अहमदनगर- जामखेड -बीड रस्त्याचे उर्वरित काम लवकरच सुरु होणार ना.गडकरी यांनी दिला शब्द – आ. बाळासाहेब आजबे

32

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.14ऑक्टोबर):- तालुक्यातून जात असलेला राष्ट्रीय महामार्ग ५६१ साठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितीन गडकरी यांनी या अगोदर ३५ कोटी रुपये निधी दिला होता परंतु त्यामध्ये साबलखेड ते आष्टी व चिंचपूर ते जामखेड असा वीस किलोमीटर लांबीचा रस्ता व जामखेड ते सौताडा रस्ता निधी अभावी राहिला होता त्या रस्त्याची या पावसाळ्यामध्ये अतिशय बिकट अवस्था झाली असून वाहने चालवणे हे धोकादायक झाले आहे.त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत.हा रस्ता तात्काळ मंजूर करून बजेट टाकण्यात यावे यासाठी आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मागणी केली.त्यास नामदार नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या रस्त्यासाठी निधी देऊन काम सुरू करण्यात येणार असल्याचा शब्द दिला असल्याचे सांगितले.

तसेच जामखेड – सौताडा हा रस्ताही खराब झाला असून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी अंतर्गत येत असून या रस्त्यासाठी ही निधी मंजूर करण्यात आला आहे.या रस्त्याचेही काम लवकरच सुरू होणार आहे व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ हा रस्ता केंद्राकडे येत असल्याने दुरुस्तीसाठी अनेक अडचणी येत आहेत.त्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करावी लागते.राष्ट्रीय महामार्ग ५६१ अहमदनगर आणि बीड जिल्ह्याला त्याचबरोबर उस्मानाबाद,सोलापूर, लातूर या जिल्ह्याला जोडणारा प्रमुख महामार्ग असल्याने हा रस्ता मोठा आणि चांगला असणे गरजेचे आहे.यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे मतदारसंघातील अनेक रस्ते खराब झाले आहेत.

त्यातच हा रस्ता जास्तच खराब झाल्याने जनतेची गैरसोय होत आहे म्हणूनच आपण केंद्रीय दळणवळण व रस्ते विकास मंत्री नामदार नितींजी गडकरी साहेब यांची भेट घेऊन त्यांना या व मतदार संघातील इतर महत्त्वाच्या रस्त्या बाबतही सविस्तर चर्चा करून त्वरित निधी मंजूर करून काम सुरू करावे अशी मागणी केली आहे.त्यास ना.गडकरी साहेबांनी लवकरात लवकर हा रस्ता केला जाईल असा शब्द दिलाअसल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.यावेळी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे उपस्थित होते.