समाजावर न संपणारे उपकार करणारा अवलिया : कामाजी पवार

36

जगद्गुरू तुकाराम महाराजांनी दानाचे महत्व सांगताना फार महत्वाचा उपदेश केलेला आहे. तुकोबा म्हणतात सरे ऐसे ज्याचे दान त्याचे कोण उपकार. म्हणजे ज्याचे दान लगेच संपून जाते, टिकतही नाही अशा तुटपुंजे दान करणार्याचे समाजावर मानव जातीवर कोणतेही उपकार नसतात अये तुकोबा म्हणतात. एके ठिकाणी ते म्हणतात की नका देवू दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. समाजातील प्रस्थापितांना उपदेश करताना तुकोबा म्हणतात की अरे बाबानो ज्या गोष्टीमध्ये सार आहे महत्वाची बाब आहे मौल्यवान गोष्ट आहे अशा गोष्टींचे दान तुमच्याकडून होत नसेल तर हरकत नाही पण किमान ताकाचे दान करण्याची तरी दानात ठेवा. या अभंगात तुकोबांनी दुध आणि तक यांची तुलना केलेली आहे. दुधामध्ये साय लपलेली असते. साय हेच दुधाचे सारसर्वस्व असते. परंतु ताक हा जो पदार्थ आहे तो दुधाच्या तुलनेत कमी महत्वाचा आहे. किमतीच्या दृष्टीनेही आणि उपयोगाच्या दृष्टीने सुद्धा. कारण लोणी रुपी सार काढून घेतल्यानंतर जो पदार्थ उरतो त्याला ताक असे म्हटले जाते.

म्हणजे दुधाच्या तुलनेत ताक हा टाकाऊ पदार्थ म्हटल्यास हरकत नसावी. समाजात काही लोक एवढे अप्पलपोटे असतात की त्यांच्याकडील टाकाऊ पदार्थांची सुद्धा समाजातील गरजूंना मदत करत नाहीत. परंतु मराठा सेवा संघ हे असे विद्यापीठ आहे की जिथे सामन्यातील सामान्य व्यक्ती सुद्धा आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने प्रेरित होवून कार्य करत असतो. कारण युगपुरुष खेडेकर साहेबांनीच तसे संस्कार सेवा संघाच्या माध्यमातून समाजातील लोकांवर केलेले आहेत. खेडेकर साहेबांच्या याच संस्कारातून फुललेले व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय कामाजी पवार सर हे होत.कामाजी पवार सरांचा जन्म हा अत्यंत सामान्य अशा शेतकरी कुटुंबात झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनही त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी मारली.

याचे कारण म्हणजे त्यांचे वडील गंगाधरराव यांनी त्यांच्यावर केलेले शिक्षणाचे संस्कार हे होत. आणि कामाजी सरांनी याच जोरावर अगदी चौथी बोर्डाच्या परीक्षेत बोर्डात पहिला येवून आपल्या विद्वत्तेची चुणूक दाखवून दिली. म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्यांचे चौथी बोर्डाच्या परीक्षेत पहिले येणे हे त्यांच्या भावी जीवनातील वाटचालीचे निदर्शक होते. अभ्यासाची असलेली गोडी पवार सरांनी बालपणापासूनच एवढी जपली की ते सातवीच्या बोर्डातही पहिल्या क्रमांकाने पास झाले. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि त्यामुळेच आपला समाजाचं उद्धार होतो हे संस्कार त्यांच्यावर होत होते. परिस्थिती हलाखीची असताना आणि आजच्या युगातील कसल्याही सुविधा उपलब्ध नसताना पवार सरांनी शिक्षण क्षेत्रात जी उत्तुंग भरारी घेतली ती वाखाणण्याजोगी त्र आहेच पण समाजातील विविध घटकांना प्रेरणा देणारी सुद्धा आहे.

शाळेत जाण्यासाठी केवळ एकच ड्रेस असणारा विद्यार्थी, शिक्षक दिनाच्या दिवशी त्याचं ड्रेसला तांब्याच्या मदतीने इस्त्री करणारा विद्यार्थी, इस्त्री करताना चड्डी नको तिथे जाळली म्हणून शिक्षक दिनाचे शिकवणे चुकवणारा विद्यार्थी भविष्यात हजारो मुलांना शिक्षणाची आणि नोकरीची संधी उपलब्ध करून देईल असे जर कुणी म्हटले असते तर त्याला वेड्यात काढण्यात आले असते. परंतु जिद्द आणि चिकाटी या दोन गुणांच्या जोरावर कामाजी पवार सरांनी आपल्या परिस्थितीवर सुद्धा मात केली आणि त्यांची ओळख महाराष्ट्रालाच नव्हे तर सबंध देशाला होत आहे. शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेल्या कामाजी पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळे करावे या भावनेने कृषी खात्यात उल्लेखनीय कार्य केले. कृषी विभागातील शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या असणाऱ्या विविध योजना त्यांनी शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचवल्या. तुकोबांनी म्हटलेच आहे, येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नोहे. कबिरही म्हणतात जिस तन लागे वही तन जाणे बिजा क्या जाणे गव्हारा रे. म्हणजे ज्या शरीराला वेदना माहित असतात ते शरीरच त्या वेदनेची तीव्रता समजून घेवू शकतो इतर लोक त्याची कल्पनाही करू शकत नाहीत.

एका शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतल्या मुळे त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा बालपणापासून पाहिलेल्या होत्या नव्हे त्या स्वतः भोगलेल्या सुद्धा होत्या. म्हणूनच कृषी विभागात नोकरी करत असताना ते शेतकऱ्यांच्या समस्या अंतकरणातून समजून घेवू शकले. त्यांच्या समस्येवर प्रशासकीय समाधान देवू शकले. नव्हे जिथे शासन कमी पडले तिथे त्यांनी स्वतःची वैयक्तित मदत शेतकरी किंवा त्यांच्या पोरांनाही द्यायलाही मागेपुढे पहिले नाही. माझे एक शेतकरी कुटुंबातील डॉ मित्र आहेत. ते आजही त्यांच्या डॉ होण्याचे श्रेय आदरणीय कामाजी पवार सरांना देतात. कारण आमचे हे मित्र सीइटी परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. त्यांची नामांकित मेडिकल कोलेजला निवडही झाली. परंतु त्यांच्यासमोर प्रश होता तो पैशांचा. एवढा मोठा पैसा उभा करायचा तरी कसा? आणि त्यांनी कामाजी पवार सरांना आपली अडचण सांगितली. सरांनी क्षणाचाही विचार न करता त्यांना मदत आणि मार्गदर्शन दोन्हीही केले. आज आमचे हे मित्र शेकडो रुग्णांना असाध्य आजारातून मुक्त करत आहेत. ही दानत माणसाच्या काळजात असावी लागते. म्हणूनच तुकोबा म्हणतात की ज्याचे दान चटकन संपणारे असते अशा लोकांचे समाजावर काहीही उपकार असत नाहीत. कामाजी पवार सरांनी असे न संपणारे उपकार समाजातील विविध घटकांवर केलेले आहेत.
त्यांच्या या सामाजिक कार्यामुळेच त्यांची निवड मराठा सेवा संघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी व सध्या मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी झालेली आहे. खेडेकर साहेब नेहमी म्हणतात की समाजातील क्रीम वर्गाने समाजाकडे वळून पहिले पाहिजे. प्रस्थापित माणसे जेव्हा जेव्हा समाजाकडे वळून पाहतात तेव्हा तेव्हा समाजाचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कामाजी पवार सरांनी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष असताना माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे कार्य जर कोणते केले असेल तर ते म्हणजे मराठा सेवा संघाचा तपशीलवार इतिहास लेखन करून घेवून ते प्रकाशित करण्याचे आणि शिवधर्म गाथा जी सध्या मराठी भाषेत उपलब्ध आहे तिचे हिन्दी भाषेत भाषांतर करून प्रकाशित करण्याचे.

ही दोनही कामे समाजासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहेत. त्यांच्या एका पुस्तकामुळे येणाऱ्या पिढ्यांना मराठा सेवा संघाचा इतिहास समजणार आहे तर दुसऱ्या पुस्तकाने हिंदी भाषिक लोकांना शिवधर्म समजून घेता येणार आहे.एवढे सर्व सामाजिक कार्य करत असतना त्यांनी आपल्या प्रशासकीय पडला सुद्धा न्याय दिलेला आहे. आणि त्यांचे प्रशाशानातील कार्य पाहुणा त्यांना महाराष्ट्र सरकारने विविध पुरस्कार देवून सन्मानितही केले आहे. अशा या समाजशील व्यक्तिमत्वाला गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अत्यंत गंभीर आजाराला तोंड द्यावे लागले. एकवेळ तर अशी परिस्थिती निर्माण झाली की सरांचे आता काहीही होऊ शकते. इकडे माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु ज्याचं आयुष्याच परिस्थितीशी झगडत गेलेले आहे त्या कामाजी पवार सरांनी या गंभीर आजाराशी सुद्धा हिमतीने सामना केला. आणि शेवटी चिकाटीने त्या आजारावर मातही केली. जणू त्यांनी संदेश दिला की इतक्या लवकर मी हार मानणार नाही.

लअशा या समजशील व्यक्तिमत्वाच्या हातून अजूनही सामाजिक कार्य घडो, त्यांच्या उपक्रमांचा समाजाला जास्तीती जास्त फायदा होवो हीच माझी सरांचा चाहता म्हणून अपेक्षा आहे. आणि सरांसाठी पांडुरंगाकडे एकच मागणे मागतो जे आपल्या संत नामदेवांनी समस्त संतांसाठी मागितले होते. ते म्हणजे,अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी हे संत मंडळी सुखी असो.कामाजी पवार सरांना निरोगी असे दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून असेच साजैक शैक्षणिक कार्य घडत राहो याचा सदिच्छ्या. जय जिजाऊ !

✒️डॉ. बालाजी जाधव(लेखक/वक्ते तथा प्रकाशक)मो:-९४२२५२८२९०