्याचे आवाहन सत्याग्रह चे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांनी केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED