शेतकरी सावकारी पाशमुक्त करण्यास प्रयत्न!

[फिरोझशहा मेहता पुण्यस्मरण विशेष]

इंपीरियल कौन्सिलमध्ये किंवा नंतर मुंबई कौन्सिलमध्ये फिरोझशहांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका समर्थपणे बजावली. सन १९०४ साली त्यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा पडली. यावेळी जहाल-मवाळ संघर्ष उग्र बनत चालला होता. शेवटी इ.स.१९०७मध्ये सुरत अधिवेशनाचे वेळी काँग्रेस दुभंगली आणि तिच्यावर मवाळांची पूर्ण पकड बसली. त्यांच्या पावन स्मृतिंना सार्थ शब्दांत उजाळा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी दिला… संपादक.

काँग्रेसच्या सहाव्या अधिवेशनासाठी सन १८९० साली फिरोझशहा मेहतांची अध्यक्षपदी निवड झाली. तत्पूर्वी मुंबईच्या कायदेमंडळाचे ते सदस्य झाले होते. पुढे ते इंपीरियल कौन्सिलचे सदस्य म्हणून निवडले गेले. तेथे त्यांनी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी विविध उपाय सुचविले तसेच लष्करी व शासकीय खर्चात कपात करावी, यासाठी आग्रह धरला. कर्झनच्या युनिव्हर्सिटी बिलाला त्यांनी कडाडून विरोध केला. विश्वविद्यालये स्वायत्त असावीत. त्यांवर शासकीय दडपण असू नये, अशाही मागण्या केल्या. स्वदेशीच्या प्रचारार्थ त्यांनी आणि तेलंगांनी स्वदेशी साबण कारखाना काढण्याचा उपक्रम केला. त्यांच्या पुढाकाराने सन १९११साली सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाची स्थापना झाली. तीन वर्षात बाँबे क्रॉनिकल हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईला सुरू केले. मुंबई महानगरपालिकेचे तर ते प्रथमपासून अनिभिषिक्त राजेच होते. सन १९१५ साली मुंबई विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच वर्षी त्यांना विश्वविद्यालयाने एलएलडी ही मानद पदवी देण्याचे ठरविले.त्यांच्या प्रयत्नाने चालू वर्षातील काँग्रेस अधिवेशनही मुंबईत भरले. सन १८९४मध्येच ब्रिटिश सरकारने त्यांना सीआयई हा किताब दिला. तेव्हापासून ते सर फिरोझशहा म्हणून विख्यात झाले.

फिरोझशहा मेरवंजी मेहता हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे एक संस्थापक होते. ते नामांकित वकील, उत्तम प्रशासक आणि प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांच्या वडिलांचा कलकत्त्याला व्यापार होता, पण व्यापारानिमित्त ते मुंबईत अधूनमधून राहात असत. त्यांचा जन्म मुंबईत दि.४ ऑगस्ट १८४५ रोजी झाला. त्यांचे सर्व शिक्षण आणि बहुतेक राजकीय जीवन मुंबईतच व्यतीत झाले. एल्फिन्स्टन कॉलेजमधून एमए होऊन ते इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले. तेथील चार वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्यावर दादाभाई नौरोजींचा प्रभाव पडला. ते बॅरिस्टर होऊन सन १८६८मध्ये भारतात आले आणि मुंबईस त्यांनी वकिली सुरू केली. इ.स.१८६९ साली त्यांनी दादाभाईंच्या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा म्हणून बाँबे असोसिएशन मुंबईत सुरू केली. गोऱ्या लोकांच्या मिरासदारीविरुद्ध त्यांनी प्रभावी प्रचार केला. सुरतच्या आंदोलनातून उद्‌भवलेल्या दंगल केसमध्ये आरोपींच्या वतीने समर्थपणे उभे राहून फिरोझशहांनी कीर्ती मिळविली. कित्येक प्रश्न हाती घेऊन त्यांनी वकिलीबरोबर राष्ट्रीय जागृतीचेही कार्य केले. सन १८७२च्या मुंबई महानगरपालिका विधायक कायद्यावर फिरोझशहांच्या सूचनांची पूर्ण छाप होती. यामुळे त्यांना ‘मुंबईतील नागरी शासनाचे पिता’ हे सार्थ नाव मिळाले. त्यांना आयुक्त करण्यात आले. सन १८७८ ते १८८० या तीन वर्षांत वृत्तपत्रांची गळचेपी करणारा व्हरॅनक्युलर प्रेस ॲक्ट आणि ब्रिटिश कापडाला हुकमी बाजारपेठ चालू राहावी, यासाठी आयातकरातून देण्यात आलेली सूट, या दोन प्रश्नांवर फिरोझशहांनी सनदशीर मार्गांचा अवलंब केला. इल्बर्ट बिलाला पाठिंबा देण्यासाठी फिरोझशहा आदी राष्ट्रवाद्यांनी गोऱ्यांविरुद्ध प्रतिआंदोलन उभारले.

पुढे त्यांची मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर सन १९०५मध्ये त्यांची फेरनिवड झाली. बाँबे असोसिएशनचे बाँबे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये रूपांतर झाले, त्यावेळी तिचे फिरोझशहा, न्यायमूर्ती तेलंग आणि दिनशा वाच्छा हे पहिले सरचिटणीस झाले. त्याच वर्षी मुंबईस भरलेल्या पहिल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिरिरीने भाग घेतला. तो पर्यंत त्यांना सर्वदूर ‘मुंबईचा सिंह’ म्हणून ओळखले जात होते आणि त्यांची राष्ट्रीय नेत्यांमध्ये गणना होऊ लागली होती. फिरोझशहा मेहता यांची प्राणज्योत दि.५ नोव्हेंबर १९१५ रोजी मालवली.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांच्या अविस्मरणीय चिरंतन स्मृतींना विनम्र अभिवादन !!

✒️संकलक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली.भ्रमणध्वनी – ९४२३७१४८८३.

गडचिरोली, महाराष्ट्र, लेख, शैक्षणिक, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED