दुर्लभ योग: कोजागरी व ईद-ए-मिलादुन्नबी!

28

(नवान्न पौर्णिमा,ईद-ए-मिलाद व कोजागरी विशेष)

यंदा २०२१ साली ऋतुराज शरद अगदी आश्विन पौर्णिमेला मुस्लिम बांधवांची सर्वात मोठी ईद अर्थात ईद-ए-मिलादुन्नबी घेऊन आला आहे. नेहमीच्या कोजागरी व नवान्न पौर्णिमा या आहेतच की! त्यामुळे हा मिलाफ एक दुर्लभ-दुर्मिळ योग अमृतमयी आनंद, मैत्री व बंधुभाव यांचा वर्षाव नक्कीच करेल, असा आशावाद ‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारी हे या लेखप्रपंचाद्वारे व्यक्त करीत आहेत… संपादक.

*ईद-ए-मिलाद:* ईद-ए-मिलाद म्हणजे अल्लाहचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिवस होय. जगभर ईद-ए-मिलादुन्नबी हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या १२ तारखेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद-उल-फितर व दुसरी ईदुज्जुह आहेत. ईद-उल-फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते. ईद-उल-फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ ‘आनंद’ तर फितर म्हणजे दान करणे होय. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरीयत कायद्यातील मापदंड आहे.
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांचा जन्म इ.स.५७१मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या गावी झाला. जन्माअगोदरच त्यांचे पितृछत्र हरपले होते. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातोश्रींना पण देवाज्ञा झाली. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अशा या एकाकी पडलेल्या बालकाचे त्याच्या चुलत्याने संगोपन केले. लहानपणापासूनच शिक्षणापासून वंचित राहिलेला हा बालक धर्माचा संस्थापक बनला. आपल्या जीवनकाळात त्यांनी समस्त मानवजातीला उदारता, समता, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय आणि समरसतेची शिकवण दिली. त्यांची शिकवण केवळ काही विशिष्ट जातीधर्मापुरती मर्यादित नव्हती तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होती. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. ते अल्लाहचे अंतिम प्रेषित होते.

इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी, रसूल आदी नावांनीही संबोधिले जाते. इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वांत मोठा दिवस असल्याचे मानले जाते. सर्वत्र ही ‘ईदों की ईद’ वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

शेजारधर्माची अनोखी शिकवण येथे मिळते. इस्लामच्या शिकवणीनुसार घराच्या चहुबाजूंनी चाळीस घरांत राहणारी प्रत्येक व्यक्ती शेजारी आहे. त्या व्यक्तींसोबत शेजारधर्मानेच वागायला हवे. आपल्या परिचयातील प्रत्येकाशी सद्भावनेने वागावे. कोणाच्या भावना दुखावल्या जातील किंवा इतरांना त्रास होईल असे वर्तन टाळावे. संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती शेजारी असून शेजारधर्म पाळायलाच हवा, अशी इस्लामची शिकवण आहे. त्याची अंमलबजावणी करण्यावर अनेकांकडून भर दिला जातो. सर्वत्र सुख-शांतीसाठी प्रार्थना केली जाते. ईद-ए-मिलाद निमित्त उरूस काढण्यात येतो. सर्वत्र सुख-शांती टिकून राहावी यासाठी प्रार्थना करण्यात येते. एकमेकांची गळाभेट घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा दिल्या जातात.

*कोजागरी पौर्णिमा:* शरद ऋतूतील पावन उत्सव असणारा कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेचा भारतीय बौद्धधर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते. कृषी संस्कृतीत या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी- मोती तयार करणारी असेही संबोधिले जाते. परंतु हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री ती संस्कृतमध्ये ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागत आहे?’ असे म्हणते. ती मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते, अशी धारणा आहे. मान्यता आहे की ‘कोण जागे आहे?’ याचा मथितार्थ ‘कोण सजग आहे?’ आणि ज्ञानासाठी आतुर आहे, असे देवी विचारत येते.

कोजागिरी पौर्णिमेस होणाऱ्या प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदी जागर व वामन पुराणाने दीपदान जागर असेही म्हटले आहे. बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे? त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी, असे वामन पुराणात सांगितले आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते.

*नवान्न पौर्णिमा:* ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी शेतकरी बांधवांकडून नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागरीला दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. बाहेर शरदाच्या टिपूर चांदण्यात दूध आटविण्यास मांडलेले असते. त्या दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन करतात. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘आश्विनी’ साजरी करतात. कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. विशेषतः ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते.

निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा होय. या दिवशी नवीन तांदळाचा भात व खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात, अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली दिसते. घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते.

हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवे बांधतात. नवे म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी होय. दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांवरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो, असे मानले जाते.हा त्रिवेणी संगम आपापल्या स्वभाव गुणांची चुणूक दाखवून या शरद पौर्णिमेच्या रसमयी योगाने सर्व भारत मातेच्या सुपुत्रांना गुण्यागोविंदाने एकत्र नांदण्यास बळ देवो, हीच एक मनोकामना!

✒️संकलन व शब्दांकन -‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारी[भारतीय सण-उत्सवांचे गाढे अभ्यासक तथा साहित्यिक]मु. एकता चौक, रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली, फक्त व्हा. नं. ९४२३७१४८८३.
इमेल- Krishnadas.nirankari@gmail.com