पुस्तक समीक्षण

पंखात बळ भरून भरारी घेण्याचे स्वप्न उराशी असताना शिरावर प्रोत्साहनाचा आशीर्वादरूपी हात पडावा यासारखा दुग्धशर्करा योग कोणता ? मतलबाच्या फाफटपसाऱ्यात फायदा उठवणारे खूप असले तरी सावरण्याची उभारी भरणारे अजून संपलेले नाही , ही आपुलकीची संस्कृती ताठ मानेने मिरवावी यासारखे भाग्य लाभणाऱ्या कवयित्री प्रीतिताई जगझाप गौरवशाली परंपरेच्या केंद्रबिंदूच जणू ! ममतेपासून समतेपर्यंत मनाची चलबिचल न होऊ देता दिखाव्याच्या मोहजाळाला फारकत देत स्वतःचे वैचारिक अधिष्ठान असलेल्या कुटुंबवत्सल परिवर्तनशील कवयित्री म्हणून त्यांची मोजदाद करावीच लागेल .
अंधकारची मळभ झटकट साहित्याची वाट पादाक्रांत करण्यासाठी काळजातील शब्दांचे तेल ओतून मनात विणलेली कापसाची वात हृदयाच्या चिंगारीने प्रज्वलीत प्रतिभेचा नंदादीप बनून जीवनसत्याच्या शोधात सौम्य प्रकाशाची मंद सविता बनण्याचे कौशल्य कवयित्रीने लीलया साधले आहे . चित्रकार श्रीकृष्ण ढोरे यांनी चितारलेले मुखपृष्ठ नम्र शालीन सौंदर्यात वास करणारी अर्पणवृत्ती इतरांच्या कामी आल्याने प्रसन्नतेने ओतप्रोत भाव जळण्याची धन्यता प्रकट करीत तमाला शरमेने खाली मान घालायला भाग पाडते.

नंदादीप स्वतःचा अंधकार कोणालाही जाणवू न देता मंद प्रकाशाची रीत जोपासण्याचा परंपरेचे उकल डॉ. पद्मरेखा धनकर यांनी मलपृष्ठावरील विवेचनातून अधिक स्पष्ट केले आहे . पॅराशूट मिळाल्यावर हवेत तरंगताना आपली जागा विसरल्यास टेक-अप करताना कोणता दगड आपला कपाळमोक्ष करेल याचा भरवसा नाही , ही जाणीव असल्याने कवयित्रीची अर्पणपत्रिका डोळ्यात अंजन घालणारी ठरते . संजयने कथन केलेला कुरुक्षेत्रावरील रणभूमीचा देखावा अंध धृतराष्टाच्या डोळ्यात तरळत रहावा ,अगदी त्याहून परिणामकारकरीत्या भूभरीकार अरुण झगडकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून नंदादीपाचा आत्मा आपल्या शब्दप्रवाहाने उजेडात आणून वाचकांचा आकलन मार्ग सुलभ केलेला आहे . नंदादीपाचा गर्भ आणि त्याचा प्रसव होताना आलेले साधक -बाधक अनुभव मनोगतातून व्यक्त करत जेवढे तारणारे तेवढे मारणारे तयारच असतात हे ठासून सांगायला कवयित्री कचरल्या नाहीत , याची दाद द्यावीच लागेल.

मायेच्या प्रेमाची शिदोरी घेऊन परोपकाराचा वसा जोपासत कृतज्ञता पिंड असल्याने काव्यसंग्रहाला आईच्या ममतेची पूट घालण्यासाठी दिलेले नंदादीप नाव अंतरंगात डोकावल्यास सार्थकी ठरते . जीवनसागराच्या डोहात सूर मारून तरून जाण्याची कला साधलेल्या कवयित्रीने नात्याचा आसरा घेत नारीशक्तीच्या किमयेने , महापुरुषांच्या वादळी प्रेरणेने परिवर्तनाची भरारी घेत निसर्गाच्या सानिध्यात प्रेमाची गाणी गुणगुणत कुटुंबवत्सल्य किरणांची ६६ काव्यात प्रकाशमजल मारून मनमोकळे करण्याची जीवनउभारी प्रतिबिंबित केलेली आहे.

शुद्ध बिजापोटी , फळे रसाळ गोमटी । ज्यांच्या अंगाखांद्यावर आपला भार पडावा त्यांना अडगळीत टाकण्याइतपत आपण कृतघ्न नाहीत याचा प्रत्यय कवयित्रीच्या आई , आजी , माझे बाबा , आईची माया यातून त्यांचे ऋण किती मोलाचे आहेत हे उद्धृत करत लिहिल्याशिवाय राहावले नाही .

दाटून आले हृदय माझे
सुटला अश्रूंचा बांध
आवरता आवरेना मजला
मन हे माझे बेभान

रूढी परंपरेच्या अंधाधुंदीत स्वतः यातना भोगून मानवीजीवन फुलविणाऱ्या महानायकांची परंपरा आपल्या प्रतिभेने उज्वल करणारी शांता शेळके कवयित्रींच्या मनात घर करून जाते . त्यासाठी स्त्रीदास्याची शृंखला तोडणारे क्रांतिसूर्य आणि क्रांतीज्योती नंदादीपातून वगळता येणार नाही . म्हणून कवयित्री म्हणतात 

सावित्री तू नसतीस तर
आजही मी तेथेच
खितपत पडले असते
सुशिक्षित निरक्षरांच्या गर्दीत

क्रांतीज्योतीने पेटवलेली एक ज्योत वणव्यात रुपांतरीत होऊन नारीशक्तीची विविध रूपे उजेडात आली . पण नवनिर्मितीचे पावन क्षण विटाळात कुचंबणाऱ्या मानसिकतेचे शल्य कवयित्रीला सातत्याने टोचत जाते . असे सातत्याने होणारे आघात दुःख गोंजारायला भाग पाडत असले तरी कवयित्रीला अस्तित्वाची जाण आहे .कोमल आहे कमजोर नाही
बाई , आई , कामिनी , दामिनी वेळ आलीच तशी तर
बनते नारी महिषासुरमर्दिनी चंगळवादात वैर आणि व्यभिचाराने हरवत चाललेल्या माणुसकीत फोफावणारी खेकडावृत्ती व वृद्धाश्रमाची वाढणारी संख्या कवयित्रीच्या मनात किळस निर्माण करते . वृद्ध जीवाचे प्राक्तन हरवून हंबरडा फोडत गावाची ओढ कवयित्रीने हृदय द्रावत भावनांचा डोंब गूढ लाटेपरी प्रकटला आहे .

दोन दिवस सुखाचे असताना उपभोग घेता आले नाही उरलेले चार दिवस आता दुःख संपण्याची वाट पाहण्यात गेले
आपल्या पावन संस्कृतीशी नाळ जोडत , वैभवशाली मराठमोळ्या परंपरेचे पाईक मन गोव्याच्या हिरवळ सौंदर्याबरोबर मऊशार किनाऱ्याच्या अथांग निळ्या सोबत्याला भेट देऊन येते . मनप्रियाच्या भेटीची आतुरता त्याच्या अनुपस्थितीत विरहाने पोळून होणारी मनाची तगमग प्रेमिकांच्या पावसाने भिजण्यासाठी आसुसलेल्या चातकाची प्रतीक्षा अनोळखी वळणावर कातरवेळी काळजाची घालमेल वाढवून कवयित्रींच्या हृदयाचे ठोके वाढवून वाचकांचे स्वानुभव जागृत करण्यास पुरकच म्हणावे लागेल . प्रेमाचा पहिला पाऊणचार घेऊन तृप्त होणारा जोडीदार बघत कवयित्री मनातील वादळ अतिशय मार्मिकपणे व्यक्त होत प्रेमपारख करते .
संध्याकाळ ती अशीच होती..

असेच होते वारे
भेटले जेव्हा तुला मी
नभात होते तारे .

सोज्वळ हृदयात निसर्गाची ओढ असलेल्या कवयित्रीने प्रकृतीचे विहंग सोहळे रेखाटून ऋतुराजाच्या करामतीची पवित्र माला शेतशिवारात गुंफून पर्यावरणाचा साज वृंद्धीगत केलेला असला तरी निसर्गाच्या प्रकोपाने होणाऱ्या होरपळीच्या वेदना मन सुन्न करून जाणाऱ्या ठरतात .
उभं पिक करपल
ओला कधी सुका पडे
पीक नाही पाणी नाही
भातासाठी पोर रडे .
कधी रानफुल होत नवीन वर्षाचे स्वागत करताना जीवनाचे रंग उधळीत कवितेच्या प्रवासात प्रतिभेची दिक्षा घेऊन मैत्रीचे घट्ट जाळे विणत शरद चांदण्यात पिपळाच्या स्थिर सावलीत दीपोत्सव साजऱ्या कवयित्रीची वाट पंढरीची दिंडी चालून येते आणि कळत नकळत प्रगल्भता धारण करते .
हृदयात भावनांना
रुजवावे
आपणच त्यांना फुलवावे
कळत नकळत
संसाराचा वेल बहरत असताना नवे क्षितिज गाठण्यासाठी जीवनसाठीच्या मिठीत सजून , तू हवास म्हणत जीवनाचा अर्थ शोधताना निरागसपणे कवयित्री व्यक्त होते ,
जीवनाच्या अंती
प्रवासाच्या शेवटी
मृत्यूच्या घटकेस
मज तू संजीवनी भासावीस
मनात विचारांचे चाललेले द्वंद्वव आठवणींच्या हिंदोळ्यावर एकटी असताना उमटणाऱ्या वेदना हरवलेल्या पाखरागत जमावबंदी करून एकत्र येतात आणि शोषणात भरडलेल्या जीवाला धैर्य देत कवयित्री विश्वशांतीचा उद्घोष करताना मन कळवळुन सांगते .
विदारक दृश्य हे
भयानक सत्य येथे
भरकटतो मृग जसा
दौडतात सर्व येथे
स्वतः झिजून पावलागणिक उजेडाची खाण बनलेल्या प्रीतीज्योतीने वाऱ्याशी सामना करत पेटवलेला हा नंदादीप पुढील लख्ख नैतिक अधिष्ठानाची मुहूर्तमेढ आहे . म्हणूनच प्रत्येकांनी वाचून आपल्या संग्रही हृदयाच्या कप्यात जपावा इतका पवित्र काव्यसंग्रह *नंदादीप*
————————-
काव्यसंग्रह :- नंदादीप
कवयित्री :- प्रीती विलास जगझाप
पृष्ठ :- ८०
किंमत :- १२० रुपये
प्रकाशक :- समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर
———————-
✒️समीक्षक- लक्ष्मण खोब्रागडे(मोरगाडकार)जुनासुर्ला,ता.मूल,जि.चंद्रपूर ९८३४९०३५५१

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED