धरणगाव शहरात “ओबीसी मोर्चा” व “राष्ट्रीय किसान मोर्चा” ची बैठक संपन्न !

23

🔹शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा – चंद्रकांत जगदाळे.

🔸ओबीसींची जाती निहाय जनगणना झाली पाहिजे – प्रा.विश्वासराव पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.26ऑक्टोबर):- धरणगाव येथे ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चाची बैठक ओबीसी मोर्चा चे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारणी सदस्य राजेंद्र वाघ यांच्या निवासस्थानी यशस्वीपणे संपन्न झाली.या “ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा” च्या बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख यांनी केले. या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा जगदाळे, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे खान्देश प्रभारी सुधाकर बडगुजर, राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव पाटील व बहुजन नेते, माजी शिक्षणविस्तार अधिकारी सुमित्र अहिरे होते.

सर्वप्रथम उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांना मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष चंदनराव पाटील, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य महेश (बंटी) पवार, आदिवासी नेते विनोदराव चव्हाण, बडगुजर समाजाचे अध्यक्ष वासुदेव बडगुजर व माळी समाजाचे पंच गोपाळ अण्णा माळी, दिलीप बापू महाजन यांच्या हस्ते शिवराय – फुले – शाहू, आंबेडकर व अण्णाभाऊ या महापुरुषांचे अनमोल ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले.सर्वप्रथम राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे यांनी शेतकऱ्याविरोधी तीन काळे कायदे व ओबीसी हा संपूर्ण शेतकरी वर्ग आहे. याविषयी विस्तृत असं मार्गदर्शन केले, हे कायदे कसे घातक आहेत हे समजून सांगितले.

राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे खान्देश प्रभारी तथा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर बडगुजर यांनी ओबीसीची जातीनिहाय जनगणना, मंडल कमिशनचे रिपोर्ट, क्रिमिलेअर अटी यासंदर्भात मार्गदर्शन केले. राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव पाटील यांनी कुळवाडीभूषण – बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवरायांचे स्वराज्य शेतकऱ्यांचे हिताचे होते आणि आजपावेतो प्रत्येक सरकार शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडत आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड लिहून सावकारशाही विरुद्ध बंड पुकारला. आज देशातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही आकड्यांची गरज नाही. सर्वाधिक जनता ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्या कृषिक्षेत्राच्या दारुण स्थितीला महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे आजपर्यंतच्या सरकारची कृषिवषयक धोरणे.

या धोरणांमधून कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या मुख्य समस्यांना बगल दिली जात आहे. तर दुसरीकडे फक्त कर्जमाफीसारख्या योजना आणून शेतकऱ्यांचे सरकारवरचे अवलंबित्व वाढविले जात आहे, हे भयानक षढयंत्र आहे. यानंतर धरणगावातील राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख यांच्या शेतातले हायटेक कंपनीचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांची कशी फसवणूक झाली व संबंधित शेतकऱ्यांना योग्य रीतीने न्याय मिळवून दिला असे विविध उदाहरणासह अनमोल मार्गदर्शन प्रा.पाटील यांनी केले. यानंतर राष्ट्रीय ओबीसी मोर्चा तथा माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांनी ओबीसींची जातिनिहाय जनगणना, मराठा आरक्षण, शेतकरी आंदोलन, शेतकरी विरोधी तीन काळे कायदे या सर्व घटकांवर मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यात १९९० च्या आधी ओबीसींचे स्वतंत्र असं राजकारण नव्हतं. ‘मंडल आयोग’ लागू झाल्यावर ओबीसी राजकीयदृष्ट्या जागृत झाले, परंतु त्यातील बहुतांश लोक समतेच्या विचारापासून दूरच राहिले.

त्याचे मुख्य कारण म्हणजे ओबीसींची स्वतःची अशी अस्मिता तयार झाली नव्हती. आज समस्त ओबीसी समुदाय हा भारतातील एक मोठी राजकीय शक्ती म्हणून उदयास आला आहे. मात्र, या प्रचंड शक्तीला सामाजिक परिवर्तनाच्या ऊर्जेत परिवर्तित करण्याचे आवाहन समकालीन ओबीसी चळवळीपुढे अग्र-क्रमाने आहे. मात्र, या जातीअंतासाठी प्रथम ओबीसींनी आपल्या स्व-जातीय अस्मितेतून पहिल्यांदा बाहेर आले पाहिजे. पण यासाठी योग्य मार्ग कोणता? हा ही मुख्य प्रश्न आज चळवळी समोर आहे. ‘ओबीसीं’मध्ये काम करणाऱ्या अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांच्या तोंडून मी नेहमी ऐकत आलो आहे की, या समुदायामध्ये सामाजिक-राजकीय जागृती घडवून आणण्याचे काम खूप कठीण आहे. आणि मलाही हे सत्यच वाटते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा एक अभ्यासक-कार्यकर्ता म्हणून ओबींसीच्या सामाजिक-आर्थिक अशा भौतिक मुद्यांवर जन – चळवळी उभारत त्याला प्रबोधनाची साथ देत सांस्कृतिक चळवळीकडे आकृष्ट करावं लागेल आणि यातूनच ओबीसींमध्ये संरचनात्मक बदल होईल असं मला मनापासून वाटतं. परंतु अशा प्रकारची समग्र चळवळ उभी करतांना अनेक पेच आहेत ते आधी नीट समजावून घेऊन त्याची रणनीती आखावी लागेल.

तसेच, आतापर्यंत मराठा बांधवांनी काढलेले मोर्चे पाहिले तर, जगाला हेवा वाटावा असे शांततापूर्ण मोर्चे निघाले परंतु, याचा परिणाम झाला नाही. डॉ.बाबासाहेबांनी संविधानात सर्वांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे म्हणून मराठा समाजासाठी आरक्षणाची तरतूद आहे. यासाठी जाती समूहांचे वर्गीकरण झाले तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकते. कुणब्याचे मराठाकरण केले. हे एक मोठे षडयंत्र आहे. याबाबत मराठा आरक्षण संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच, यापुढे होणाऱ्या शेतकरी आंदोलनासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहीजे. येणाऱ्या “१० डिसेंबरला जगाचा पोशिंद्यासाठी एक दिवस भारत बंद यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे ” अशी विनंती श्री.अहिरे यांनी उपस्थितांना केली.या वैचारिक बैठकीचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील यांनी तर आभार लक्ष्मणराव पाटील यांनी केले.

या कार्यक्रमास प्रा.बी. एल. खोंडे, ऍड.शरद माळी, सुनील देशमुख सर, व्ही.टी. माळी सर, सिताराम मराठे, महादू अहिरे सर, कैलास पवार सर, आकाश बिवाल सर, गौतम गजरे, रामचंद्र माळी, दीपक सोनवणे, रविंद्र निकम, राजेंद्र पॉलिटिक्स माळी, विक्रम पाटील सर, दिनेश भदाणे, अरुण विसावे, वाल्मिक पाटील, जितू महाराज, दीपक मराठे, निलेश महाजन, आकाश महाजन, प्रवीण चव्हाण, गणेश कोतवाल, गणेश माळी, महेश बडगुजर, गणेश गुरव, ईश्वर बडगुजर, बिंदीलाल बडगुजर, ज्ञानेश्वर माळी, अरविंद चौधरी, प्रमोद जगताप, हर्षल निकम, सुनील लोहार, योगेश येवले, पंढरीनाथ वाघ, जितेंद्र सोनार, राकेश माळी, भटू पाटील, पप्पू माळी, कमलाकर पाटील, राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.