कोजागिरीनिमित्त कड्यात रंगले कविसंमेलन

31

🔸कडा येथील हाॕटेल रिच डायमंड हाॕलमध्ये रंगलेले कवी संमेलन

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.24ऑक्टोबर):;कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने आष्टी तालुक्यातील कडा येथील रिच डायमंड हॉलमध्ये नवोदित कवी आणि कवयित्रीच्या कवितांनी विविध विषयांवर चौफेर टोलेबाजी करीत राजकीय-सामाजिक आर्थिक धार्मिक आणि वैचारिक क्षेत्रही अक्षरशः ढवळून काढले आणि रिच डायमंडचा परिसर अक्षरशा कवितांच्या चांदण्यानी लख्ख प्रकाशमय झाला…

‘ऐक कुणब्याच्या पोरा,
माय असू दे घरात,
अंधारल्या रातीसाठी,
ठेव पणती दारात..
या मातापित्याच्या महत्व सांगणाऱ्या युवा कवी युवराज वायभासे यांच्या कवितेने श्रोत्यांची मने जिंकली.

आई रुसून बसते,
घर होते मुके..
तिच्यामागेच चोरपावलांनी
निघून जातात सुखे!
ही कविता श्रोत्यांना गहिवरुन आणणारी ठरली.तसेच जीवनात यश कसे मिळते.जीवनाचे तत्व काय असते यावर भाष्य करणारी युवराज वायभासे यांची कवीता आनेकांना भावली…

आपल्या सगळ्यांच्या मनात
असूनही काहींना कधीच जाता
येत नाही हवं..तितकं उंच!
झोका किती ‘उंचीच्या
झाडाला बांधलाय ना,
यावर ठरत असतं आपलं
उंच जाणं खरं तर..
खुज्या झाडाला बांधलेला
झोका आजवर कधीच कुणाला
हव्या त्या उंचीवर नेऊ
शकलेला नाही..हेच खरं !

ही आयुष्यातील यशाच्या उंचीवर भाष्य करणारी कविता होती.
आष्टी तालुक्यातील कडा येथील हाॕटेल रिच डायमंडचे मालक सुशांत सोनवणे यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने कवीसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कवी संमेलनात आष्टी तालुक्यातील कवी हरीश हातवटे,महादेव लांडगे,इंद्रकुमार झांजे,प्रा.नागेश शेलार,युवा कवी युवराज वायभासे यांनी सहभाग नोंदविला.या कवीसंमेलनात आपल्या प्रेमाची जुन्या आठवणींना विसरून जातांना पुन्हा पुन्हा त्या आठवणी कशा प्रकारे जाग्या होऊन प्रेमवीराला सतावतात अशा आशयाची प्रा.नागेश शेलार यांच्या कवितेने संमेलनास सुरुवात झाली.

‘आता पुन्हा त्या चांदण्याचे
नाव काढायचे नाही,
आता रूपेरी आठवाचे पेव
फोडायचे नाही.!’
ही कविता सादर केली.कवी इंद्रकुमार झांजे यांनी कोरोनामुळे जनतेला भयंकर अशा संकटांचा सामना करावा लागला.दोन वर्षांत कोरोनामुळे माणसं किती मेली आणि या मेलेल्या माणसाच्या प्रेताची कशी अव्हेलना झाली.याची आलेली प्रचिती त्यांनी आपल्या वेळ तेवडी सरकत होती या कवीतेतुन मांडली.

“जग झालते ठप्प,
चालती बोलती माणसं सगळी
क्षणात झालती गप्प..!”
या कवितेतून व्यक्त केली.कवी महादेव लांडगे यांनी बहीणभावाच्या प्रेमाला वाचा फोडणारी कविता सादर करून रसिक प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला.

एकदाच म्हणशील का
ह्यो दादा तुझा हाय…!
ही कविता सादर केली.
कवी हरीश हातवटे यांनी ‘विरह’ ही प्रेमाची कविता सादर करून एकतर्फी करणा-या प्रेमविरांचे कान टोचले.

‘माझं तुझ्यावर प्रेम आहे,
याची मलाही खंत आहे!
पण दोघांच्या मिलनात वेडे
सृष्टीचा अंत आहे…!’

तु मला विसरून जा असा
तीला संदेश तर दिलाच, परंतु सद्यस्थितीतील प्रेमवीरांना अंतर्मुख व्हायला लावले.
कवी हरीश हातवटे यांनी कविता सादर केली कवितेचे शिर्षक भारी ठरले..

‘सतरा साते किती?’
‘बे एकेबेमध्ये राहीला नाही राम,
पाढ्यामधल्या संख्यांनाच
फुटू लागलाय घाम..!’
उजळणीवर सरस्वतीला वाटते
आता भीती कसं सांगू गुरुजी
सतरा साते किती?

यानंतर समारोप करताना कवी युवराज वायभासे यांनी प्रेमविरहात बुडालेल्या प्रेमींसाठी

कोठे उजेड आहे
झोपडीत माझ्या,
मी ठेवले निखारे काळजात माझ्या
ही कविता सादर केली.

या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रघुनाथ कर्डीले हे होते.या कविसंमेलनाचे बहारदार सुत्रसंचलन कवी युवराज वायभासे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार कवी संमेलनाचे आयोजन साहित्यिक मित्र आणि संयोजक मुख्याध्यापक श्रीमंत सोनवणे सर यांनी मानले.यावेळी पत्रकार दिगंबर बोडखे,राजेंद्र जैन,भाऊसाहेब गाडे,आण्णासाहेब साबळे हे उपस्थित होते.