मिलिंद यादव यांच्या दोन पुस्तकांचे रविवारी प्रकाशन

24

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.21ऑक्टोबर):-निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशित सुप्रसिद्ध चित्रकार, लेखक आणि विचारवंत मिलिंद यादव लिखित राबणारे हात आणि डोंगर माथ्यावरील बहुजनांच्या आया या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांचा हस्ते रविवार दि. 24 ऑक्टोबर, 2021 रोजी सायं. 5:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस हे उपस्थित राहणार आहेत.

राबणारे हातच इतिहास घडवतात. राबणाऱ्या हातांची ओळख, हीच त्या समाजाची खरी ओळख असते. अशा समाज घडवणार्‍या हातांचा आपल्या शोधक नजरेतून मिलिंद यादव यांनी राबणारे हात या पुस्तकातून…. तर प्रत्येक गावचे, गावातल्या जात समूहाचे आसपासच्या डोंगरावर, माळरानावर देवस्थान असते. त्या देवाची म्हणून एक अख्यायिका असते. मंत्रमुग्ध करणारी कहाणी असते त्यातूनच उत्क्रांत होत गेलेल्या समाज समूहाचे दर्शन घडते.या दर्शनाचा डोंगर माथ्यावरील बहुजनांच्या आया या पुस्तकातून मिलिंद यादव यांनी वेध घेतला आहे.वरील दोन्ही पुस्तके चित्रमय असून सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारी आहेत. अतिशय दर्जेदार व रंगीत साच्यामध्ये तयार झालेली ही पुस्तके आकर्षणाचा विषय ठरली आहेत.

या प्रकाशन समारंभास कोल्हापूरातील कला व साहित्य प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन निर्मिती प्रकाशनचे अनिल म्हमाने व संवाद प्रकाशनच्या प्रकाशिका प्रा. शोभा चाळके यांनी केले आहे.सदर प्रकाशनाचा कार्यक्रम निर्मिती प्रकाशन, live संवाद, निर्मिती विचारमंच, निर्मिती फिल्म क्लब, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, संवाद बुक शॉप या फेसबुक पेजवरून एकाच वेळी पाहता येणार आहे