वंचित बहुजन आघाडीचा विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी “गाव तिथे शाखा” आवश्यक : कुशल मेश्राम

26

🔸वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.१९ऑक्टोबर):-वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा तथा समस्त बहुजनांचे आधारस्तंभ श्रद्धेय अँड. बाळासाहेब आंबेडकर हे अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त, आदीवासी, अल्पसंख्याकाच्या मूलभूत हक्क व अधिकारासाठी संघर्ष करीत आहेत. त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असला तरी त्यांचे कार्य व विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी योगदान देणे आवश्यक आहे. आगामी काळात होणा-या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या विचाराचे रुपांतर मतात असे होईल याबाबत चिंतन करणे आवश्यक आहे. त्याकरिता वंचित बहुजन आघाडीचा विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी “गाव तिथे शाखा” आवश्यक असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे विशेष निमंत्रित सदस्य कुशल मेश्राम यांनी केले.

वंचित बहुजन आघाडी चिमूरच्या वतीने स्थानिक अपना मंगल कार्यालयात संघटन समीक्षा व संवाद यात्रा निमित्य आणि वीर बाबूराव शेडमाके स्मृती प्रित्यर्थ आयोजित कार्यकर्ता मेळावात कुशल मेश्राम बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जयदेव खोब्रागडे होते. यावेळी विचारमंचावर वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रदेश प्रमुख समन्वयक तथा माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे, विदर्भ प्रदेश समन्वयक अरविंद सान्देकर, जिल्हा सदस्य मधु वानखेडे, अश्विन मेश्राम, कपूर दुपारे, स्नेहदीप खोब्रागडे, रुपचंद निमगडे, तालुका निरीक्षक मधुकर उराडे, तालुका अध्यक्ष नितेश श्रीरामे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. रमेशकुमार गजभे म्हणाले, सद्यस्थितीत निवडणुकांचे संदर्भ बदललेले आहेत. “निवडणुक आणि पैसा” हे नवीन समीकरण बहुजन समाजाच्या राजकारणासाठी घातक असले तरी कार्यकर्ता ध्येयवादी असल्यास नवीन संदर्भाचा काहीही परिणाम होत नाही. ओबीसीचे प्रश्न समजून कार्यकर्त्यांनी जनतेत जाणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी यापूर्वीच्या अनेक निवडणुकांचे उदाहरण देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विविध पक्षाचे कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यात ईश्वर धारणे डोंगरगाव, रामदास वाघमारे चकजाटेपार, झामानंद धनविजय, राजेंद्र चुनारकर, प्रत्रू गुरनुले, सुरेश गायकवाड, मनोहर पाटील आदींचा समावेश आहे. त्यांचे पक्षाच्या वतीने विशेष स्वागत करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीच्या विचाराने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय झालेले बोथलीचे सरपंच विनोद देठे, उपसरपंच देविदास नन्नावरे, ग्रा. प. सदस्य शुभम मंडपे (आंबोली), विकास बारेकर विहीरगाव, राजू घोनमोडे नेरी, गौतम धनविजय चिचाला, अमोल धनविजय चकजाटेपार यांचे विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे शेवटी वडाळा पैकु येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नागदेवते, संचालन चिमूर शहर अध्यक्ष शालिक थूल यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष नितेश श्रीरामे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंखेने कार्यकर्ते उपस्थित होते.