शेतकऱ्यांचा बेवारस झेंडू आणि आमचा आबा

28

आबा तसा आमचा जिद्दी शेतकरी.दोन वर्षे कोरोनात गेली पण गडी कधी थकला नाही.बापानं करुन ठेवलेलं सोसायटीचं कर्ज, खासगी सावकाराचं देणं असून पण कुणाला गडी भिला नाही. लॉकडाऊन मधे रानात थोडे माळवं-भाजीपाला पिकवायचा आणि सायकल वर तर कधी मोटार सायकल वरून लांब शहरा पर्यंत भाजीपाला विकायला जायचा.लॉकडाऊन मधे कोणी पकडलं तर त्याला किलो दोन किलो वांगी- दोडकं देवून जाग्यावर सेटलमेंट पण करायचा. लय जुळलं नाही तर खिशातल्या डायरीतून माझा मोबाईल नंबर काढून आमच्या वकील साहेबांशी बोला,पुण्याला मोठं वकिल साहेब आहेत म्हणायचा.

एकदा एकाच पोलिसाला दोन वेळा लॉकडाऊन मधे सापडला.मग आबाला पोलिस चौकीतच बसवून ठेवला. शेवटी मी जाऊन चौकीतून सोडवुन बाहेर आणला, भाबडेपणाने आबा वळुन परत चौकीत गेला आणी सगळ्याला वांगी तंबाटी देवून आला.तिथले पोलिस अधिकारी चांगले होते आबाला त्याचा भोळेपणा पाहुन मालाचे पैसेही दिले. असा आमचा भोळा भाबडा आबा.यंदा मात्र आमचा शेतकरी आबा रडला हतबल झाला.दसरा नवरात्रात झेंडू फुलाला चांगली मागणी असते म्हणून आबाने आगोदरच झेंडू लागवड केली होती.परवा त्याच्या गावाला गेल्यावर मला आवर्जून घरी घेवुन गेला.शेणा मातीनं सारवलेलं घर,हातरुनाव पडलेला बाप,बाजरीचं दळण निवडत बसलेली म्हतारी आई, दोन ठिकाणी शिवलेला फ्रॉक घालुन बसलेली पोरगी व ठिगळानी जोडलेली हाफ चड्डी घालुन बसलेला पोरगा अभ्यास करत होता.आबा ने मला फिरुन त्याची झेंडूची शेती दाखवली.आबाच्या बायकोनं तेवढ्यात डोक्या वरचा पदर सावरत कोरा चहा फुलपत्रात आमचे समोर ठेवला.आबानं पोरीला जवळ करत तीची शाळेची वही मला कौतुकाने दाखवली.

आबा म्हणाला या वेळी झेंडू विकला की पोरांना चांगली कपडे हडपसर वरुन घेवुनच येतो. मला निरोप देताना आबा म्हणाला साहेब या वेळी तुमच्या हडपसरच्या ऑफीस समोर उड्डाण पुलाच्या खाली जागा धरतो झेंडू विकायला.तिथं पैशे चांगले होतील.ठरल्या प्रमाणे आदल्या दिवशी आबाच्या सगळ्या कुटुंबाने अगदी आनंदाने झेंडूची फुले तोडली, भाड्याने बारका टेंपो घेतला, म्हतारीला आणी पोटच्या लेकीला मदतीला घेवुन पहाटे साडे तीनला हडपसरच्या पुला खाली जागा पटकावुन दसराच्या दिवशी छान दुकान थाटलं.फुलाचे दोन ढीग केले एकीकडे म्हतारी व पोरगी व दुसरी कडे आबा बसला.मला सकाळी 8 वाजता फोन केला.जाम खुश होता गडी त्यावेळी.झेंडू घ्या झेंडू जोरात ओरडायचा.

पण सकाळी नऊ नंतर झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात पुलाखाली वाढली.खुप माल घेऊन विक्रेते वाढले. 150 रुपये किलोचा झेंडू तासा भरात 30 रुपयावर आला,दुपारी 12 नंतर 20 रुपये किलो झाला. 2 वाजता तर एक पण गिराईक येईना.आबानं रडवला चेहरा करत शेवटी प्ल्यास्टीक क्यारी बैग भरून 5 रुपये किलो दर केला.घसा बसो पर्यंत झेंडू घ्या झेंडू ओरडायचा.पण गिराईक फीरकत पण न्हवते.शेजारी म्हतारी धीर देत होती. पण आबाच्या डोळ्यासमोर पोरांची सनासुदी साठीची नवी कापडं सारखी दिसत होती.समोरच्या बाजूचे लहान मुलांचे कपड्याच्या दुकानावर त्याची सारखी नजर जात होती.शेवटी या कोरोनाला- लॉकडाऊनला न घाबरणारा आमचा आबा संध्याकाळी मात्र हतबल झाला.शेजारचे झेंडू विक्रेते कधीच फुले तशीच बेवारस सोडून, ढिग सोडून निघुन गेली होती.आबाचं तर अजुन टेम्पोचे भाडे पण वसुल झाले न्हवते.
मला समोर बघीतल्याव आबा धायमोकलून रडायला लागला.सकाळ पासुन माय लेकराने अन्नाचा घास खाल्ला न्हवता.पोरगी सुधा भुकेली होती.सोडून द्या आता उठा म्हणत मी त्या तिघांना माझे ऑफिस शेजारच्या हॉटेलात घेवुन गेलो.पोटाला खायला घातले.त्यांना चहाची ऑर्डर देवून मी पाच मिनिटात आलो म्हणत समोरच्या कपड्याच्या दुकाना गेलो.

आबाच्या पोराला-पोरीला नवीन ड्रेस विकत घेतला.आबाच्या हातावर मी नविन ड्रेस ठेवताच आबा परत रडायला लागला.धीर देत गाडी भाड्याचे पैसे मी देऊ लागलो तर नको, हायती थोडं फार जमल्यात म्हणाला.पोरीचा हात पकडून आबा, म्हातारी आई जात असताना मी किती तरी वेळ पाहत होतो.
कष्टाने पिकवलेल्या सोन्या सारख्या झेंडुंच्या फुलांना निरोप देवून एक हतबल शेतकरी राजा परतीच्या वाटेने निघाला होता. उद्याच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी या काळ्या आईच्या कुशीत पुन्हा नव्याने सोने पिकवण्यासाठी.शेतकरी जेव्हा त्याचा माल बाजारात विकायला येईल त्यावेळी फार घासा घिस करु नका.खुप स्वप्ने दडलेली असतात.जय किसान

✒️वैभव धायगुडे-पाटील(विधीज्ञ,जिल्हा परिषद पुणे)मो:-9822760659