गडचिरोली च्या सच्च्या “सेवाभावी गाईड” सुधाताई सेता

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.16ऑक्टोबर):-काल दि. १५.१०.२०२१ रोजी गडचिरोलीच्या सुधाताई सेता आपल्यातून कायमच्या निघून गेल्याचे समजले. त्या बंगलोर येथे आपल्या मुलांकडे वास्तव्याला होत्या. गेल्या एक वर्षापासून त्या कँन्सर सारख्या शत्रूशी सारख्या लढत होत्या. काल मात्र त्यांंनी शेवटचा श्वास घेतला.माझी त्यांचेशी अशी फारशी ओळख नव्हतीच परंतु एक – दोन कार्यक्रमात त्यांचे विचार मला ऐकता आले . विचार प्रकटीकरणातून कुठल्याही व्यक्तीच्या कार्यपध्दतीचा अंदाज आपल्याला येत असतो, तसा मला आला. त्यांच्या भाषणातून हेही समजले की ,त्या पतजंली सेवा समितीच्याही योग शिक्षिका आहे. स्थानिक शिवाजी विद्यालयात शिक्षिका म्हणून त्यांनी उत्तमरित्या सेवा दिली.

सोबतच तेथील स्काऊट गाईडचे युनिट त्या समर्थपणे हाताळायच्या . शालेय विद्यार्थ्यांना त्या सेवेचे धडे द्यायच्या .एकंदरीत त्या माध्यमातून त्यांंनी स्काऊट गाईड च्या सेवाकार्याची माहिती आपल्या आदिवासी क्षेत्रात पोहचविली होती . सन २०१७ मध्ये दै. लोकमत च्या वतीने बसस्थानक जवळच्या गडचिरोली प्रेस क्लब मध्ये मला अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते. त्या कार्यक्रमात Outstanding Woman Award माझ्याच हस्ते त्यांना देण्यात आला होता. त्याप्रसंगी त्यांना मी ऐकले होते. दुसरा प्रसंग असा की, आमच्या गडचिरोली जिल्हास्तरीय शास.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकदा महिला दिनाच्या निमित्ताने रासेयो च्या वतीने त्यांना पाचारण केले होते.त्यावेळी त्यांंनी विद्यार्थींनींना केलेले प्रबोधन आणि दिलेले आनंददायी जीवनाचे सूत्रे महत्त्वाचे होते.

समाजातील स्रीपुरूष हे महत्त्वाचे घटक असून ह्या दोन्हींही घटकांनी जबाबदारीने वागले पाहिजे . लहान मुलांसोबत बोलताना आदरानेच बोलले पाहिजेत , हा त्यांच्या भाषणाचा भावार्थ मला पटला. आणि हे खरे आहे की, दैनंदिन जीवन जगताना बरेचदा सुसंवादी संवाद होण्याऐवजी विसंवादच जास्त घडून येतात. त्यातून राग,द्वेष,शंका -कुशंका निर्माण होऊन समाजमन दुषित होत असते. म्हणूनच बालमनावर संस्कार करतांनाच घरच्या वरिष्ठांनी, शिक्षकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे ,हा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. नवीन गोष्टी शिकणे आणि समाजासाठी स्वयंप्रेरणेने कार्य करणे हा त्यांचा स्थायीभाव होता. वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज रचित ग्रामगीतेच्या२० अध्यायात असाच विचार आलेला आहे,
समाजविकास ज्यास आवडे !
त्याने शिकवावे मुलींना धडे !
तैसीच शिकवावी टापटीप!
गाणे ,बोलणे ,वागणे अनुरूप !
…..याअनुरूप काम करणाऱ्या
बहुआयामी व्यक्तिमत्त्व सुधाताईंना भावपूर्ण आदरांजली ……
….. बंडोपंत बोढेकर ,गडचिरोली
दि. १६/१०/२०२१

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED