अमूल्य योगदान: भारताची एकता व अखंडता!

25

[सरदार वल्लभभाई पटेल जयंती विशेष]

सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ व जनतेने ‘भारताचे लोहपुरुष’ ही उपाधी दिली. पावन जयंती पर्वावर त्यांचे यथोचित गुणगौरव श्री.कृष्णकुमार जी.निकोडे गुरूजींनी येथे केलेले आहे… संपादक.

स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात एकतेचा पुतळा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. हा पुतळा भारतातील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे. स्मारक २०,००० चौ.मी.क्षेत्रात आहे आणि १२ चौ.किमी.आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेला आहे. १८२ मीटर म्हणजेच ५९७ फूट उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन ॲन्ड ट्यूब्रो यांच्याशी केला होता. पुतळ्याचे बांधकाम दि.३१ ऑक्टोबर २०१४पासून सुरू झाले व ते मध्य-ऑक्टोबर २०१८मध्ये पूर्ण झाले. त्याच साली वल्लभभाई पटेल जयंतीच्या दिवशी- ३१ ऑक्टोबरला भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले. भारतीय सुप्रसिद्ध मूर्तिकार राम व्ही.सुतार यांनी ही संरचना केली होती, तेच या किर्तीमंत व्यक्तिमत्वाचे धनी सरदार पटेल होत.

सरदार वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये त्यांच्या मामांच्या नडियाद- गुजरात येथील घरी झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर १८७५ अशी लिहिली होती. पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत. ते अठरा वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील बारा-तेरा वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले. इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. सन १९०४मध्ये मणीबेन आणि सन १९०६मध्ये डाह्याभाई ती ही होत. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती.

या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले. ते गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत होते.
वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करत असताना ते म.गांधीजींच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, आनंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते. वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे, हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून त्यांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते. भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. सरदार पटेल यांचे दि.१५ डिसेंबर १९५० रोजी हृदयविकारामुळे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. त्यांना मरणोत्तर सन १९९१मध्ये त्यांच्या अतुलनीय देशसेवेबद्दल भारत सरकारतर्फे ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

✒️संकलक व शब्दयोजक:-श्री कृष्णकुमार जी. निकोडे गुरूजी.[म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख व जिल्हा प्रतिनिधी आणि राष्ट्रपुरुषांच्या चरित्र-इतिहासाचे गाढे अभ्यासक व साहित्यिक.]मु. पो. ता. जि. गडचिरोली, भ्र.ध्व. ७७७५०४१०८६.