गंगाखेड शुगरचा १२ वा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम संपन्न

🔸ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकण्यात आली

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21ऑक्टोबर):- शुगर अन्ड एनर्जी लि.सन २०२१-२०२२ चा १२ वा गळीत हंगाम शुभारंभ आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न झाला.कारखान्यास मागील वर्षीच्या गळीत हंगामात सर्वाधिक ऊस तोडणी व वाहतूक करणारे ठेकेदार कथा ऊस उत्पादक शेतकरी श्री.पंढरीनाथ माधवराव शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मीनाताई पंढरीनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते श्री.सत्यनारायण पूजा व कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व खातेप्रमुख यांच्या शुभ हस्ते गव्हाणीत मोळी टाकण्याचा कार्यक्रम कारखाना स्थळी संपन्न झाला.शासनाने कोविड-१९ बाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत व अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडल्याचे दिसत होते.

कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गळीत हंगामासाठी विहित वेळेत गाळपाची तयारी पूर्ण केल्याबद्दल सर्व विभागाचे अभिनंदन केले तसेच गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये १० लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.तसेच गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये गाळप होणाऱ्या उसास शासनाच्या नियमाप्रमाणे (एफआरपी प्रमाणे)उसाला भाव दिला जाईल तसेच गळीत हंगाम २०२१-२२ करिता कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पुरवठा करून सहकार्य करावे.कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यावर्षी अतिरिक्त पर्जन्यमान झाल्यामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तरीसुद्धा कार्यक्षेत्रातील ऊस शिल्लक राहणार नाही याची दक्षता कारखान्याकडून घेतली जाईल.

ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार व कर्मचारी हे कारखान्याचे आधारस्तंभ असून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता व्यवस्थापनाकडून घेतल्या जाईल असे आवर्जून सांगितले.याप्रसंगी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी श्री.हनुमंत लटपटे, ऊस उत्पादक शेतकरी श्री.वैजनाथ रावजी शिंदे व कारखान्याचे शेतकी अधिकारी श्री.बळीराम शिंदे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त करताना गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि.च्या गळीत हंगाम २०२१-२२ करिता जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार एच.आर. मॅनेजर श्री.प्रदीप वेरूळकर यांनी मांडले. या कार्यक्रम प्रसंगी कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व्यापारी तसेच कारखान्याचे अधिकारी कर्मचारी कामगार उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED