फास्टर फेणे: भा.रा.भागवत!

26

(भास्कर रामचंद्र भागवत पुण्यस्मृती विशेष)

लहानपणापासून इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची भास्कर रामचंद्र भागवत यांना आवड होती. शालेय जीवनात माय मॅगझिन हे नियतकालिक आणि गिबन्स, डिकन्स, थॅकरे तसेच ह.ना.आपटे, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे साहित्यांमुळे प्रभावित होऊन बालवयातच लेखन सुरू केले. त्यांच्याविषयी श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींच्या सुंदर शब्दशैलीतून जरूर वाचा… संपादक.

भा.रा.भागवतांचा जन्म दि.३१ मे १९१० रोजी इंदुर येथे निरीश्वरवादी सुधारकी कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामचंद्र भागवत हे सरकारी शाळेचे सुधारकी विचार असलेले मुख्याध्यापक होते. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रात येणाऱ्या, सेंट झेवियर्स महाविद्यालयातून अर्थशास्त्र हा विषय घेऊन बीएची पदवी घेतली. इंग्रजी साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता. दुर्गाबाई भागवत यांच्याशी त्यांचे दूरचे नाते होते. सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत काही लेखनाचा उपक्रम केला होता; पण तो प्रकाशित झाला नाही. घरातील साहित्यप्रेमी पोषक वातावरणामुळे त्यांनी ‘वसंत’ नावाचे मासिक काढले होते. बालपणी त्यांनी त्यांची आतेबहीण दया परांजपे यांच्या मदतीने ‘निळे पाकीट’ या रहस्यमय कादंबरीचे लेखन केले व ते छापूनही आले. वयाच्या दहाव्या वर्षी भागवतांची मांजरीवरील कविता आनंद मासिकात छापून आली होती. त्याच सुमारास त्यांनी चित्रावरून लिहिलेली एक गोष्ट ‘बालोद्यान’ या मासिकात प्रसिद्ध झाली होती.

भास्कर रामचंद्र भागवत हे बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार आणि विनोदी लेखक होते. ते भा.रा.भागवत या नावानेच प्रसिद्ध होते. मराठीतील पहिल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांनी लहान मुलांसाठी विशेषत: कुमार वयोगटासाठी अनेक कादंबऱ्या व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबऱ्या व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी ज्यूल व्हर्न या प्रसिद्ध व आद्य-विज्ञान कथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत केले. त्यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार हे नायक इ.स.१९७० आणि १९८०च्या दशकात प्रसिद्ध पावले. मुलांसाठी त्यांनी ‘बालमित्र’ हे नियतकालिक चालवले; तसेच ‘पुस्तक हंडी’सारखे उपक्रमही केले. त्यांनी १८४हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांची वर्गवारी- ४९ कथासंग्रह, १०० कादंबऱ्या, ४ चरित्रे आणि ३२हून अधिक अन्य पुस्तके.

भा.रा.भागवतांनी इ.स.१९३०च्या दशकापासून पत्रकारितेस आरंभ केला. इ.स.१९३५-३६मध्ये ते दैनिक सकाळचे उपसंपादक होते. इ.स.१९३७-३८ कालखंडात ते प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते. ऑल इंडिया रेडियोच्या दिल्ली केंद्रावरील वार्तापत्राचे ते मराठी अनुवादकही होते. मो.क. गांधींच्या अटकेची बातमी प्रसारित न करण्याचे आदेश असतानाही त्यांनी ती केली व नोकरीचा राजीनामा देऊन ते भूमिगत झाले. तेव्हा त्यांचा विवाह लीलावती यांच्याशी होऊन त्या गरोदर होत्या. पण भास्करराव भूमिगत झाल्यावर त्यांना लपतछपत मुंबईत परत येणे भाग पडले. याच काळात एस.एम.जोशी यांच्यासोबत ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. विसापूरच्या तुरुंगात त्यांनी त्याबद्दल कारावासही भोगला. त्याच काळात त्यांची आई वारली. त्यांच्या थोरल्या मुलाचा- रवींद्रचा जन्मही ते तुरुंगात असतानाच झाला. या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना पुढे सरकारी निवृत्तिवेतन मिळत असे. तुरुंगवासाच्या काळातही त्यांचे लेखन चालू होते.

सुरुवातीच्या काळात ते विनोदी कथालेखन करत असत. माझा विक्रम, वैताग वनातील वाफारे हे त्यांचे सुरुवातीच्या काळातले काही विनोदी कथासंग्रह. मराठीतील उत्कृष्ट विनोदी कथासंग्रहात श्री.राम कोलारकरांनी त्यांच्या जवळपास वीस कथा अंतर्भूत केलेल्या आहेत. स्वतंत्र विनोदी कथा, भाषांतरित व रूपांतरित विनोदी कथा, लोकप्रिय रहस्यकथा व प्रेमकथांची विडंबने अशा सर्व प्रकारचे लेखन त्यांत आहे.
बाल-कुमारांसाठीच्या बालमित्र या पाक्षिकाचे भागवत संस्थापक होते. हा अंक त्यांनी जवळजवळ सात वर्षे काढला. त्यातले बहुतेकसे लेखन भागवत एकटाकी करत. त्यासाठी ते विविध टोपणनावे वापरत असत. हा अंक हौशेपोटी चालवताना त्यांना त्या काळात हजारो रुपयांचे कर्ज झाले होते. इ.स.१९७५ सालच्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. पुढे वृद्धापकाळाने त्यांचे दि.२७ ऑक्टोबर २००१ रोजी पुणे येथे निधन झाले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांच्या अविस्मरणीय स्मृतिप्रीत्यर्थ त्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.मु. पो. ता. जि. गडचिरोली, मोबा. ७७७५०४१०८६.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com