सेवानिवृत्त शिक्षकांचे उमरखेडमध्ये उपोषण आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

21

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.28ऑक्टोबर):- सातवा वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची थकबाकी त्वरित देण्याच्या मागणीसाठी बुधवारी सेवानिवृत्त शिक्षकांनी येथील पंचायती समितीसमोर उपोषण केले.मागण्या त्वरित मान्य न झाल्यास यानंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. शिक्षकांना ३५ वर्षे सेवा दिल्यानंतर सुद्धा न्याय मागणीसाठी उपोषण करावे लागत आहे. शासनाने मंजूर केलेल्या सातव्या वेतन आयोगातील २०१९ मध्ये मंजूर पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची थकबाकी त्वरित देण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

रजा रोखीकरण्याची रक्कम द्यावी ,अंशराशीकरणाची रक्कम मिळावी, सेवानिवृत्तीचे वेतन दरमहा एक तारखेला करावे, आदी मागण्या आहेत .केवळ पंचायत समिती शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे आमच्यावर ही वेळ आली, असा आरोप त्यांनी केला.उपोषणात सेवानिवृत्त केंद्र प्रमुख तथा पालिकेचे शिक्षण सभापती प्रकाश दूधेवार, तुकाराम यमजलवार, प्रभाकर जीवने ,बाबूसिंग जाधव, भगवान दळवी ,प्रकाश जाधव, वर्धमान मुंडे ,शेख यकीन ,अशोक भोसले ,अशोक काळे, शंकर शिराळे, अहेसानउल्ला खान ,इंदिरा भालेराव, कर्तारसिंग पडवळे ,दिलीप गुंडावार, भगवान कांबळे ,आर.सी .माने आदी सहभागी होते.

त्यांनी यानंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
६४ सेवानिवृत्तांवर होतोय अन्याय सर्व आयुष्य शैक्षणिक कार्यात झिजवलेल्या ६४ सेवानिवृत्त शिक्षकांच्या हक्कांच्या व मेहनतीच्या देयकासाठी त्यांना उपोषण करावे लागते .ही निंदादायक बाब आहे. त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली.