विकासकामात दिरंगाई केल्यास खपवून घेणार नाही

41

🔹खासदार अशोक नेते यांचा इशारा

🔸दिशा समितीच्या बैठकीत विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा

✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गोंदिया(दि.19ऑक्टोबर):-गोंदिया जिल्ह्यातील अनेक विकास कामे अजूनही प्रलंबित आहेत. दीड वर्षांपूर्वी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत सूचना देऊनही अनेक कामे प्रलंबित आहेत. यासाठी त्या-त्या विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत हे सिद्ध होते. कोविड मुळे बैठक न झाल्याने अधिकारी कोरोनाचे कारण सांगून कामे झाले नसल्याचे सांगत आहेत मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याने विकासकामे होऊ शकलेले नाही याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असून यापुढे विकासकामात दिरंगाई केल्यास खपवून घेणार नाही असा इशारा खासदार अशोक नेते यांनी दिला. आज दि 18 ऑक्टोबर रोजी आयोजित दिशा समितीच्या बैठकीत आढावा घेतांना ते बोलत होते.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण ( दिशा) समितीची आढावा बैठक गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली गोंदिया- भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार मा सुनीलजी मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि. 18 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली.

बैठकीला प्रामुख्याने गोंदिया विधानसभा चे आमदार विनोद अग्रवाल, अर्जुनी मोरगाव विधानसभा चे आम. मनोहर चंद्रिकापुरे, तिरोडा विधानसभा चे आमदार विजय रहांगडाले,आमगाव विधानसभा चे माजी आमदार संजय पुराम, दिशा समितीचे सदस्य तथा भाजपचे ज्येष्ठ नेते झामसिंगजी येरणे, जिल्हाधिकारी नैना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प संचालक उपस्थित होते.