शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, पालकमंत्री धनंजय मुंडेंनी यंत्रणा लावली कामाला

28

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.27ऑक्टोबर):-राज्य शासनाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने 2860 कोटी रुपयांची प्राथमिक मदत काल अध्यादेश जारी करून वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी यानुषंगाने यंत्रणांना लगेचच कामाला लावली आहे. बीड जिल्हा प्रशासनाने 24 तासांच्या आत यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण केली असून, आज तहसीलदारांमार्फत तालुका स्तरावर ही मदत वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य शासनाने मदत जाहीर केल्यानंतर बीड जिल्ह्याच्या वाट्याला मराठवाड्यात सर्वाधिक 502.37 कोटी रुपये मदत मिळणार आहेत. ही रक्कम अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसीलदारांना उपलब्ध करून देत वितरण करण्यासंबंधीचे आदेश आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत. संबंधित तहसीलदारांनी या रक्कमा महसुल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने थेट जमा कराव्यात असेही या आदेशद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात या रक्कमा दिवाळीपूर्वी जमा होतील हे आता निश्चित झाले आहे.