तौलनिक अभ्यास: चिनी रुपांतर व पाली संहिता!

29

[पु. वि. बापट पुण्यतिथी विशेष]

सन १९५३मध्ये भारत सरकारतर्फे ब्रह्मदेश, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया या देशांचा, सन १९५६मध्ये चीनचा व सन १९५९मध्ये जपानचा सांस्कृतिक दौरा करण्याची संधी त्यांना मिळाली. पुढे दिल्ली विद्यापीठात ‘बुद्धिस्ट स्टडीज’ या विभागाचे ते संघटक आणि प्रमुख होते. इ.स.१९६३पासून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे ते एक विश्वस्त होते. त्यांना चिनी, तिबेटी, फ्रेंच, बंगाली या भाषा अवगत होत्या. त्यांच्या पुण्यस्मृती जागविण्याचा प्रयत्न ‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारीजींनी सुंदरशा शब्दांतून केला आहे… संपादक.

पुरुषोत्तम विश्वनाथ उर्फ पु. वि. बापट हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषाकोविद, बौद्ध धर्मग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक होते. पुढे ते अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या इ.स.१९४३ व १९६१ या दोन अधिवेशनांत पाली-प्राकृत विभागाचे अध्यक्ष, सन १९४६च्या अधिवेशनात पाली बुद्धिझम विभागाचे अध्यक्ष व प्राच्यविद्या परिषदेच्या सन १९७४च्या कुरुक्षेत्र अधिवेशनाचे प्रमुख अध्यक्ष राहिले होते. बौद्ध ग्रंथांसंबंधीचे त्यांचे कार्य लक्षात घेऊन नवनालंदा विद्या विहाराने त्यांना सन १९७४ साली ‘विद्यावारिधि’ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांचा गौरव केला.
पु.वि.बापटांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील सांगली येथे दि.१२ जून १८९४ रोजी झाला. त्यांचे इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण नांदेडच्या सरकारी शाळेत आणि नंतर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पालीचा अभ्यास करून सन १९१६मध्ये बीए आणि सन १९१९साली एमए या पदव्या संपादित केल्या. याच महाविद्यालयात बौद्ध धर्माचे जगद्विख्यात पंडित धर्मानंद कोसंबी त्यांना गुरू म्हणून लाभले.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी सिंहली, ब्राह्मी आणि थाय लिप्यांचाही अभ्यास केला. ते एमए झाल्यानंतर फग्युसन महाविद्यालयात अध्यापन करू लागले. ते त्याच महाविद्यालयात पालीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. इ.स.१९२० पासून १९५४पर्यंत ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्य राहिले. सन १९२९मध्ये बौद्ध धर्मग्रंथांच्या इंग्रजी अनुवादांसाठी सहाय्यक म्हणून येण्याचे निमंत्रण त्यांना अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठाकडून मिळाले. तेथे असताना वॉल्टर क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इंडिक फिलॉलॉजी’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएचडी मिळवली.

बापटांनी संपादिलेल्या ग्रंथात २५०० यीअर्स ऑफ बुद्धिझम हा ग्रंथ विशेष उल्लेखनीय होय. बुद्धांचे जीवन आणि शिकवण, बौद्ध धर्माचा उद्गम आणि विस्तार, बौद्ध धर्मातील प्रमुख पंथ, बौद्ध साहित्य विद्या आणि कला, बौद्ध धर्म आणि आधुनिक जग, बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन अशा अनेक महत्वपूर्ण विषयांसंबंधीचे व्यासंगी विद्वानांचे लेख या ग्रंथात अंतर्भूत आहूत. स्वत: बापटांनी आपल्या लेखनाने या ग्रंथास मोठा हातभार लावला आहे. बौद्धांच्या विनयपिटकावरील सन्मतपासदिका नामक अट्ठकथेचे संघभद्राने केलेले ‘शान च्येन फिकोषा’ हे चिनी रूपांतर आणि तिची मूळ पाली संहिता यांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांनी स्वतः लिहिलेला शान् च्येन् फिफोषा हा लेखही उल्लेखनीय आहे. सिलोन विद्यापीठातर्फे सन १९४९मध्ये तो प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर शान् च्येन् फिकोषा या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतरही त्यांनी केले. बापटांनी केलेले इंग्रजी भाषांतर तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात जपानचे पाली-संस्कृतचे प्राध्यापक डॉ.हिराकावा यांनी साहाय्य केले. पुण्याच्या प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे हे भाषांतर सन १९७०साली प्रसिद्ध झाले. या ग्रंथांशिवाय त्यांनी संपादन किंवा अनुवाद केलेले ग्रंथ येणेप्रमाणे- १) सुत्तनिपात, २) विमुत्तिमग्ग अँड विसुद्धिमग्ग, ३) धम्मसंगणि, ४) अट्ठसालिनी, ५) अर्थपदसूत्र- यी-च्यु-किंग या चिनी ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर- २ भाग आणि ६) विमुक्तिमार्ग- धुतगण निर्देश- एका तिबेटी ग्रंथाचे संपादन व इंग्रजी भाषांतर.

पुरुषोत्तम विश्वनाथांनी सुमारे १४० शोधनिबंध लिहिले असून त्यांतील आग्नेय आशियातील भारतीय संस्कृती, काँट्रिब्यूशन ऑफ बुद्धिझम टू इंडियन कल्चर, करण-संपत्ति, श्ली-पद अँड ए रेमेडी फाउंड इन ए पाली कॉमेंटरी हे विशेष उल्लेखनीय होत. दे.द.वाडेकर संपादित मराठी तत्त्वज्ञान-महाकोशात तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोशात महत्त्वपूर्ण नोंदी केल्या. यातून त्यांनी महाराष्ट्रातील कोशकार्यासही आपल्या विद्वत्तेचा लाभ दिला.अशा या महान विश्वविख्यात कीर्तिमंत बौद्ध धर्मग्रंथ प्राच्यविद्या पंडित असलेल्या पु.वि.बापट यांचे दि.४ नोव्हेंबर १९९१ रोजी महानिर्वाण झाले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या अचाट बुद्धिचातुर्याला लवून मानाचा मुजरा !!

✒️संकलन-शब्दांकन:-‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारी(भारतीय सर्व धर्मग्रंथांचे गाढे अभ्यासक)मु. पो. ता.जि.गडचिरोली.मोबा. ७७७५०४१०८६.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com