आता थांबायला हवं – सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर

✒️नायगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नायगांव(दि.14ऑक्टोबर):-प्रेमात, युध्दात आणि रस्त्यावर ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’ म्हणत कुठेतरी थांबायला हवे असते, नाही तर सर्वनाश अटळ असतो. आजच्या घडीला ‘बुध्द हवा’ या महान विचारसरणीमुळे युध्द जास्त होत नाहीत आणि झाले तरी ‘आम आदमी’च्या श्वासाशी त्याचा फारसा संबंध नसतो, पण प्रेम आणि रस्ता याची मात्र माणसाच्या श्वासाशी सोयरिक असते. म्हणुन प्रेमात आणि रस्त्यावर वेगाची मर्यादा पाळावीच लागते आणि वेळेप्रसंगी ‘ब्रेकअप’ करावा लागतो तरच रस्त्यावर आपला जीव आणि प्रेमात नातं टिकतं. अन्यथा श्वासाशी असणारी सोयरिक तुटू शकते. म्हणुनच कि काय कदाचित प्रत्येक प्रियकराची प्रेयशी त्याला शेवटी म्हणत असावी की, ‘आता थांबायला हवं’.

नवीन नवीन लोकाभिमुख प्रयोग राबवून ते लोकचळवळ आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातुन लोकांपर्यंत पोहचवले तरी लोकांना त्याचे गांभीर्य नसते. त्यासाठी लोकाभिमुख सरकारलाच कठोर नियमांचे हत्यार बाहेर काढावे लागते. लोकांना ‘गाडी हळु चालवा, जिवाला धोका आहे’ असे सांगितल्याने किंवा ‘दारू पिऊन गाडी चालवत जाउ नका’ असे सांगितल्याने लोक ऐकत नाहीत तर त्यासाठी सरकारलाच कठोर नियम बनवावे लागतात. जुन्या पळवाटांचे कायद्यामध्ये कालानुरूप बदल करावे लागतात. गेल्या पाच वर्षांत मोटार वाहन नियम धाब्यावर बसवून गाडी चालवत अपघात झालेल्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. अपघातात कुटुंबाचा कर्ता करविता माणुस दगावल्यानंतर कुटुंबाची वाताहात होतेच आणि त्याचबरोबर अपघातग्रस्त व्यक्तीला वैद्यकिय उपचारासाठी केलेल्या खर्चामुळे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटते.

अलीकडच्या काळात तर रस्ते अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले असल्याचे दिसते याचे महत्वाचे कारण म्हणजे रस्त्याचा झालेला विकास हे आहे. वेगवान गाडी चालविल्यामुळे होणार्‍या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. आपल्याकडील अपघात हे विषेश म्हणजे आपली बेशिस्त वृत्ती आणि बेदरकारपणा, शिस्त न पाळणे आदी अनेक कारणांनी होतात. अपघात वाहनाच्या दोषाने होण्यापेक्षा ते अधिक मानवी दोषाने होतात. आपल्याकडे होणाऱ्या अपघातात दरवर्षी १ लाख ५० हजारांहून अधिक जण प्राण गमावतात अशी सरकारची आकडेवारी उपलब्ध आहे. यात सर्वाधिक अपघात हे दुचाकी वाहनांचे आहेत. भरधाव वेगात गाडी चालविणे अनेकांना आवडते मात्र अशा स्थितीत सुरक्षा साधनांचा म्हणजेच हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असते. एखाद्या यांत्रिक चुकीने गाडीचा तोल जाणे, संतुलन बिघडणे, नियंत्रण सुटणे तसेच रस्त्यात अचानक वाहनासमोर कुणी येणे अशा स्थितीत अपघात हा टाळताच येत नाही. अशा वाहनाचालकाने किमान हेल्मेट घातलेले असेल तरी नुकसान कमी प्रमाणात होते. किमान प्राण वाचण्याची शक्यता यात असते. जगात दररोज सुमारे ३४०० लोक रस्‍तयावर अपघातामुळे मृत्‍युमुखी पडतात. १० लक्ष दक्ष लोकांना इजा होत असते किंवा ते अपंग होत असतात.

रस्‍त्‍यांवर लहान मुले वयोवृध्‍द व सायकल चालवणा़याना अपघाताचा सर्वात जास्‍त धोका संभवतो. अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना सिट बेल्‍ट आवश्‍यक लावणे, मदयपान करुन गाडी न चालवणे, अधिक वेगाने गाडी न चालवणे अशी शिस्त पाळली पाहिजे. जगभरातच वाहनांच्या अपघाताचे प्रमाण चिंताजनक झालेले आहे. दारू पिऊन वाहने चालवणे, अधिकवेळ ड्रायव्हिंग करणे, तुफान वेगाने गाड्या पळवणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापरणे ही अपघाताची महत्त्वाची कारणे आहेत. या संबंधाने केलेले नियम वाहन चालवणार्‍यांनी पाळले आणि पोलिसांनी हे नियम न पाळणार्‍यांवर कडक कारवाई केली तर अपघाताचे प्रमाण बरेच खाली येण्याची शक्यता आहे. परंतु आत्ताच्या काळात सर्वसामान्य माणूसच बेदरकार आणि बेफिकिर व्हायला लागला आहे. शक्यतो नियम न पाळणे हे मोठे पराक्रमाचे लक्षण मानले जायला लागले आहे. त्यातल्या त्यात १५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुणांचे अपघात जास्त होतात.

नियम धुडकावून लावणे आणि तुफान वेगाने गाड्या चालवणे हे याच वयोगटातल्या तरुणांचे लक्षण असते. सतत वाढणारी वाहन संख्या हा सर्वच शहरांचा मोठा प्रश्न आहे. बेशिस्त वाहनचालक, वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे अपूर्ण ज्ञान किंवा त्याबद्दल अज्ञान, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याची मानसिकता, सहचालक व पादचारी यांच्या सुरक्षिततेबद्दल बेपर्वाई अशी स्थिती ही भारतीय समाजासमोरील गंभीर समस्या आहे. या समस्यांमुळे रस्त्यावरील अपघात वाढत आहेत. नोंदल्या गेलेल्या अपघातांची संख्या प्रति वर्ष पाच लाखांपेक्षा जास्त आहे. रस्ता अपघातात प्रति वर्षी दीड लाखांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू होतो, तर पाच लाखांपेक्षा जास्त लोकांना दुखापत होते. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड पॅसिफिकच्या अभ्यासानुसार, रस्त्यावरील अपघातांमुळे भारतीय दर वर्षी ५८ अब्ज डॉलर म्हणजे देशाच्या पीडीपीच्या ३ टक्के एवढे नुकसान होते. विमा भरपाई, वाहनांचे नुकसान, अपघांतामुळे रुग्णालयांवर पडणारा ताण व वेद्यकीय सेवेवरील खर्च, वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण, प्रवास कालावधीत वाढ हेही दुष्परिणाम आहेत.

अपघातग्रस्त कुटुंबाला भोगाव्या लागणाऱ्या आर्थिक व मानसिक यातना आणि दुःख याची किंमत करणे कठीण आहे. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीच्या अनुकुलतेमुळे शहरीकरण वाढत आहे. शहराचे आकारमान, लोकसंख्या व दळणवळण यात वाढ होणार आहे. यातून निर्माण होणारी वाहतुकीची मागणी पूर्ण करणारी स्वस्त, नियमित, वेगवान, सर्व भौगोलिक भागाला कवेत घेणारी दर्जेदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध नाही. खासगी सार्वजनिक व्यवस्था महागडी व वाहन चालवणार्यांच्या लहरीवर अवलंबून आहे. यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत शिस्त, नियमपालन, संवेदना, सुरक्षितता, कठोर कारवाई यातून वाहनचालकांची मानसिकता अनुकूल करावी लागणार आहे. सकारात्मक मानसिकतेकडे नेणारे हे काम व्यापक, वेळखाऊ व दीर्घ काळाचे आहे; परंतु त्याला पर्याय नाही.

अपघाताच्या घटनांबाबत आपण कायद्यावर खूप अवलंबून राहातो. त्यानंतर आपण रस्त्यांना, तसेच वाढती वाहतूक आणि मद्यपान यांसारख्या गोष्टींनाही दोष देत असतो. अनेकदा गाडी चालविताना चालक फोनवर बोलताना आढळतो, किंवा एखादा मेसेज आपल्या फोनवर टाईप करीत असतो. गाडी चालविताना मोबाईल फोनकडे लक्ष असणे, अपघाताला आमंत्रण आहे हेसुद्धा भारतीय लोकांना सरकारने सांगावे लागते. मद्यपान करून गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरणार्‍या लोकांना आपण हातही लावू शकत नाही, त्याबाबत कायदा करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती तो आता झाला आहे पण आपणच काळजी घेऊन ‘ज्याला घाई आहे त्याने निघुन जाण्या’पेक्षा आपल्या कुंटुंबासाठी तरी,थांबायला हवं आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED