समाजात अनेक व्यक्तींच्या अंगात देवी-देवता आलेले आपण बघतो. देवी-देवता एखाद्या व्यक्तीच्या अंगात संचारून लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देतात, अनेक चमत्कार करतात, त्यांना भूत-भविष्य-वर्तमान समजत, जे बोलतील ते अगदी १००% सत्यच बोलतात, १०-१० लोकांना आवरत नाहीत, वेगवेगळ्या भाषेत बोलतात अशा अनेक मान्यता समाजात आहेत. एखाद्या व्यक्तीच्या अंगात देवी येते म्हणजे त्या व्यक्तीची धार्मिक व पर्यायाने सामाजिक प्रतिष्ठाच वाढून जाते. देवीने याच व्यक्तीची अंगात येण्यासाठी निवड केली म्हणजे ही कुणीतरी विशेष व्यक्ती असली पाहिजे, हिला सिद्धी प्राप्त असली पाहिजे किंवा ही देवीचाच अवतार असून या जन्मात माणूस बनून पृथ्वीवर अवतरली आहे असे अनेक निष्कर्ष काढले जातात. आधी ग्रामीण भागात हे प्रमाण प्रचंड होते परंतु आता शहरीभागात सुद्धा या प्रकाराने आपले हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे.

देवी-देवता अंगात येण्याचे प्रामुख्याने ३ प्रकार असतात. यातील पहिला प्रकार म्हणजे सजेशनने (सूचनेद्वारे) अंगात येणे. या प्रकारात आपले अंतर्मन म्हणजेच सबकॉन्शस माइंडला मेंदूकडून काही सजेशन म्हणजे सूचना मिळतात. ह्या मेंदूकडून मिळालेल्या सूचना आपला सबकॉन्शस माइंड स्वीकारतो आणि व्यक्तीच्या अंगात येणे सुरू होतं. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण उदाहरण घेऊया की एखाद्या महिलेच्या कुटुंबातील स्त्रियांच्या अनेक पिढ्यांपासून नवरात्रीला अंगात येतं. मग त्या परिवारात नवीन सून आली की तिच्या डोक्यात पण वारंवार ठसवले जाते की आपल्या घरातील बायांच्या अंगात प्रत्येक नवरात्रीत एकविरा माता येतेच. मग तिचा मेंदू तिच्या मनाला सूचना द्यायला लागतो की आपल्यासुद्धा अंगात येणारच. त्या सूचना त्या सुनेचं अंतर्मन स्वीकारत आणि ज्यावेळी नवरात्री येते त्यावेळी तिच्या अंगात येणं सुरु होत. तसेच एखाद्या ठिकाणी प्रचंड धार्मिक वातावरण आहे. नवरात्रीच्या वेळी दुर्गादेवी जवळ धूप बत्ती लावली आहे, घंटानाद सुरु आहे, डफडे वाजत आहेत, आरती सुरु झाली तर या अतिशय भारावलेल्या वातावरणात एखाद्या व्यक्तीला आपल्या अंगात येत आहे असं वाटून तिला थोडं घुमल्यासारखं होऊ शकते. अशी प्रकरणे फार गंभीरतेने घेण्यासारखी यासाठी नसतात कारण असे वर्षातून एखाद वेळी घडते. ते नेहमी नेहमी होत नाही.

दुसरा आणि महत्वाचा प्रकार म्हणजे ढोंग. काही काही व्यक्तींच्या अंगात अमावस्या आणि पौर्णिमेला येतं. काहींच्या अंगात प्रत्येक मंगळवार किंवा शुक्रवारी सवारी येते. काहींच्या अंगात तर आपल्या घरी भक्त मंडळी जमली की लगेच अंगात येणं सुरु होतं मग तो कोणताही दिवस असो. मग लोक अशा ठिकाणी दरबार भरवले जातात. आपापल्या समस्या-प्रश्न विचारले जातात. त्यासाठी दक्षिणेच्या स्वरूपात पैसे उकळले जातात. हे सर्व प्रकार म्हणजे शंभर टक्के ढोंग असतात. अस कधीच कुणाच्या अंगात देवी-देवता येत नसतात. असं जर कुणाच्या अंगात कधी आलं तर त्या व्यक्तीला माहीत नसलेले प्रश्न आपण विचारले पाहिजेत. जसे की समजा एखाद्या बाईच्या अंगात देवी आली तेव्हा जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तिला माझं लग्न कधी होणार? तुम्हाला मुलगा असेल तर, मला मुलगा कधी होणार? तुम्ही इंजिनियरिंग करत असाल तर मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन कधी मिळणार असे प्रश्न विचारा. जर खरच तिच्या अंगात देवी देवता असल्या तर ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला सांगेल की तुमचं लग्न झालेलं आहे किंवा तुम्हाला अगोदरच मुलगा आहे किंवा तुझी इंजिनियरिंग ला ऍडमिशन झालेली आहे. परंतु हे लोक अशा प्रश्नांची खरी उत्तरे देऊ शकत नाहीत कारण त्यांना यातलं काहीच माहिती नसतं.

पण आपण सदैव भाबडेपणाने त्यांना सरळ सरळ प्रश्न विचारतो व ते लोक सदैव होकारार्थी उत्तर देतात की लग्न होऊन जाईल, ऍडमिशन होऊन जाईल, अडचणी आहेत पण देवीला अमुक अमुक नवस बोल वगैरे. परंतु अशा ठिकाणी प्रश्न विचारताना त्या व्यक्तींना आपल्याबद्दल कोणतीही वैयक्तिक माहिती अगोदर होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. गणित, भूमिती, इतिहासाबद्दलसुद्धा प्रश्न विचारा म्हणजे तुमचा गैरसमज दूर होऊन जाईल.काही महिलांच्या अंगात येण्याची अनेक वेगळी कारणे सुद्धा असू शकतात.

एखाद्या महिलेच लग्न होऊन बरीच वर्षे झाली असतील आणि तिला कुठलंही मूलबाळ नसेल किंवा तिला लागोपाठ दोन किंवा तीन मुली झाल्या असतील तर अशा स्त्रीला आपल्या सासरकडून मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू असते. सासरच्या लोकांचे सासू-सासर्‍यांचे सततचे टोमणे, छळ, नवऱ्याचे रोज दारू पिऊन मारणे, समाजात वांझोटी किंवा मुलगा होत नाही असं म्हणून हिणवणे हे सर्व ती थांबू शकत नाही. या सर्व गोष्टींवर तिला कोणताही उपाय सुचत नाही. मग ती अंगात येण्यासारखे काही प्रकार स्वीकारते. एकदाका तिच्या अंगात आलं की सासू-सासऱ्यांचा छळ थांबतो, नवरा दारू पिऊन येतो परंतु तो मारहाण करत नाही कारण आपली बायको म्हणजे साक्षात देवीचा अवतार असा त्याचा समज होतो, समाजाकडून होणारा मानसिक त्रास थांबतो व आपल्या अंगात देवी आलेली आहे म्हणून प्रतिष्ठा मिळते ती वेगळी. एखादी स्त्री असते जिला सासरची मंडळी प्रचंड त्रास देतात, नवरासुद्धा त्यांना साथ देतो, आयुष्यात कधीही न केलेल्या प्रचंड घरकामाचा रोजचा भार ती पेलू शकत नाही. या सर्वातून तिला प्रचंड मानसिक व शारीरिक थकवा येतो. त्यात खाण्यापिण्याची आबाळ आणि त्यात एखादवेळी उपवास केला की तिला चक्कर येते. चक्कर येऊन ती काही बडबड करायला लागते किंवा कामाच्या अधिकच्या व्यापाने तिला ताप येतो. ताप वाढून मेंदूत चढतो व ती बडबड करायला लागते.

तेव्हा तिची तब्येत खराब आहे तिला ताप आहे हे न कळून हे घरचे लोक तिच्या अंगात काहीतरी आलेला आहे, बाहेरची बाधा झालेली आहे. तिच्यात कोणत्यातरी देवी-देवतांचा वास आहे म्हणून तिची पूजा आरती करायला लागतात. कधीही दोन घास सुखानं न खाऊ देणारी सासू साजूक तुपातला शिरा करून आणून तिला खाऊ घालते. कधीच दोन मिनिटं सोबत बसून न बोललेला नवरा आता तासनतास तिचा हातात हात घेऊन तिच्याजवळ बसून राहतो, तिची विचारपूस करतो. तिला वेळ देतो. शेजारी-पाजारी किंवा समाजातले लोक जे तिला टोमणे मारत होते ते लोक येऊन तिच्या पाया पडायला लागतात. तिला आपल्याला काहीच झालं नाही हे सर्व कळत असते. आपल्या अंगात देवी-देवता येत नाहीत त्या सुद्धा तिला माहित असते परंतु आपल्या आयुष्यातला अचानकपणे कमी झालेला त्रास आणि आपली वाढलेली प्रतिष्ठा आणि सुख हे कायम असंच राहिलं पाहिजे याकरिता ती असं अंगात येण्याचे ढोंग वर्षानुवर्ष करत राहते.

आपण कोणत्याही धार्मिक स्थळी(मंदिर-दर्गा) किंवा नवरात्रीत देवीजवळ बघायला गेलो तर देवी अंगात आली म्हणजे एखादी व्यक्ती अगोदर दोन्ही हात वरती करून जोरात ओरडायला लागते, थोडी घुमायला लागते. अनेक बाया जळता कापूर आपल्या हातावर ठेवतात व तो जळता कापूर आपल्या तोंडात टाकतात म्हणजेच जळता कापूर खातात. हे दृश्य बघितल्यानंतर अनेकांना खरंच तिच्या अंगात कोणीतरी देवी देवता आलेली आहे हे खरे वाटायला लागते. इथे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या तळ पायाच्या बोटाला जर मुंगी चावली तर ती मुंगी चावल्याची सूचना आपल्या मेंदूला मिळेपर्यंत साडेतीन सेकंद लागतात. आपल्या हातावर जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा त्या कापुराचा चटका आपल्या हाताला साडेतीन सेकंदांपर्यंत जाणवत नाही. आपल्या तळहाताच्या पेशी ह्या मेलेल्या असतात. कठोर अंगमेहनतीचे काम करणारे लोक असतील तर त्यांच्या हाताला हा चटका पाच सेकंदापर्यंत सुद्धा जाणवत नाही. हा जळता कापूर जेव्हा जिभेवर टाकला जातो तेव्हा जीभ अगोदरच ओली असते. कापुर हा नेहमी वरच्या बाजूने जळतो खालच्या बाजूने जळत नाही. हा प्रयोग कुणीही आपल्या घरी सहज करू शकतो. फक्त हा प्रयोग करताना एकच काळजी घेणे गरजेचे आहे ती म्हणजे यासाठी आपल्या घरचा कापूर वापरायचा नाही कारण आपण जो घरी कापूर वापरतो त्यात वॅक्स म्हणजे मेन असते. तो कापूर जळल्यानंतर त्या मेणाचं पाणी होतं व आपल्या हाताला चटका लागतो. हे अंगात येणारे लोक जो कापूर खातात तो शंभर टक्के शुद्ध कापूर असतो ज्याला भीमसेनी कापूर असे म्हणतात.

अनेक स्त्रिया किंवा व्यक्ती अंगात आल्यानंतर वेगवेगळ्या भाषा बोलताना आपण बघतो आणि आश्चर्य व्यक्त करतो की या लोकांना ही भाषा कुठून कळली असेल? तर आपण लक्षात घेतलं पाहिजे हे व्यक्ती यांनी जी भाषा आयुष्यात कधीतरी ऐकली असेल(टीव्ही, रेडिओच्या माध्यमातून) अशा भाषेचे काही शब्द त्यांनी कधी ऐकले असतील असेच शब्द ते उच्चारतात. उदाहरणार्थ हिंदी, बंगाली, उर्दू, तेलगू, इंग्रजी अशा भाषेत ते बोलतात. अशा भाषेत बोलत असताना ते पूर्ण वाक्य रचना करीत नाहीत त्या भाषेतील काही काही शब्द उच्चारतात. असे अंगात आलेले लोक कधीच चायनीज, जपानीज, स्पॅनिश, जर्मन अशा भाषेत बोलत नाहीत कारण त्यांनी ती कधीच ऐकलेली नसते. अनेक लोक विस्तवावरून चालतांना आपण बघतो. ते विस्तवावरून चालतांना त्या विस्तवावर राख जमा होणार नाही याची काळजी घेतात. कारण ती राख पायाला चिटकली तर जोरदार चटका बसतो. ती राख जमा होऊ नये म्हणून हे लोक त्यात मिठाचा वापर करतात. जेव्हा विस्तवावरून चालायचे आहे त्यावेळी त्याच्या बाजूची जमीन पाण्याने ओली करतात म्हणजे पायाला चिखल चिपकावा व चटका लागू नये. आधी सांगितल्याप्रमाणेच साडे तीन सेकंद पर्यंत पायाला चटका लागत नाही. विस्तवावरून चालतांना पटापट पाऊले उचलून टाकतात त्यामुळे पायाला इजा होत नाही.

अंगात येण्याचा तिसरा प्रकार म्हणजे मानसिक आजार. काही व्यक्तींना मानसिक आजार असतात या मानसिक आजाराने ते चित्र-विचित्र हावभाव करतात, त्यांना वेडाचे झटके येतात, त्यात ते मोठमोठयाने वेगवेगळ्या भाषेत ओरडतात, विचित्र वागतात त्यामुळे त्यांच्या अंगात देव देवी देवता आल्याचा इतरांना भास होतो. हे जे अंगात येण्याचे प्रकार आहेत हे फक्त आपल्या देशातच दिसून येतात इतर देशात जर असं कोणी वागलं तर त्याला ताबडतोब डॉक्टरकडे म्हणजेच मानसोपचार तज्ञांकडे नेले जाते व त्याचा इलाज केला जातो.

काही प्रकारच्या अंगात यायला बहुतांशी सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती जबाबदार असते. परंतु आता अशी प्रकरणे कमी होऊन व्यवसायाच्या दृष्टीकोनातून पैसे कमविण्यासाठी किंवा उदरनिर्वाह चालविण्यासाठी हे प्रकार वाढतांना आपण बघतो . हे अंगात येणे 100% ढोंग असते. असे कुणीच देवी-देवता कधीच कुणाच्या अंगात येत नसतात. गाडगेबाबा नेहमी म्हणत असत क, ‘देव काय इतके रिकामे आहेत काय क घुस याच्या अंगात अन घुस त्याच्या अंगात’. असे जर कुणी अंगात येण्याचा दावा करत असेल, चमत्काराचा दावा करत असेल तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आपण त्यांना २५ लाख रुपयांचं आव्हान देऊ शकतो. अशी कुणी व्यक्ती दरबार भरवत असेल, पैशांची मागणी करत असेल, गम्भीर आजारांवर उपचार करतो म्हणून लोकांची फसवणूक करत असेल तर 2013 साली संमत झालेल्या महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कुणीही सामान्य व्यक्ती कुठल्याही पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू शकतो. तेव्हा आपल्या गावात-शहरात असे अंगात देवी-देवता आणून फसवणूक करणारे बुवा-बाया असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून किंवा जिल्ह्यातील अंनिस पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या गावातील/शहरातील नागरिकांना फसवणुकीपासून वाचवा.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६

धार्मिक , महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED