गांधी आणि सावरकर व्हाया राजनाथसिंग…

भारताचे संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य करताना एक मोठा दावा केला आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच इंग्रजांपुढे दया याचिका दाखल केली होती, वास्तवात सुटकेसाठी सावरकरांनी दया याचिका दाखल केलेल्या नव्हत्या. सामान्यत:च एखाद्या कैद्याला दया याचिका दाखल करण्याचाअधिकार असतो. मात्र, महात्मा गांधी यांनी सावरकरांना दया याचिका दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतरच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती.” सावरकरांवरील एका पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी त्यांनी हा दावा केला आहे. हा दावा खरा की खोटा हे इतिहासातील पुरावे-संदर्भ तपासून आपण बघुयात.

२१ डिसेम्बर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात डिस्ट्रिक्ट कलेक्टर ए.एम.टी.जॅक्सन यांची अनंत कान्हेरे आणि सहकाऱ्यांनी हत्या केली. या हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल सावरकरांनी इंग्लंडहून पाठविलेल्या पिस्तुलांपैकी असल्याने सावरकरांना १३ मार्च १९१० रोजी अटक झाली. त्यांना चौकशीसाठी भारतात नेतांना शौचकुपातील पोर्टहोल मधून समुद्रात उडी घेतली व फ्रेंच हद्दीतल्या मार्सेल्स बंदरावर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा पकडले. जॅक्सन च्या हत्येत सहकार्यासाठी २५ वर्ष आणि सरकार विरोधी लिखाण व पोलीस कस्टडीतून पळ काढणे याकरिता २५ अशी एकूण ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली. ( त्यापैकी प्रत्यक्ष भोगावी लागली ९ वर्ष, १० महिने) सावरकर जेव्हा राजद्रोहाच्या खटल्यामुळे अंदमानात बंदी झाले त्यावेळेला महात्मा गांधी दक्षिण अफ्रिकेत होते. सावरकरांनी ३० ऑगस्ट १९११ रोजी इंग्रजांना पहिला दयेचा अर्ज केला आणि महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले १९१५ साली. म्हणजेच सावरकरांनी माफीचा अर्ज केल्यानंतर तब्बल ४ वर्षांनी. तोपर्यंत सावरकरांनी ५ माफीचे अर्ज केलेले होते..

स्वतः च्या आदर्शांना महान सिद्ध करण्यासाठी कोणतेही ऐतिहासीक संदर्भ न तपासता, तोंडावर पडण्याची भीती न बाळगता आपला पक्ष किंवा मातृसंघटनेने दिलेले मुद्दे जशेच्या तसे मांडण्याचा किळसवाणा प्रकार सुरु आहे. आज सावरकरांना गांधींनी सल्ला दिल्याचं सांगत आहेत, उद्या नथ्थुराम गोडसेलासुध्दा ‘मला मारुन टाक’ हा सल्ला गांधींनीच दिल्याचं सांगीतल्यास नवल वाटायला नको. म्हणजे गांधींच्या मृत्यूलाही गांधीच दोषी.

राजद्रोहाचा गुन्हा म्हंटला की गांधींबाबत एक प्रसंग हमखास आठवतो. सावरकरांवर राजद्रोहाचा खटला भरला होता तसाच राजद्रोहाचा खटला महात्मा गांधींवर देखील भरला गेला होता. सावरकरांनी न्यायालयात मी निर्दोष आहे, मी तसे काहीच केले नसल्याचे आपल्या बचावात सांगितले होते. पण त्यांचा बचाव निष्फळ ठरला व त्यांना अंदमानला जावे लागले. मात्र गांधीजींनी कोणतेही निवेदन न करता स्वतःचा बचाव करण्याचं नाकारलं. गांधींनी न्यायालयात ठामपणे सांगितले की, “याला आपण राजद्रोह म्हणत असाल तर तो मी केला आहे आणि आपण जर माझी सुटका कराल तर तो मी पुन्हा करेल. त्यासाठी मला शिक्षा करावयाची असेल तर जरूर करा.” स्वातंत्र्यप्राप्तीसाठीची खरी तळमळ, स्वतः च्या विचारांवरील निश्चल श्रद्धा, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी टोकाची त्यागभावना यामुळे महात्मा गांधीमंध्ये एक असामान्य निर्भयता आलेली होती. ती सावरकरांमध्ये दिसत नाही. नाहीतर अंदमानच्या बंदिवासात पोचल्याबरोबर दीड महिन्याच्या आत इंग्रज सरकारला दयेचा अर्ज देऊन स्वतःच्या सुटकेची मागणी त्यांनी केली नसती.

सावरकर ४ जुलै १९११ रोजी सेल्यूलर जेलमध्ये पोहोचले आणि सव्वा महिन्यातच त्यांनी (३० ऑगस्ट १९११ रोजी) पहिला दयेचा अर्ज केला. त्यानंतर २९ ऑक्टोबर १९१२ रोजी (सव्वा वर्षाच्या आत) त्यांनी इंग्रजांकडे दुसरा अर्ज पाठविला. वर्षभरात १३ नोव्हेंबर १९१३ रोजी सावरकरांनी तिसरा दयेचा अर्ज दिला. आणि वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ऑगस्ट १९१४ साली त्यांचा चौथा अर्ज इंग्रजांकडे पोहोचला. पुढच्याच वर्षी (फेब्रुवारी १९१५ मध्ये) सावरकरांच्या पत्नी-यमुनाबाईनी- महाराज्यपालांकडे अर्ज केला. नंतर युद्धकाळ असल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळं असेल, चार-पाच वर्ष सावरकरांनी अर्ज केले नाहीत. मात्र ३० मार्च १९२० रोजी सावरकरांनी पुन्हा अर्ज पाठवला आणि त्यानंतर १९२३ सालच्या १ आणि २३ ऑगस्ट रोजी सावरकरांचे माफीचे निवेदन इंग्रजांना मिळाले. आणि अखेर, १९२३ च्या डिसेंबरात दिलेल्या अर्जात सावरकरांनी भूतकाळातील स्वत:च्या कृत्यांबद्दल शब्दश: माफी मागितलेली दिसते. पहिला दयेचा अर्ज केला. १९११ ते १९२३ दरम्यान त्यांनी तब्बल आठ वेळा बिर्टिशांकडे दयेचे अर्ज केले.

त्या अर्जामध्ये ते ब्रिटिश सरकारला म्हणतात, ‘तुम्हीच आमचे मायबाप आहात. मी तुमचे लेकरू आहे. लेकरू विनंतीसाठी मायबाप सोडून कुणाकडे जाईल? माझे हृदय परिवर्तन झाले आहे. यापुढे ब्रिटिश सरकारविरुद्ध मी कोणतेच कार्य करणार नाही आणि सरकारला अडचणीतही आणणार नाही. आपण जर मला सोडले तर माझे सहकारी, अनुयायीही आपल्याला मदतच करतील.’ व ‘मी शासनाची कोणत्याही पद्धतीने सेवा करण्यास तयार आहे. कारण माझे परिवर्तन हे सद्सदविवेकबुद्धीला धरून आहे. त्यामुळे माझे भावी आचरणही तसेच असेल, अशी मला आशा आहे. सर्वशक्तिशाली असतात तेच कृपाळू होऊ शकतात आणि त्यामुळे चुकलेला मुलगा ब्रिटिश शासनाच्या पितृरूपी द्वाराखेरीज कुठं परतू शकेल?’ असे स्पष्टपणे लिहून टाकले. फक्त लिहिले नाही तर ते आयुष्यभर पाळले सुद्धा. हे अर्ज सुटकेसाठी नव्हते तर काय शिक्षा आणखी कठीण करण्यासाठी होते?

अनेक लोक असा तर्क देतात की, दयेचा अर्ज करणे ही सावरकरांची खेळी होती. असा दयेच्या अर्जाचा डावपेच खेळून तुरुंगातून बाहेर निघायचं आणि मग पुन्हा देशासाठी कार्य करायचं याकरिता त्यांनी तसे अर्ज केले. हे मान्य केव्हा होईल? जेव्हा बाहेर येऊन ते पुन्हा स्वातंत्र्यलढ्यासाठी स्वतः ला झोकून देतील. परंतु १९३७ साली सावरकरांची सुटका झाल्यापासून त्यांचा ब्रिटिश सरकारविरोधी एक आंदोलन दाखवा, एखाद्या ब्रिटिशांच्या कायद्याचं उल्लघंन दाखवा, एखाद्या निषेध मोर्च्यात सहभाग दाखवा आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन फक्त त्यांच्या सुटकेनंतर त्यांनी लिहिलेला एखादा ब्रिटिश सरकार विरोधी एखादा लेख दाखवा. ‘तुजसाठी मरण ते जनन’ हे ब्रिटिशांना सर्वार्थाने शरण गेल्यामुळे निरर्थक ठरत नाही काय? सावरकरांची ती किशोरवयातली ती शपथ, ती प्रतिज्ञा, काव्यातून भारतमातेसाठी व्यक्त केलेला त्याग हे सर्व ब्रिटिशांच्या जेलमधून सुटकेसाठी सहा वेळ मागितलेल्या माफीमुळे आणि सुटका झाल्यानंतर स्वातंत्र्यलढ्यापासून दूर व ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहून व आजन्म ६० रुपये पेन्शन घेतल्यामुळे ते वाङ्मय त्या प्रतिज्ञा म्हणजे फक्त शब्दांचे बुडबुडेच ठरतात.

त्यामुळेच स्वातंत्रवीर असा सावरकरांचा सर्वत्र प्रचार करणारे आचार्य अत्रे यांना १४ सप्टेंबर १९४१ च्या आपल्या ‘साप्ताहिक नवयुग’ मधून ‘स्वातंत्र्यवीर की स्वातंत्र्यशत्रू’ असा लेख लिहावा लागला. गांधींनी मात्र पल्या आयुष्यात सत्य आणि अहिंसा ह्या दोनच प्रतिज्ञा घेतल्या होत्या आणि त्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पाळल्या.”इंग्रजांनी त्यांना दोन वेळी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, यातूनच सावरकरांची देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची इच्छाशक्ती किती मजबूत होती याचा अंदाज येऊ शकतो.” असेही मा. संरक्षणमंत्री म्हणालेत. कुणाला किती शिक्षा सुनावली यावर जर देशभक्ती ठरणार असेल तर त्या अंदमान सेल्युलर जेलमध्ये अनेक असे कैदी होते ज्यांना अशा शिक्षा झाल्यात. १८५८ पासून अंदमानातील सेल्युलर जेल मध्ये शेकडो क्रांतिकारक आणले गेले. ते तिथेच म्हातारे झाले, अनेकांनी तर तिथेच अखेरचा श्वास घेतला. इंग्रजांच्या अत्याचाराला खंबीरपणे तोंड दिले, ते अमानुष अत्याचार सहन केले. ज्यांना सहन झाले नाहीत त्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्याविरुद्ध सत्याग्रह , उपोषण केली. पण त्यांनी कधीही इंग्रजांकडे दयेची भीक मागितली नाही. जेल अधिकाऱ्यांच्या अमानवीय वर्तनासमोर ते कधीच झुकले नाहीत मग ते का स्वातंत्र्यवीर नव्हते? कठोर शिक्षेचाच विषय आहे तर शिक्षेत मृत्युदंड सर्वात श्रेष्ठ. सावरकरांनी फक्त पिस्तूल पाठविले पण ज्या कान्हेरे व सहकाऱ्यांनी ते पिस्तूल घेऊन जॅक्सन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला प्रत्यक्ष मारले ते कान्हेरे आणि सहकारी फासावर लटकले तरी ते फक्त हुतात्माच. भगतसिंगांनासुद्धा फाशी झाली तरी ते फक्त शहीद. का हे सर्व लोक खरे स्वातंत्र्यवीर नाहीत का?

” भारताला सामरिक व सांस्कृतिक एकजूट ठेवण्यासाठीच त्यांचे प्रयत्न विसरू शकत नाही. त्यांच्यासाठी हिंदू हा शब्द एखाद्या विशिष्ट धर्म, पंथाशी निगडीत नव्हता तर भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक ओळखीशी जोडलेला होता, असा दावाही संरक्षणमंत्र्यांनी (मा. राजनाथ सिंग) केलाय. परंतु विनायक सावरकरांनी आज हिंदुस्थान एकजीव व एकात्म राष्ट्र झालेले आहे असे मानण्याची चूक आपण करता कामा नये. उलट या देशात मुख्यतः हिंदू आणि मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत हे मान्य करून चालले पाहिजे”. असे म्हणत द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आपल्या लिखाणातून आणि भाषणातून अनेकदा मांडला. सरदार पटेल जेव्हा देशातील संस्थाने स्वतंत्र्य भारतात विलीन करून घेत होते त्यावेळी सावरकरांनी अनेक संस्थानांना तुम्ही स्वतंत्र्य भारतात विलीन होऊ नका म्हणून सल्ला दिला. जुनागड आणि म्हैसूर च्या राजांना सावरकरांनी तुमची राज्ये स्वतंत्र्य घोषित करा म्हणून पत्र लिहिलं होतं. दक्षिणेतील त्रावणकोर संस्थानाने विलीनीकरणास नकार दिल्यावर सावरकरांनी त्यांना शुभेच्छांचं पत्र लिहिलं होत ह्या सर्व गोष्टी बहुदा सरंक्षणमंत्र्यांना माहिती नसाव्यात.

सावरकरांच्या अस्पृश्यताविचार आणि कार्याने डॉ. आंबेडकरांना सुद्धा प्रभावित केलं होत असेही संरक्षणमंत्री म्हणाले. पतीतपावन मंदिरामुळे ते असे म्हणत असतील तर पूर्वीच्या काळी अस्पृश्यांसाठीच्या जशा वेगळ्या कपबश्या होत्या तसेच वेगळे मंदिर म्हणजे पतीतपावन मंदिर. मी ज्या ताटात जेवतो त्यात जेवू देणार नाही तर त्यासाठी वेगळे भांडे, तसेच मी ज्या मंदिरात जातो तिथे जाऊ देणार नाही तर तुझ्यासाठी वेगळे मंदिर अशा गोष्टींचा बाबासाहेबांवर प्रभाव पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाबासाहेबांनी धर्म बदलल्या नंतर सावरकरांनी त्यांना ‘धर्मद्रोही-देशद्रोही’ म्हंटले होते. “पडून पडून तुमची उडी शेवटी हिंदू धर्माच्याच अंगणात पडली ना?” असे म्हणून हिनवले होते हे बहुदा मंत्रीमहोदयांना माहिती नसावे.गांधींनी सावरकरांच्या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती जगासमोर आली नाही किंवा दडवली गेली. गांधींना १९१७ पर्यंत काँग्रेसमध्ये महत्वाचे स्थान मिळाले होते.

त्या वर्षी मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या प्रादेशिक अधिवेशनात गांधींनी सावरकरांच्या सुटकेची मागणी करणारा ठराव सर्व प्रतिनिधींच्या सहमतीने मंजूर करून घेतला. नंतरच्या काळात दक्षिणेत काकीनाडा येथे भरलेल्या काँग्रेसच्या अ. भा. अधिवेशनातही त्यांनी तसा ठराव आग्रहपूर्वक संमत करून घेतला होता. सावरकरांच्या सुटकेसाठी त्यांनी पूर्ण काँग्रेसचं राबविली होती. एकदा एका सावरकर समर्थकाने गांधींना पत्र लिहून, ‘तुम्ही सावरकरांच्या सुटकेसाठी काय केले?’ असा प्रश्न कृतघ्नपणे विचारला तेव्हा त्याला उत्तर देतांना गांधींनी इतकेच लिहिले, ‘विनायक दामोदर सावरकरांच्या सुटकेसाठी मी काय केले, ते त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकरांना विचारा.’ १९३७ मध्ये मुंबई प्रांताच्या काँग्रेस सरकारनेच सावरकरांवरची सर्व बंधने रद्द केली. त्याच वर्षी सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. त्याच वर्षीच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात सावरकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत’मांडला आणि पाकिस्तानच्या निर्मितीची बीजे रोवली. सावरकरांची सशर्त सुटका होण्याआधी त्यांच्या सुटकेसाठी गांधींनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख समर्थक व विरोधक दोघेही करीत नाहीत.

शेवटी ज्यांच्या सुटकेसाठी महात्मा गांधींनी स्वयंस्फूर्तीने इतके प्रयत्न केले, इतरांनाही करायला लावले तेच विनायक दामोदर सावरकर गांधीजींच्या खुनातील आठव्या क्रमांकाचे आरोपी म्हणून न्यायालयाच्या कठड्यात बसलेले दिसावे ही बाब किती खेदजनक आहे. ज्या सावरकरांसाठी गांधींनी स्वतःहून पुढाकार घेऊन मदत केली. संपूर्ण काँग्रेस त्याकामी लावली त्यांच्याच कट्टर अनुयायाने म्हणजे गोडसे ने गांधींची ३० जानेवारी १९४८ ला हत्या केली. गोडसेचा गांधीहत्येतील साथीदार दिगंबर बडगे हा माफीचा साक्षीदार झाला. सावरकरांनी गोडसे व आपटेला ‘यशस्वी होऊन या’ असे सांगितल्याचे आपण स्वतः ऐकले व गांधीजींच्या हत्येला सावरकरांचा आशीर्वाद होता अशी साक्ष दिगंबर बडगेने न्यायालयात दिली होती. मात्र त्याची साक्ष खरी सिद्ध होईल असा कोणताही पुरावा तो न दाखवू शकल्याने न्यायालयाने सावरकरांची पुराव्या अभावी मुक्तता केली. गांधीजींचे पणतू तुषार गांधींचे असे म्हणणे आहे की नत्थुराम गोडसे ने जे न्यायालयात निवेदन केले ते निवेदन नत्थुराम करू शकत नाही ती सावरकरांची भाषा आहे. २२ मार्च १९६५ रोजी गांधींच्या हत्येचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कपूर कमिशनने त्याच्या अहवालात सावरकर हे गांधी खुनाचे प्रमुख सूत्रधार असल्याचे म्हंटले आहे. सरदार पटेलांनी सुद्धा, “जरी सावरकर संशयाचा फायदा घेत खटल्यातून सुटले तरी सावरकर यांच्या दुष्प्रचारामुळेच गांधींची हत्या झाली.” असे म्हंटले आहे.’

कै.काका गाडगीळांनी गांधी खून खटल्यासंदर्भात आपल्या ‘लाल किल्ल्याच्या छायेत’ या पुस्तकात “अपराधी व्यक्ती सुटली असेल; पण एकाही निरपराध्याला शिक्षा झालेली नाही!” असे सूचक विधान केलेले आहे. सावरकरांचा उदो-उदो आणि गांधींची बदनामी करण्यासाठी अशी बिनबुडाची आणि संतापजनक विधाने हे लोक करत राहतील परंतु यानिमित्ताने सावरकरांनी माफी मागितली होती हे स्वतः च ह्या लोकांनी कबूल करणे हे ही नसे थोडके.
*(‘मजबुतीका नाम गांधी’ या आगामी पुस्तकातून)*

✒️लेखक:-चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED