पाठीवर असलेला हात अतिशय प्रेरणादायी – लक्ष्मण पाटील सर

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील)

धरणगाव(दि.17ऑक्टोबर):-मोरपीस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ‘वृंदावन हॉस्पिटल, जळगाव’ चा उदघाटन सोहळा काल उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी साहेब होते. काल भाईंची भेट घेण्याचा योग जुळून आला आणि त्याच निमित्ताने अनेक आठवणी देखील जागृत झाल्या.राजकीय प्रवाहातून बाहेर निघालो, सामाजिक कार्य करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतोय. या सर्व प्रवासात अशी काही व्यक्ती विशेष आयुष्यात आहेत ज्यांच्या बाबतीत सांगायला शब्द अपुरे पडतात.

राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला झालेलो असलो तरी या व्यक्तींचा प्रभाव आजही कायम आहे. काल असाच एक अविस्मरणीय अनुभव आला. वृंदावन हॉस्पिटलचा उदघाटन समारंभ संपन्न झाला आणि आदरणीय भाईंची भेट झाली. माझं नाव भाईंच्या स्मरणात असेल की नाही माहीत नाही परंतु त्यांनी मला ओळखले हे मात्र नक्की. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून मी सूत्रसंचालन करत असतांना भाईंच्या बद्दल बोलण्याची संधी मिळाली आणि प्रत्येक वेळी मी देखील भरभरून बोलण्याचा प्रयत्न केलाय. काल त्याच गोष्टींचे स्मरण झाले आणि मी भाईंसोबत फोटो काढला.

भाईंनी जेव्हा माझ्या खांद्यावर अगदी प्रेमाने हात ठेवला तेव्हा माझं मन अगदी प्रसन्न झालं. हे सर्व अनमोल क्षण कायम हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवण्यासारखे आहेत.आदरणीय अरुणभाई गुजराथी साहेब म्हणजे प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व. तेज:पुंज चेहरा, चेहऱ्यावर स्मित हास्य, प्रसन्न आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणजेच भाई साहेब. मी भाईंच्या बाबतीत एवढं भरभरून बोलू शकतो कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे. असा कोणताही विषय नसेल ज्यावर भाई बोलू शकत नाहीत. शिक्षण, समाजकारण, राजकारण, वैद्यकीय, विधी व न्याय, वाणिज्य व व्यापार, संस्कृती ज्या विषयावर भाई बोलायला सुरुवात करतात तेव्हा ऐकणाऱ्या श्रोत्यांना असं जाणवतं की, यांच्या एवढं ज्ञान कदाचित या विषयाचे कोणाकडेच नसेल. विषयाची मांडणी करत असतांना सर्वांना तो विषय सहज आणि सोप्या पध्दतीने सर्वांच्या हृदयापर्यंत पोहचविण्याचे सामर्थ्य ज्या निवडक लोकांकडे असते त्यात आदरणीय भाईंचे नाव अग्रस्थानी आहे.

काल हॉस्पिटच्या उदघाटन सोहळ्यानिमित्त अध्यक्षीय भाषणात भाईंनी डॉक्टर ची व्याख्या, स्पेशालिस्ट म्हणजे काय?, सेवा या शब्दाचा अर्थ जेव्हा उलगडून सांगितला तेव्हा सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. मला भाईंच्या बद्दल प्रचंड आदर आहे कारण व्यक्ती किती ही मोठा असला तरी जगण्यात आणि वागण्यात साधेपणा कसा टिकवून ठेवावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाई साहेब. जे अवघड आहे ते सोपं करावं, जे सोपं आहे ते सहज करावं, जे सहज आहे ते सुंदर करावं आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावं याची प्रचिती भाईंच्या व्यक्तिमत्वातून क्षणोक्षणी अनुभवायला मिळते.
प्रगल्भ वक्ता म्हणजे काय? हे जर जाणून घ्यायचे असेल तर भाईंना ऐकले पाहिजे. बोलतांना शांत आणि संयमी राहून सुध्दा अतिशय प्रभावीपणे आपले मत मांडता येते किंबहुना प्रगल्भ वक्ते अतिशय शांत आणि संयमी राहून आपले मत मांडतात हेच शाश्वत सत्य आहे. बोलतांना कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता, भडक न बोलता देखील खूपच प्रभावी भाषण करता येते याचा अनुभव भाईंना ऐकतांना निश्चितच येतो.

लहान लहान ओढ्यांचे पाणी खळाळून वाहत असते, समुद्र मात्र नेहमी शांत असतो. खरं म्हणजे या लेखाच्या निमित्ताने व्यक्त होता यावे, भाईंच्या बद्दल असलेला आदर शब्दबद्ध करता यावा, यासाठी हा सर्व खटाटोप. आदरणीय भाईंच्या अंगी असलेली प्रतिभाशक्ती, वाकचातुर्य यातील १० टक्के वाटा जरी मला माझ्या बोलण्यात आणता आला तरी मी स्वतःला सिध्द करू शकलो, असं समजेल. सामाजिक कार्य करतांना आवश्यक असलेली ऊर्जा कालच्या भेटीच्या निमित्ताने मिळाली. ही ऊर्जा पुढे अनेक दिवस प्रेरणादायी ठरेल, एवढंच अगदी नम्रपणे सांगतो…
लेखनप्रपंच
लक्ष्मण पाटील, सर
विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED