मर्डर ऑफ डेमोक्रशी

इतर देशांच्या तुलनेत भारताला हा सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे. कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतिपूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही .इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते .धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर

वर्तमानाचे वास्तव अत्यंत भयावह आहे. जगातील दोन टक्के माणसांनी अठ्यान्नव टक्के माणसावर आर्थिक महाजालाचा भ्रम तयार केला आहे. पृथ्वीवरील माणसाला गुलाम केले आहे. प्रत्येक देशात लोकांना स्वतंत्रतेचा अधिकार असला तरी शासन व्यवस्थेच्या जोरावर हा अधिकार काढल्या जात आहे.आपल्या हातात कायदे घेऊन जगाला इशाऱ्यावर नाचवायचे काम सातत्याने सुरू आहे.

जगातील माणसांना भूक व शोषण यांच्यापासून सुटका न करता त्यांचे रक्तशोषण करून भरमार असा नफा कमावण्याची विकृत व्यवस्था उदयास आली आहे. करोनाच्या महामारीने जगातील सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे .माणसाचे माणूसपण हिरावून घेतली आहे .अग्निज्वालेने होरपडणाऱ्या या जगात नव्या वैचारिक महायुद्धाचे ढग जमा झाले आहेत .एक पारंपारिक व्यवस्था मजबूत करणारा पाखंडी व अवैज्ञानिक वर्ग तर वर्तमानाचा स्वीकार करणारा परिवर्तनशील व वैज्ञानिक दृष्टी लाभलेला वर्ग असे वर्गीकरण झाले आहे.

आपल्याला मानवी जीवनाला उच्चशिखरावर न्यायचे असेल तर बदलते विश्व बदलते संदर्भ यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. नव्या तंत्रज्ञानाने युक्त असा या वर्तमानात माणसाच्या भग्नसमाधीचा आलेख पाहायला मिळते. अन्यायकारी विकृत मनोवृत्ती नंगानाच करत असताना संयुक्त राष्ट्र संघ हा बघ्याची भूमिका घेत आहे .संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्टे ही मानवी हिताची आहेत. मानव कल्याणाची आहेत. सर्वंकष मानव समान मानणारी आहेत. पण आज हेच संयुक्त राष्ट्र ताकतवर देशांच्या तालावर नाचत आहे. व्हिटो अधिकार असणाऱ्या देशांच्या चक्रव्यूहात संयुक्त राष्ट्र फसले असून त्यांना इतर देशातील शोषण दिसत नाही .यासाठी नवे विचारमंथन होणे गरजेचे आहे.

आज अनेक देशात शीतयुद्धचा विषमज्वर फैलावला असून भारतात व भारताच्या शेजारी अनेक काळे ढग जमा झाले आहेत. वैयक्तिक स्वार्थ साध्य करण्याचा प्रयत्न करणारी ही व्यवस्था लोकशाही समाजवादी व्यवस्था मोडकळीस आणत आहे. भारत ,अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्रह्मदेश, बांगलादेश, सिरिया, पॅलेस्टाईन आणि इतर अनेक देशांमध्ये माणसाचे शोषण होत आहे. माणूसच माणसाला मारत आहे. माणसाच्या विकृत व्यवस्थेचे नवीन विकृत्व पाहायला मिळत आहे .धर्म व जात यामुळे मानव उद्ध्वस्त होत आहे. बोलण्यासाठी मदर ऑफ डेमोक्रशी आहे पण वास्तवात मात्र मर्डर ऑफ डेमोक्रशी आहे. तिच्या नावावर भांडवलदार व्यवस्था राजकीय केंद्र स्तरावर निर्माण झाल्याने आर्थिक ,सामाजिक, शैक्षणिक व राजकीय शोषण मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. पैशाच्या महामुराद प्रक्रियेने भारतीय लोकशाही नेस्तनाबूत होत आहे. भ्रष्टाचाराचा शिरजोर पणा मोठ्या आवेशाने मार्गक्रमण करीत आहे.विश्वातील सत्यनिष्ठतेला गुलाम केले जात आहे. खोटे आश्वासनांची खैरात करून विरोधाचे जोक्स मांडल्या जात आहेत. मोठे उद्योगधंदे यांचे खाजगीकरण करून सेवा क्षेत्र कमकुवत केले जात आहे .संविधानात्मक असलेली भूमिका नष्ट करून असंविधानिक व्यवस्था निर्माण करण्याची एक प्रक्रिया जागतिक पटलावर सुरू आहे.

जग हे ग्लोबल असताना माणूस ग्लोबल होत नाही .माणूस धर्म आणि जात यामध्ये एवढा मशगुल झाला आहे की त्यांना माणसाचे बळी जात आहेत तर हे दिसत नाही .”बोलाचिच कढी बोलाचाचि भात । जेवूनिया तृप्त कोण जाला” …असं संत तुकाराम महाराज म्हणतात.
आजच्या नेत्यांमध्ये बोलण्याची ओढ लागलेली आहे.ठोकून देण्याची पद्धत तयार झाली आहे.नीतिमत्ता फक्त कागदावर दिसते. वास्तव मात्र भयंकर आहे.समाजामध्ये जाती-धर्म यावरून विभक्तीकरण सुरू आहे. एखादा विषय हायलाईट करून त्या विषयावर मते मतांतरे घेऊन आपली राजकीय पोळी शेकण्याचे कटकारस्थान वर्तमानात होत आहे. जागतिक पटलावर नव्या मूल्यमंथनाची गरज असताना पारंपारिक व्यवस्था टिकवण्यासाठी नवी यंत्रणा उभी केली जात आहे. स्वतःचा टेंबा मिरवणाऱ्या संस्कृतीचा उदो उदो केला जात आहे.

आज अनेक देशात अंधभक्ताची नवी जमात निर्माण होऊन स्वतःच्या मेंदुला गुलाम करणारी शोषण व्यवस्था निर्माण केली आहे .मेंढरोपनिषद मेंदू तयार झाले आहेत. नेत्यांच्या मागे जाणाऱ्या मेंढरमेंदूला देशाशी व जगाशी काही देणे-घेणे नाही.फक्त सरकार नावाच्या व्यवस्थेला संरक्षण देण्याचे काम तो करत आहे. जगात माणसे मारण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित होत असून नव्या औषध उपचारांतून माणसाचे मेंदू व शरीर विकलांग केले जात आहे. नवीन पिढी गुलामीचे जोखंड आपल्या मनावर घेत आहे .लढणाऱ्या लोकांना मोठ्या सिताफतीने फसवले जात आहे. अनेक प्रकारचे खटले लावल्या जात आहेत. मानवाला त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणारी हुकूमशाही जगाच्या पाठीवर स्वैराचार घालत आहे. अशा स्वैराचार करणाऱ्या व्यवस्थित शिरच्छेद करण्याचे काम लोकशाही राष्ट्रातील निडर व विद्रोही लोकच करू शकतात. जगात शांती व सुख नांदावे म्हणून जगातील लोकशाही विचार प्रवर्तकांनी जागतिक लोकशाही फोरम तयार करावे .अलोकशाहीवादी शासनाला व नेतृत्वाला विरोध केला पाहिजे. जगातील कोणतेही शोषण ही प्रतिक्रांती आहे. या प्रतिक्रांतीला सम्यक क्रांतीनी पराभूत करू या.ह्याच सम्यक क्रांतीची आज खरी गरज आहे.जेव्हा नवे मूल्यवर्धन जग निर्माण होईल तेव्हाच जगात प्रेम व शांती नांदू शकेल. तरच जग नवीन विश्व म्हणून उभे राहील.

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००

नागपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED