अन्यथा एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊन देणार नाही-पूजा मोरे

26

✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आवेज)

तलवाडा(दि.22ऑक्टोबर:-अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेली पिके होत्याची नव्हती झाली. शेतातील माती वाहून गेली यामुळे शेतकरी सध्या संकटात असून सणासुदीच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडलेला आहे. शासनाने मदत जाहिर केली असली तरी अद्यापही अतिवृष्टीची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तसेच मागील सन 2020 चा खरीप व फळबाग विमा तसेच यावर्षीचा पीकविमाही शेतकऱ्यांना वितरित नाही. त्यामुळे सणवार कसा करावा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांची दिवाळी कडू होणार असेल तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही. असा दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुजा मोरे यांनी दिला आहे.

दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी अनुदान, पिकविमा वर्ग करा, नसता ही दिवाळी आम्ही मंत्र्यांच्या दारात साजरी करु, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे यांनी दिला आहे. पुजा मोरे म्हणाल्या, यावर्षी शेतकऱ्यांनी शेतीत मोठा खर्च करुन पिके चांगली आणली होती. मात्र मागील महिण्यात झालेल्या अतिवृष्टीने जोमदार आलेली पिके होत्याची नव्हती झाली. काही ठिकाणी पिकांसह शेतातील माती देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसला आहे. खर्च करून, शेतात राबराब राबून अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचे अतिवृष्टी पँकेज जाहीर केले असले तरी प्रशासकीय स्तरावर या मदतीचे वाटप लवकर होईल असे वाटत नाही.

दसरा तर शेतकऱ्यांचा आर्थिक संकटात गेला आहे, दिवाळी तरी शेतकऱ्यांची गोड व्हावी. या हेतूने शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीची मदत वाटप करावी. तसेच मागील सन 2020 चा खरीप व फळबाग विमा तसेच यावर्षीचा पीकविमाही शेतकऱ्यांना वितरित करावा. जर हि मदत वाटप तात्काळ वाटप न केल्यास शेतकऱ्यांची दिवाळी कडू साजरी होत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हे कदापिही सहन करणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांची दिवाळी कडू होणार असेल तर तुमची दिवाळी आम्ही गोड होऊन देणार नाही. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदानासह पिकविमा वाटप करा, नसता मंत्र्यांच्या दारात दिवाळी साजरी करु, असा सज्जड दम पुजा मोरे यांनी दिलाय.