घरात आई,गोठ्यात गायी त्यांचीच नेहमी होते भलाई – ह.भ.प.गणेश महाराज शेंडे

60

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.18ऑक्टोबर):-संताजवळच माणसाला शांती व आनंद मिळत असतो.जीवनात सुख हे मृगजळासारखे असते.जीवनात पश्चाताप झाल्याशिवाय जीवनाचा अर्थ कळत नाही आणि आनुतापाशिवाय उध्दार होत नाही.हरिनाम घेत घेत संसार करावा.घे..घे.. हरिनाम घे..माया सारी सोडुन दे…असे संत सांगतात,टक्का आहे तर टेक नाही तर टकाटका पाहत राहावे लागते ही तर या कलीयुगाची रित आहे.घरात आई,गोठ्यात गायी त्यांचीच नेहमी होते भलाई असे प्रतिपादन ह.भ.प.गणेश महाराज शेंडे (अहमदनगर) यांनी केले.आष्टी तालुक्यातील सोलेवाडी येथील श्रीमती बबईबाई तुळशीराम झगडे यांचे प्रथम पुण्यतिथीनिमित्त पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय वारकरी संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.गणेश शेंडे यांचे हरिकीर्तन झाले.

यावेळी ह.भ.प.दिनकरराव तांंदळे महाराज, बीड जि.प.चे माजी सदस्य देविदास आबा धस,ह.भ.प.रामदास महाराज शेंडे,ह.भ.प.सुरेश डोमकावळे महाराज, ह.भ.प.बाळासाहेब झगडे महाराज,दैनिक झुंजार नेताचे उपसंपादक उत्तम बोडखे,ह.भ.प.रेवाणनाथ लोंढे महाराज,माजी सरपंच दिनकर जगताप,ह.भ.प.पल्लवी महाराज लोंढे,गहिनीनाथ महाराज लोंढे,गोरख लोंढे,भापकर,भाऊसाहेब झगडे,चेअरमन रमेश झगडे,शहाजी झगडे आदि सामाजिक,राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना ह.भ.प.शेंडे महाराज म्हणाले की,गाथा तत्व जगतगुरु तुकाराम महाराज यांनी जगाला दिलेले आहे. हा पाचवा वेद आहे.जीवनात आपल्या वाट्याला आलेले दुःख आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी मातापिता धावपळ,कष्ट करत असतात.

याची मुलांनी जाणीव ठेवली पाहिजे.जन्माला येणाऱ्या पाल्यात दाता जन्माला यावा नाही तर शुर मुलगा जन्माला यावा.हाडामासाचा देह,सुक्ष्मदेह,कारण देह असे तीन प्रकारचे देह असतात.संसार हा एक प्रकारचा खेळ आहे.जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला हा खेळ खेळावाच लागतो.या खेळाचे वैशिष्ट म्हणजे अत्यंत नगण्य लोकांना यात विजय असतो तर इतर सर्वांची हार असते.संसारीक खेळाडू जीवाची ही हार मृतूच्या दाढेत स्थिरावते.अनेकांना ही हार सुखावह व्हावी वाटते.मृत्यू सुखाने यावा किंवा हाल अपेष्टा न होता यावा असे वाटत असले तरी तोही सुखाने येत नाही.आश्चर्य आहे जे आयुष्यभर आवडत नाही किंवा जे नकोच वाटते.ती मृत्यूरुपी हारही सुखाने मिळत नाही.खरे म्हणजे मृत्यू ही हार नव्हे किंवा वाईट नव्हे तर मृत्यू हे मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे.आयुष्यभर चांगले कार्य करणाऱ्यांना मृत्यू हा विजय वाटतो.

माया,मोहात अडकलेल्या जीवाला मृत्यू नकोसा वाटतो.जो व्यक्ती संसाराच्या मायाजाळात अडकत नाही तो संसाराच्या खेळात अडकत नाही.आपण या संसाराच्या मायाजाळात असूनही त्यापेक्षा पूर्णत: निश्चितच वेगळे आहोत असा आत्मविश्वास बाळगणारा व्यक्ती माया,मोह,द्वेष, ईर्षा,मत्सर,अहंकार यापेक्षा वेगळा होऊन संसाराच्या क्रीडांगणात आनंद लुटतो.आपणाला संसार म्हणजे काय आणि आपण नेमके कोण आहोत हे लक्षात आल्याने आपण संसारात राहूनही त्यापेक्षा वेगळे आहोत.मानवी जीवनाचा आनंद आपण मीला नष्ट करून लुटत आहोत.संसारात राहून संसारापेक्षा वेगळे राहणे अत्यंत अवघड आहे.ज्यांना आपण मी ,माझे,माझी म्हणतो त्या सर्वांना आपल्यापासून वेगळे करायचे आणि आपण त्यांच्यापासून वेगळे व्हायचेही कल्पनाही संसारात अडकलेल्या जीवाला पटणे शक्य नाही.उलट या जीवाला वाटते की आपण यांच्यासाठी व हे आपल्यासाठीच आहेत.मी,माझे,माझी आदीमध्ये गुंतलेल्या या जीवाला मूळात त्याच्या स्वत:चा खरा परिचय झालेला नसतो म्हणून त्याला हे सर्व मायाजाळ आपले वाटू लागते.

हे सर्व आपले वाटणे म्हणजे आपण खऱ्या आपणापासून दुरावणे होय.आपण कोण आहोत ? हे समजण्यासाठी ज्याला या प्रश्नाचे उत्तर समजले आहे व ज्याला त्याच्या खऱ्या स्वचा अनुभव आला आहे असा भेटावा लागतो असा महात्मा स्वतः होवून आपला शोध काढत येत नसतो तर अशाचा शोध आपणाला घ्यावा लागतो.चार लोक एखाद्याला गुरु मानतात किंवा एखाद्याच्यामागे पुढे खूप लोक राहतात त्याची प्रसिध्दीही खूप असते.त्याचे चमत्कारही चर्चेत असतात म्हणून त्यास आपण गुरु करावे असा विचार योग्य नसतो.सद्गुरुची प्रचिती बाह्य रंगाने येण्यापेक्षा अंत:रंगाने यावी असे ह.भ.प.गणेश महाराज शेंडे यांनी सांगीतले.