वाचन संस्कृती उत्कर्षाचे सिमोल्लंघन व्हावे – प्राचार्य डॉ.निंबोरे

29

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.15ऑक्टोबर):-पुस्तकांना शह देणारे अनेक माध्यम उपलब्ध आहेत.नव्याने चित्रपट माध्यम आले.रंगमंचावरील नाटकांची रेलचेल झाली.मात्र याचा कुठलाही परिणाम वाचन संस्कृतीवर झालेला नव्हता.उलट नाटकांचा एक वाचक वर्ग वाढलेला आपल्याला त्या काळामध्ये जास्त दिसून आला.आज मोबाईल,व्हाट्सअप,यूट्यूबच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती शेवटची घटका मोजत आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.एकीकडे असे असताना दुसरीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमधून कोटी रुपयांची उलाढाल पुस्तकावर होते आहे.

कथा,कादंबरी,कवितासंग्रह,निबंध संग्रह यांच्या अनेक आवृत्त्या निघताना आज दिसत आहेत.सप्रेम भेट म्हणून आवडीची पुस्तके भेट दिली जात आहेत.भविष्यात त्याकडे अधिक आशावादी दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.आता वाचन संस्कृती उत्कर्षाचे सिमोल्लंघन झाले पाहिजे.त्याकरिता अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे.असे विचार प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी व्यक्त केले.

आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अँड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.दत्तात्रय मुंढे म्हणाले,डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे जीवन हेच एक वाचनीय पुस्तक आहे.त्यांची पुस्तक प्रेरणा सदैव स्मरणात राहील.प्रा.रमेश भारुडकर,प्रा.आनंद देशमुखे,कवी प्रा.सय्यद अलाउद्दीन,प्रा.सुनील मुटकुळे,प्रा.विजय गव्हाणे,प्रा.विजय अग्रवाल,विशाल वर्धमाने,प्रा.बबन ऊकले,तानाजी घोडके,महादू गायकवाड,शिंदे आदी उपस्थित होते.