नागपूर येथे लवकरच आदिवासी धर्म परिषद – दशरथ मडावी यांची घोषणा

🔹बिरसा क्रांती दलाचे प्रशिक्षण शिबीर संपन्न

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)

सेवाग्राम(दि.24ऑक्टोबर):- या देशाचे आद्य रहिवाशी असलेल्या आदिवासींचे बाहेरून आलेल्या उपऱ्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक शोषण केले आहे. आदिवासी समाजाला आत्मभान आणून देण्यासाठी आणि त्याच्यावरील वर्षानुवर्षाचा सार्वत्रिक अन्याय संपुष्टात आणण्यासाठी सांस्कृतिक लढाईला सिद्ध व्हावेच लागेल. त्याची व्यापक तयारी करण्यासाठी लवकरच नागपूर येथे आदिवासी धर्म परिषद आयोजित केली जाणार आहे, अशी घोषणा बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी येथे केली.सेवाग्राम- वर्धा येथे बिरसा क्रांती दलाचे तीन दिवशीय आंतरराज्य आदिवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर नुकतेच पार पडले. या शिबिराच्या समारोप सत्रात मडावी बोलत होते. यावेळी बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय सचिव तथा माजी पोलिस अधिकारी बाबासाहेब कंगाले,बिरसा क्रांती दलाचे म.रा.अध्यक्ष रंगराव काळे , उपाध्यक्ष बी. डी. अंबुरे, प्रा. काशिनाथ लाहोरे, प्रा. अरविंद खैरकर, महाराष्ट्र महिला फोरम चे अध्यक्ष गिरीजा उईके आदी मान्यवर उपस्थित होते.

बिरसा क्रांती दलाचा कृती कार्यक्रम जाहीर करताना दशरथ मडावी म्हणाले, आदिवासींच्या इतिहासाचे विकृतीकरण करणे आणि आदिवासी नायकांना खलनायक ठरवणे यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल. त्यासाठी आदिवासींचा इतिहास आणि तत्त्वज्ञानाचे पुनर्लेखन करण्यात येईल. येत्या १५ नोव्हेंबरपासून २०२२ सालासाठी सभासद नोंदणी, बिरसा मुंडा नागरी आदिवासी पतसंस्था प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी बैठका लावणे, महात्मा रावण पूजन कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे, पहिली आदिवासी धर्म परिषद नागपुरात तर दुसरी नाशिक येथे आयोजित करणे, बिरसा क्रांती दल महिला आघाडी बळकट करणे असा कृती कार्यक्रमही त्यांनी जाहीर केला. शिबिरात तीनही दिवस आदिवासींचा खरा इतिहास आणि प्रस्थापितांची लबाडी याचा सप्रमाण पंचनामा मडावी यांनी केला.आदिवासी कार्यकर्त्यांनी कायदेविषयक ज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व विशद करून बाबासाहेब कंगाले यांनी अनेक कायदेविषयक कलमांची माहिती दिली.
डी. बी.अंबुरे यांनी आदिवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजनातील व्यवस्थापकीय कौशल्ये, माहिती तंत्रज्ञानाचा चळवळ वाढविण्यासाठी वापर, शिस्तबद्ध कार्यक्रम याविषयी सहभागींना मार्गदर्शन केले.बिरसा क्रांती दल ही केवळ आदिवासी उत्थानाचीच चळवळ न राहता देशातील दलित- ओबीसींच्या लढ्याला पुढे नेणारा सर्वसमावेशक लढा ठरावा आणि राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी त्याचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा प्रभाकर ढगे यांनी व्यक्त केली.
१७ ते १९ आॕक्टोबर २०२१ या तीन दिवशीय शिबिरासाठी गोवा, कर्नाटक येथून तसेच विदर्भातील सात जिल्ह्यातील बिरसा क्रांती दलाच्या ५० हून अधिक निवडक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. सकाळी ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत विविध विषयावर प्रबोधन करण्यात आले. व्यक्तिमत्त्व विकास, आदिवासी स्वातंत्र्य व आत्मसन्मानाचे लढे, आदिवासीसाठींचे कायदे, अंधश्रध्दा निर्मूलन, आदिवासींचा सांस्कृतिक संघर्ष, आरक्षणाचा इतिहास, आदिवासी चळवळी आणि राजकारण, आदिवासी संस्कृती आणि धर्म, जनगणना आणि आदिवासींची भूमिका, आदिवासींची शैक्षणिक अवस्था व उपाय, आदिवासीवरील अन्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. सहभागी प्रतिनिधींनी चर्चेत सहभागी होऊन शंका निरसन करून घेतले.यावेळी बिरसा क्रांती दल महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षपदी प्रशासकीय अधिकारी गिरीजा उईके यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
गोवा आणि कर्नाटकात बिरसा क्रांती दलाचे काम वाढविण्यासाठी गोव्यात राष्ट्रीय पातळीवरील आदिवासी कार्याकर्ता शिबीर घेतले जाणार आहे.शिबिरात सहभागी झालेले प्रशिक्षणार्थी प्रा, अरविंद खैरकर, गिरीजा उईके, प्रभाकर ढगे, जितेश कुडमेथे, मारोतराव उईके, विजय काळे, दिलीप गेडाम, अर्जुन युवनाते, गोकुळदास मडावी, महादेव आत्राम, नागोराव गेडाम, व्ही. डी, कोवे, नारायण पिलवंड, मालती किनाके आदींनी अनुभव कथन केले.
महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED