दिवाळी अंक म्हणजे पर्वणीच!

25

आपल्या देशात दिवाळी हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा करतात. आताही देशात दिवाळीची धामधूम सुरू आहे. वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. सर्वत्र दिवाळीची खरेदी जोरात सुरू आहे. मिठाई, फटाके, नवीन कपडे, नवीन वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या खरेदीसाठी दुकाने फुलून गेली आहेत. यावर्षीच्या दिवाळीवर कोरोनारुपी महामारीची छाया असूनही लोकांचा दिवाळी खरेदीतील उत्साह कमी झालेला नाही. दिवाळी आली की वाचकांना वेध लागतात ते दिवाळी अंकाचे आणि वाचकांचे पाय आपसूकच दिवाळी अंकाच्या खरेदीसाठी पुस्तकांच्या दुकानाकडे वळतात. महाराष्ट्रात तर दिवाळी अंकाची परंपरा खूप पूर्वी पासून आहे. १९०९ साली मराठीतील पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध झाला होता त्याचे नाव मनोरंजन असे होते. पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध होऊन आज ११२ वर्ष झाली आहेत.

आपल्या राज्यात दरवर्षी विविध विषयांवरची दर्जेदार दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. महाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रकाशित होतात. दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी मेजवानीच कला, क्रीडा, राजकारण, अर्थकारण, विनोद, साहित्य, कथा, कादंबरी, कविता, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, आहार, व्यंगचित्र अशा वेगवेगळ्या विषयांवरील दिवाळी अंक वाचणे म्हणजे पर्वणीच. अनेक मराठी वृत्तपत्रे वाचकांसाठी दिवाळी अंक काढत असतात. फटाके, फराळ, मिठाया यासमवेतच दिवाळी अंक ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक घटक आहे. मागील दीड वर्षापासून संपूर्ण विश्वावर कोरोनारूपी महामारीचे संकट उभे राहिले आहे. त्याच्या परिणाम दिवाळी अंकावरही झाला आहे. कोरोनामुळे मागील वर्षी दिवाळी अंकाच्या छपाई आणि वितरणाला मर्यादा आल्या होत्या त्यामुळे मागील वर्षी तुलनेने कमी दिवाळी अंक प्रसिद्ध झाले.

असे असले तरी काही प्रकाशकांनी आपले अंक ऑनलाइन प्रसिद्ध केले होते. वाचकांना ते विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले. काहींनी आपले अंक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करुन दिले. वाचकांनी त्याची प्रिंट काढून ते वाचले. सुदैवाने यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिवाळी अंकांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. यावर्षी अनेक प्रकाशकांनी आपले दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत. यासोबतच ऑडिओ व्हिज्युअल दिवाळी अंक ही आहे. वाचक पुर्वीच्याच उत्साहाने दिवाळी अंकाचे स्वागत करीत आहे. दिवाळी अंक आपल्या साहित्य संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे. दिवाळी अंकामुळे वाचन संस्कृती रुजायला खूप मदत झाली आहे. वाचन संस्कृती रुजवण्यात व नव्या पिढीला वाचन संस्कृतीकडे घेऊन जाण्यास दिवाळी अंकाचा मोठा वाटा आहे. यावर्षी दिवाळीत आपल्या मित्र परिवारांना, नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा व फराळासोबत दर्जेदार दिवाळी अंक भेट द्यावेत. वाचनाची गोडी लावण्यासाठी दिवाळी अंक हा चांगला मार्ग आहे. गोडाधोडाच्या फराळासोबत वाचनाचा हा फराळही दिला तर दिवाळीची गोडी आणखी वाढेल आणि वाचन संस्कृती रुजायलाही मदत होईल.

✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५